त्या वेळी कोल्हापूरला होतो मी. महाराष्ट्रातल्या एका आघाडीच्या वृत्तपत्रासाठी वृत्तसंकलन करण्याची जबाबदारी होती माझ्यावर. पुण्यात बराच काळ राहिलेला असलो तरी हे शहर मला अगदीच नवं होतं. कोल्हापूरला बातमीदार म्हणून रुजू होण्यापूर्वी इथं येण्याचा प्रसंगही आलेला नव्हता. स्वाभाविकपणे हे शहर पाहावं, जिल्हा पाहावा, माणसांना भेटावं यात विशेष रुची घेत होतो. माहिती खात्याकडून एक निमंत्रण आलं. पर्यावरणदिनाच्या निमित्तानं एक दौरा आयोजित केला होता. त्यात सहभागी होण्याचं ठरवलं. माझा एक सहकारी या दौऱयात होताच; पण मीही ठरविलं आपण जावं. कोल्हापूरहून निघून विशालगड आणि पन्हाळ्यावर रात्रीचं भोजन आटोपून कोल्हापूरला परत असं दौऱयाचं नियोजन होतं. माहिती खात्याचे दौरे पत्रकार कधीही गांभीर्यानं घेत नाहीत. माहिती अधिकाऱयांनाही `एक काम केल्याचं पुण्य हवं असतं,’ हे ऐकून होतो. दौऱयात अनुभवही आला. फॉरेस्टचे काही अधिकारी अधूनमधून गाड्या थांबवून इथं काय करण्याची योजना आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीत असत. ते उघडेबोडके डोंगर पाहण्यात कोणालाही रस नव्हता. कोणी काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. विशालगडाच्या जवळच गर्द झाडीखाली जेवणाची व्यवस्था होती. कोल्हापुरी मसाल्याचा खमंग वास आणि रटरटणाऱया चिकनचा गंध… साऱयांच्या भुका चाळविण्यासाठी पुरेशा होत्या. मस्त जेवण झालं. पोट भरल्यानंतर पत्रकार अन् अधिकारी यांचा संवाद आता जुळू लागला होता. फॉरेस्ट अधिकारी कोंबड्याच्या रूपानं पत्रकारांच्या पोटात शिरले होते. दुपारचं जेवण इतकं चांगलं तर रात्री काय बहार असेल… दौरा चांगला आहे, असं सर्वांचं मत बनत चाललं होतं. पर्यावरणदिन हा दर वर्षी असाच व्हायला हवा, असा प्रस्तावही पुढे येत होता. भोजन झाल्यावर आम्ही सारे विशालगडावर आलो. बाजीप्रभूंची खिंड पाहिली अन् किल्ल्याच्या पठारावर पाय ठेवला. जे दृश्य दिसलं ते अवाक् करणारं होतं. पठारावर जिकडे पाहावं तिकडे कोंबड्यांची तांबडी-लाल-करडी पिसच पिसं दिसत होती. अशी शोधून जागाही सापडली नसती, की तिथं पिसं नाहीत. सगळा परिसर पिसांनी झाकून टाकावा, असं ते दृश्य होतं. इथं हे असं का, असा प्रश्न काहींच्या मनात आला होताच; पण तो विचारावा लागला नाही. कारण काही मिनिटांतच आम्ही एका दर्ग्यात पोहोचलो. तिथं प्रार्थना केली. कशासाठी हे आठवत नाही; पण माझं भलं होऊ देत, यासाठीच असावी. काहींनी ताईत मंत्रवून घेतले. इथं अनेकांना प्रचिती आलेली म्हणे, अशी चर्चाही त्या ओघानं सुरू होती. आम्ही खाली आलो. देवदर्शन झाल्याचं समाधान काहींच्या चेहऱयावर होते; पण माझ्या डोळ्यापुढून तो कोंबड्यांच्या पिसांनी भरलेलं पठार जात नव्हता. इथल्या दग्यार्वरच मन्नत पूर्ण करताना त्यांचा बळी गेला होता. पिसं वाऱयावर उडत होती. मी अस्वस्थ होतो. एकाजवळ बोललोही. तो म्हणाला, “मर्दा, हे कोल्हापूर आहे. इथं कोंबडी-बोकड नाही खायचा तर खायचं काय? आजचं सोड. दसऱयाला बघ चौकात कोयते चालतात. बोकडांचे बळी जातात. त्या दिवशी रात्री या भागात एकच गंध असतो. मटणाचा!”
सर्वांनी दौरा छान, यशस्वी झाल्याचं म्हटलं होतं. त्यापुढच्या वेळी अशा दौऱयात सहभागी न होण्याचं मी ठरविलं होतं. यानंतर या प्रसंगाची तीव्रता कमी होत गेली. आज अचानक ते दृश्य पुन्हा माझ्या डोळ्यापुढं आलं. वेगळ्या अर्थानं, वेगळ्या पद्धतीनं, गेला आठवड्याभर महाराष्ट्रात `बर्ड प्ल्यू’ची चर्चा आहे. हा विकार नेमका काय आहे, यानं वृत्तपत्राचे रकाने भरत आहेत आणि नवापुरात, त्या परिसरात कोंबड्यांची कत्तल केली जात आहे. त्याची छायाचित्रे, त्यांची आकडेवारी जाहीर होते आहे.
पत्रकारितेमध्ये काम करताना बातमी कशाला म्हणतात, बातमी कशी होते? तिची तीव्रता काय? अशा अनेक बाबींवर अनेक गोष्टी सांगितल्या-शिकविल्या जातात. विशालगडाच्या त्या कोंबड्यांच्या पिसांचं रूप पाहताना मी तेथल्या स्थानिक वार्ताहरला विचारलं होतं, “अरे, इथं एवढ्या कोंबड्यांचा बळी जातोय, बातमी नाही का द्यायची?” त्या वेळी तो म्हणाला होता, “उरूसाची बातमी दिलीय साहेब. कोंबड्यांचं काय? त्या तर मरतातच!”
कोंबड्या काय? मरतातच! खरंय. कोंबड्या तर रोजच मरतात. परवाच पुण्या-मुंबईत किती कोंबड्या `डिश’ हेऊन येतात, याची आकडेवारी प्रसिद्ध झालीय. एरवी ती होतही नाही; पण नवापूरच्या कोंबड्यांना वृत्तपत्राच्या रकान्यात जागा मिळाली… अर्थात माणसासाठीच! बातमीच्या, वृत्तमूल्याच्या व्याख्येत कोंबड्या नेहमी बसत नाहीत, तर त्यासाठी काही निमित्त असावं लागतं. मनात आलं, असे अनेक विषय, घटना, माणसंही असतीलच की जे मरतात कोंबड्यांसारखे; पण त्यांची बातमी होत नाही!
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply