नवीन लेखन...

बाबा, भक्त आणि बायांचा ‘भोग’; एक स्वानुभव

आपण भारतीय कितीही शिकलो-सवरलो, तरी आपल्या मनाची मुळ ठेवण अध्यात्मिक आहे. ती ठेवण पिढ्यानपिढ्या पोसली गेलेली आहे. आपल्या प्रत्येकाची अध्यात्म्याची व्याख्या आणि मतं कदाचित वेगवेगळी असू शकतील, मात्र एका गोष्टींवर आपलं जवळजवळ सर्वांचंच ठाम एकमत होऊ शकेल, ते म्हणजे, वाढलेल्या दाढी-मिशा-जटा आणि भगवं वस्त्र यांचा अध्यात्माशी संबंधं असतो. म्हणजे वाढलेल्या दाढी-मिशा-जटा आणि भगवं वस्त्र परिधान करणारी कोणीही व्यक्ती आपल्याला दिसली, की आपण तिला आपला मेंदू चपलांपाशी ठेवून, ‘अध्यात्मिक व्यक्ती’, ‘साधू’, ‘अधिकारी पुरुष’ वैगेरे ठरवून पार मोकळे होतो. प्रसंगच तसा असेल, तर साऱ्क्षात लोटांगणही घालतो. भरघोस दाढी-मिशा, भगवं वस्त्र दिसलं की आपल्या एरवीच्या चिकित्सक बुद्धीला काय होतं कुणास ठावूक, पण ती ‘लागली समाधी’ अशी होते हे मात्र खरं. लहानपणापासून पुस्तकांत वाचून, चित्र बघून आणि हल्ली टिव्हीवरील सिरीयल्समधे पाहून पाहून दाढी वाढवलेला, तो साधू हे आपल्या मनाने पक्कं ठरवलेलं असतं आणि आपली बुद्धी बधीर हेोण्यामागे ते ही एक कारण असावं बहुदा. याचाच परिणाम म्हणून अशा या तथाकथीत बाबांसमोर ‘घालीन लोटंगण, वर करून ढुंगण’ अशा अवस्थेत पडलेल्या आपल्याला पाहून, जो मुळात साधू नसतोच, त्याला पुढची संधी दिसते. आश्चर्य म्हणजे यात सर्वसामान्य जनता तर असतेच पण डाॅक्टर, इंजिनिअर, सीए वैगेरे पदव्यांचे तुरे लावणारे, स्वत:ला इंटलेक्च्युअल समजणारेही असतात.

हे असं का व्हावं? माणसं भोंदूंच्या नादाला का लागतात? तर मला वाटतं याचं कारण गेल्या काही वर्षात आपली बदललेली जीवनशैली आणि पैशाला आलेलं अतोनात महत्व हे असावं. दुसऱ्याशी केलेल्या तुलनेनतून हव्या असलेल्या आणि पैशाने विकत घेता येणाऱ्या भौतिक गरजां पूर्ण करता याव्यात म्हणून वाटेल त्या मार्गामे मिळवलेला पैसा, त्या पैशांच्या मागे धावता धावता दमछाक झालेलो आपण, आपल्याच संतांनी सांगीतलेलं ‘तुझे आहे तुझं पाशी’ची शिकवण विसरललोय आणि त्यामुळे आपल्या सर्वांचीच परिस्थिती ‘परि जागा चुकलासी’सारखी झाली आहे. सुख पैशाने विकत मिळतं ही समजूत हळुहळु कमी होत जाताना मन निराशेनें भरुन जातं आणि मग हे निराश मासे अलगद अशा भगव्या वस्त्रातल्या दाढी-मिशांची जंगलं वाढवलेल्या बाबा, बुवा, बापू, माॅं यांच्या विळख्यात सापडतात आणि सुरु होत ते केवळं एक्स्प्लाॅयटेशन आणि एक्सप्लाॅयस्टेशनच..!

या बाबालोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे बोलण्यात पटाईत असतात. आणि ते काही वेगळं, दिव्य असं काही सांगत नसतात, तर आपल्याच प्राचिन संतांच्या कथा, पुराणांतले दाखले यांच्या तोंडावर असतात आणि त्यातलेच दाखले ते आपल्या मिठ्ठास वाणिनं आपल्या भक्तांना देत असतात. आणि जे मुळातच गोड आहे, ते अशा गोड जिभेवरून आलं, की आणखी गोड वाटू लागतं आणि भक्ताभोवतालचं जाळं हळुहळू आवळलं जाऊ लागतं. भक्त हळुहळू त्या बाबाच्या नादाला लागू लागतो आणि तो बाबाच त्याला भगवंत वाटू लागतो. मग काय, एकदा का एखाद्याला देव मानलं, की मग देवावर चढावा सुरु होतो. एक भक्त दुसऱ्याला, दुसऱ्या आणखी दोघांना असं करत ही साखळी वाढू लागते व बाबाचा लौकिक वाढत जाऊन सुखाच्या शोधात असलेल्या भक्तांची संख्या वाढू लागते. गर्दी वाढली की मग चलाख राजकारण्यांना त्यात ‘मतं’ दिसू लागतात. ते ही त्याचे भक्त होऊ लागतात. राजकारणी आले, की मग सरकारी खात्यांमधे ‘सेटींग’ करण्यासाठी बडे उद्योगपती, गुंड यांच्या भक्तगणांत सामिल होतात. आणि या सर्वांत बाबा मध्यस्त म्हणून काम करतो. बाबागिरीच्या नांवाखाली खरंतर ‘सेटींग’चा ‘धंदा’ चालू राहातो

‘सेटींग’मधून बाबाला भरघोस दलाली मिळत असते. ती देणगी किंवा चढावा या नांवाखाली बाबाच्या पायवर ओतली जाते. भक्तांमधे ‘देवा’ला धन-संपत्ती-गाड्यांचा असा चढावा चढवण्यासाठी मग चढाओढ लागते. या पैशांचा काही भाग मग सामाजिक कामांसाठी वापरला जाऊ लागतो. यात लोकांची सेवा हा दुय्यम आणि बाबाचे प्रतिमासंवर्धन हा प्रधान हेतू असतो. यामुळे बाबाच्या भक्तांत आणखी वाढ होऊ लागते. आता गरीब वर्गातले लोक बाबाच्या भक्तांत सामिल होऊ लागतात.

गरीबांची व्यथा वेगळीच असते. हे सर्वच बाजून गांजलेले असतात. मुलं अभ्यास करत नाहीत, नोकरी नाही, दारुचं व्यसन, पैसे नाहीत, कर्जाचा विळखा, आजारपण ह्या गरीबांच्या नेहमीच्या व्यथा. हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही हे प्रश्न न सुटल्याने मग ‘जिसका कोई नही, उसका तो खुदा है यारो’ या न्यायाने शेवटीया देव बनलेल्या बाबाच्या दारी त्यांचं येणं होतं ते आशेनं. आपल्या परिस्थितीत सुधारणा व्हावी या एकमेंव हेतूनं या भोंदूसाधूकडे आलेल्या गरींबांकडे, बाबाला देण्यासाठी काहीच नसतं. बनावट साधू बनलेल्या या ‘संधीसाधू’ला यातली ‘संधी’ दिसते आणि पुरुषाला ‘सेवेकरी’ आणि स्त्रीयांना ‘सेवे’साठी नेमून त्याच्याकडून चढावा घेतला जातो. स्त्रीयांच्या शरिराचा भोग मागीतला जातो आणि त्यांच्याकडून तो देवाला हवा म्हणून चढवलाही जातो. प्रथम आनंदाने आणि नंतर तो हक्काने मागीतला जातो. बाबा, त्याचे क्लोज भक्त याच्या ‘सेटींग’साठी अशी ‘लेदर करन्सी’ मग वापरली जाते. सुरुवातीला राजीखुशीने व नंतर प्रमाणात नाखुषीने हे चालत राहातं. ह्या बाबांचे मठ, ठिकाणं हे मग हायप्रोफोईल ब्राॅथेल्स बनतात.ब्रम्हानंदी टाळी लागण्यासाठी मग ड्रग्स येतात. जो पर्यंत हे एका मर्यादेत असतं, तो पर्यंत बिनबोभाट चालू राहातं आणि मग हा प्रकार जेंव्हा विकृतीकडे वळतो, तेंव्हा मग त्याला हळुहळू वाचा फुटू लागते. ती दडपण्यासाठी मग धमक्या-खुन यांचा सिलसिला सुरु होतो. शासकीय पातळीवर याची दखल घेतली जात नाही कारण ज्यांनी अशी दखल घ्यायची तेच बाबाचे भक्त आणि बाबाच्या कारनाम्यांत सामिल असतात. बाबा इतकी वर्ष हा धंदा करतो, पण इतकी वर्ष लोकांना कळलं कसं नाही हा जो प्रश्न पडतो ना, तो या मुळेच. पुढे कुठेतरी याला वाचा फुटते, बभ्रा होतो आणि मग काय होतं हे आसाराम, रामपाल, निर्मल बाबा, राधे माॅं आणि आता राम रहीम यांच्या प्रकरणातून आपल्याला कळलेलं आहेच.

हे सर्व लिहायचं कारण म्हणजे, सध्या राम रहीम गुरमित नांवाच्या बाबाने त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींवर केलेल्या बलात्काराचे गाजत असलेलं प्रकरण. बुवा आणि बाया हे समिकरण फार जुनं आहे. राम रहीम हा काही स्त्रीयांचा गैरफायदा घेणारा पहिलाच बाबा नव्हे आणि अनुभवावरून सांगतो, शेवटचाही नाही. असे बाबा आणि त्यांची शिकार होणाऱ्या स्त्रीया या बातम्या पुन्हा पुन्हा नव्याने समोर येतंच असतात, पुढेही येतंच राहातील येवढी मला, आपल्या एकविसाव्या शतकातल्या, महसत्ता होऊ पाहणाऱ्या भारतवर्षातल्या समाजाच्या शहाणपणाविषयी खातरी आहे. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी एक म्हण आहे. परंतू ती आपल्या समाजाला पूर्णपणे गैरलागू आहे, असंच यावरून म्हणावं लागतं. आपल्याकडे पुढच्यास ठेच आणि मागच्याचा थेट कपाळमोक्षच अशी सारी परिस्थिती आहे.

आता मी हे वर जे काही लिहिलंय, त्यामागे थोडासा माझ्या अनुभवाचा भाग आहे. मी कधीही कोणत्याही बाबा, महाराज, बापूंच्या नादी लागलेलो नाही परंतू ‘बाबा’ होण्यातली किंचित झलक आणि त्यातली झींग काही काळ मी स्त: अनुभवली आहे. माझे जवळचे मित्र याला साक्षी आहेत.

मी गेली २५ वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आहे. सुरुवातीला प्रयोग आणि अभ्यास म्हणून मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या कुंडल्या पाहायचो. त्यातल्या काहीजणांबाबत मी वर्तवलेला अंदाज अगदी बरोबर यायचा, तर काहींचा नाही. ज्यांच्याबद्दल माझा अंदाज चुकायचा, ते काहीच बोलायचे नाहीत, परंतू ज्यांच्याबाबतीत मी अगदी बरोबर अंदाज वर्तवलेला असायचा, ते मात्र मिळेल त्याच्याकडे माझी आणि माझ्या ‘ज्ञाना’ची स्तुती करत सुटायचे. असं करता करता माझ्याकडे कुंडली पाहाण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मी ही हे मनापासून एन्जाॅय करू लागलो. प्रसिद्धी, मानसन्मान आणि वरती दक्षिणा यांचा मोह कुणाला हो होणार नाही..!

पण मी सावरलो तेंव्हा, जेंव्हा एका बैठ्या वस्तीत एका मित्राच्या ओळखीच्यांकडे पत्रिका पाहायला गेलो तेंव्हा. एक सांगतो, गरीबांची भक्ती खरंच उच्च दर्जाची असते. मन:पूर्वक आणि स्वत:च्या आर्थिक कुवतीच्या पलिकडे जाऊने हे लोक भक्ती करतात. मी जेंव्हा त्या चाळीत गेलो, तेंव्हा माझ्यासाठी त्यांनी केलेली तिकडची अरेंजमेंट पाहून मी चक्रावून गेलो. माझ्यासाठी उच्चासन, समोर टि-पाॅय, पाण्याचा तांब्या, उदबत्ती आणि समोर १५-२० सर्व वयाची माणसं बसलेली. यात बायकांचं प्रमाण जास्त. पुरुष मंडळी कोपऱ्यातून उभी. मला कळेनचना हा काय प्रकार तो. मग कळलं, की मी ज्यांच्याकडे पत्रिका पाहायला गेलो होतो, त्यांनी आजुबाजूच्या त्यांच्या परिचितांना माझ्याबद्दल बरंच काही आणि मी जे नाही ते ही सांगीतलं असल्यानं, ते ही बाया-बापडे त्यांचं ‘नशिब’ माहित करून घेण्यासाठी आणि त्यावर ‘उपाय’ जाणून जमले होते.

हा ‘दरबार’ बघून मला दडपण आलं होतं. पण आलोय म्हटल्यावर ज्यांची पत्रिका पाहायला गेलो होतो, त्यांची पत्रिका पाहाणं भाग होतं. मी तेवढंच करेन व इतर सर्वांच्या पत्रिका पाहाण्यासाठी नंतर परत येईन, असं सांगून निघालो. माझ्या पायावर डोकं ठेवण्यासाठी आणि पोरांना पायावर घालण्यासाठी जेंव्हा म्हाताऱ्या-तरण्या बाया पुढे येऊ लागल्या तेंव्हा मात्र मी सावध झालो. मी कटाक्षाने असं काही करायचं नाही हे सांगून तिथून निघून गेलो.

हे सर्व एका मनाला सुखावतही होतं परंतू मी त्यांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकणार याची जाणीवही मला होती. माझ्या सदसदविवेकबुद्धीने मला तिथे थांबण्याचा सल्ला दिला आणि मी पुन्हा त्या नादाला गेलो नाही. पण इथे बाबा कसा बनतो हे मात्र मी पुरेपूर अनुभवलं. मनात आणलं असतं तर मी तसं क्षणात करू शकलो असतो. परंतू सावरलो. माझे मित्र आजही मला मस्करीत सांगतात, की तू आश्रम खोल, खुप पैसा कमवू आपण म्हणून. ही मस्करी असली तरी त्यात आपल्या समादाचं विदारक वास्तव दडलं आहे हे विसरून चालणार नाही.

ज्या कुटुंबासाठी मी त्या चाळीतल्या वस्तीत गेलो होतो, त्यांच्यासाठी मी आजही खुप मोठा आहे आणि मी म्हणेन ते, ते लोक करायला तयार असतात. मी त्यांना माझ्यापेक्षा त्यांना आवडणाऱ्या देवाची सेवा करण्याचा सल्ला देतो. पण एक सांगतो, देवाची सेवा कोणालाच करायची नसते, सर्वांनाच जालीम ‘उपाय’ हवा असतो आणि त्या ‘उपाया’पायीच ‘संधी’च्या शोधात असलेले संधी’साधू’ अशा लोकांना सर्वच अर्थाने नागवित असतात. हेच लोक अशा लोकांची हमखास गिऱ्हाईकं असतात.

सुप्रसिद्ध लेखक श्री. अनिल अवचट यांचं ‘मांत्रिक’ हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावं. बुवांचं आणि त्यांच्या नादाला लागलेल्या भक्तांचं मानसशास्त्र अवचटांनी अतिशय उत्तम प्रकारे उलगडून दाखवलंय. यातला पुण्यात काही वर्षांपूर्वी होऊन गेलेला वाघमारे बाबा तर स्त्रीयांनी खरंच लक्षात ठेवण्यासारखा. सर्व समस्यांवर उपाय म्हणून ‘योनीपुजा’ करायला सांगणाऱ्या या बाबाच्या नादाला अगदी डाॅक्टर, इंजिनिअर, प्राध्यापिका असलेल्या उच्चविद्या विभुषित बायका लागलेल्या होत्या. जमलेल्या सर्व बायकांना नग्न करून वर्तुळात बसवून तो एखादीची योनीपुजा करायचा आणि मग सर्वांसमक्ष तिचा भोग घ्यायचा. सासुचा भोग सुनेसमोर, आईसमोर मुलीचा भोग आणि हे सर्व दैवी उपायाच्या नांवाखाली. या बायकां घरी ‘उपाशी’ असतात हे वर याचं पकडलं गेल्यानंतरचं समर्थन.

स्त्रीयांचा भोग प्रत्येक साधू म्हणवणारा भोंदू याच पद्धतीने घेत असतो. काही प्रमाणात वाघमारेबाबाचं वरील समर्थन या ठिकाणी खरं असतं, असं मलाही वाटतं आणि याला समाजशास्त्रीय कारणं आहेत, त्यावर मी पुढे केंव्हातरी स्वतंत्र लेखन करेनव. पण बऱ्याच ठिकाणी प्रथम उपाय म्हणून, नंतर थ्रील म्हणून व नंतर नाईलाज म्हणून बायकांचा हा ‘भोग’ चालू राहातो आणि जेंव्हा अति होतं तेंव्हा सारं उघडकीस येतं. राम रहीम बाबाने फक्त दोनच साध्वींवर बलात्कार केले असं म्हणनं म्हणजे आपलीच फसवणूक करून घेतल्यासारखं आहे. दोन जणी अति झाल्याने पुढे आल्या तर आणखी अगणीत बायका-मुलींना अनेक कारणांमुळे गप्प राहायला भाग पाडलं जाऊ असलं शकेल.

स्त्रीला ‘भिक्षा’ म्हणून किंवा ‘चढावा’ म्हणून ‘डावा’वर लावायची आपली परंपरा पांडवांइतकी जुनी आहे आणि पुढेही चालूच राहाणार आहे. राम रहीम पहिला नाही आणि शेवटचा तर नाहीच नाही. आणखी काही बाबा, बापू, माॅं हे स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणून हे सारे खेळ या क्षणालाही करत असावेत असं म्हटलं तर खोटं ठरू नये. जोपर्यंत बाबांना राजाश्रय आहे आणि लोक देवापेक्षा उपायांच्या शोधात आहेत, तो पर्यंत आपल्या समाजात असंच चालू राहाणार.

मेरे भारतीय महान
अक्कल ठेवली गहाण..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on बाबा, भक्त आणि बायांचा ‘भोग’; एक स्वानुभव

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..