काय मग गंमत ऐकायची आहे! बरं!!
तर साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, आमच्या ऑफिसमधला संपतराव नऊ महिन्याची पोटुशी बायको (स्वतःची) घेऊन दवाखान्यात जाताना मला भेटला. संपत खरंतर देव माणूस, तीन पोरींचा बाप, तुटपुंज्या पगारात पण अगदी सदानंदी. पण घरच्यांच्या ‘पोराच्या’ नादापायी हे दवाखान्याचे खेटे घालतोय. मला त्याची कीव आली. मी अगदी चालत चालत सहज बोललॊ “संपतराव, ह्या वेळी नक्की पुत्रप्राप्ती आहे. बिनघोर राहा”. हे ऐकून संपतराव आणि परिवार जाम खुश झाले आणि माझ्या हातात पेढा देण्याचा तेवढ बाकी ठेवून छान हसले.
दोन दिवसांनी पुन्हा संपतराव आमच्या दारात उभा, पेढे घेऊन. त्याचा आनंद ओसंडून वाहत होता, तो मागच्या भेटीतला राहिलेला पेढा माझ्या हातात ठेवत, तो जवजवळ ओरडत बोलला ” साहेब, पुत्रप्राप्ती झाली, सगळी तुमची कृपा.” मला एकदम हसू फुटल ते दाबतच मी त्याच अभिनंदन केलं. दुसऱ्या दिवशी हि खबर आणि माझी (खरं तर नसलेली) कृपा त्यांनी पूर्ण ऑफिसभर पसरवली. अन ह्या दिवसापासून पूर्ण ऑफिस मला आध्यत्मिक नजरेने बघायला लागलं.
दोन महिन्यांनी माझ्या बाजूच्या केबिनच्या अमरची डेट होती, बायकोच्या डिलिव्हरीची. आता अमरनी माझ्या मागे पालपूद लावलं, “बाबाजी, मला काय होणार, सांगा ना?” खरं तर मी काय सांगणार पण त्याला शमवण्यासाठी मी बोललो “मला घरी जेवायला बोलावं, मग सांगतो मी” आणि त्याच रात्री मला आमंत्रण आल आणि एका-दुका करत मी “पोरगा होणार” म्हणून ठोकून दिल आणि काय कमाल, अमर हि पेढे वाटताना ऑफिसभर माझी महती गायला लागला.
मग ऑफिसचा महा-चिक्कू यादव येऊन मला विचारू लागला “बाबाजी, माझं काय होणार. मला आहे कि नाही पुत्र प्राप्ती?” आणि मस्करी म्हणून मी त्याला बोललो कि “जर तु अख्या ऑफिसला हॉटेलात पार्टी देशील तर तुला नक्की मुलगा होणार, नाहीतर ……..” आणि त्याने पार्टी देणं म्हणजे आठव आश्चर्यच झाल असत. आणि त्याचीच करणी, त्याला एक छान सुरेख मुलगी झाली. पण त्या हराम्यांनी खटू होऊन, बर्फी वाटत माझे वचन सगळ्या ना सांगू लागला आणि पश्चाताप करू लागला.
आता मात्र मला मज्या येत होती. हळू हळू आता ऑफिस मधली जनता माझ्याकडे त्यांच्या शंका-अडचणी घेऊन येऊ लागले आणि निरसनाची- उपायांची अपेक्षा ठेवू लागले. काही बुधू लोकांसमोर, मी माझी बोधिक- ठोकून देत असे. लोकही मी सांगेल ते करत होती आणि इच्छाप्राप्ती झाल्यावर काही-काही भेट म्हणू देत होती. माझी सौ जाम खुश होती, या वरकमाईवर. मला ही बर वाटत होत. सहा महिन्यात माझी महती पूर्ण शहरभर पसरली. मग मी आठवडातून बौद्धिक आणि अध्यात्मिक भेटीचे दोन वार पक्के केले. त्या दिवशी खर तर माझी रजा पडायची पण कमाई मात्र भरपूर मिळायची. देव कृपेने ७० टक्के लोकांचे काम पण फत्ते होत हाती. बिसनेस जोमात चालत होता. बायकोच्या आदेशावरून आता मी शर्ट-पँट घालायचं सोडून शुभ्र झब्बा-पंचा परिधान करू लागलो. जटा-दाढी वाढवून बसलो. बायकोनी तर भगव्या रंगाच्या ५ सुती साड्या विकत घेतल्या, धार्मिक फील यावा म्हणून.
कुणाचं लग्न जमत नाही, कुणी नौकरी लागत नाही म्हणून, घरेलू भांडण-तंटा अश्या कैक अडचणी आता मी रिसॉल्व करू शकतो असं लोकांना वाटायचं. मूळ नाव मागे पडून आता मी अंधेरीचे- बाबाजी म्हणून प्रसिद्धीला आलो होतो. काही महाभोग अनुयायीनी तर काही ठिकाणी “सर्व अडचणींवर जालीम उपाय, चला मग अंधेरीच्या बाबाजी भेटाय” असे जागोजागी बॅनर लावले होते.
मधल्या काळात, अभ्यास म्हणून काही जादू-टोण्याची पुस्तकही मी वाचली. धार्मिक पुस्तकांचा संच विकत घेवन तो शोकेसेमध्ये भरला. आध्यत्मिक आणि धार्मिक शब्द आणि कथा नीट पाठ केल्या अगदी भल्या पहाटे उठून.
एकदा तर आमचे मोठे साहेब माझ्या दरबारात आले. त्यांना पाहून मी हबकलो, खरं तर गडबडलो, नेहेमीसारख. आणि मग शिरस्त्याप्रमाणे उठून “गुड मॉर्निंग, सर” म्हणालो मोठ्यांनी, अगदी वाकून. साहेब एकदम ओशाळले आणि मला हात जोडून “बसा बसा, बाबाजी” म्हणाले.
अरे हो, मी विसरलो होतो, साहेब आता माझ्या दरबारात आहे. कुठलीशी अडचण घेऊन आले असतील, काय असेल बरं. कामाचा ताण, घरगुती अडचण, कि नवीन सेक्रटरी पोरीला कस पटवायचं, कि असच काही. मी पण मग माझ्या मोड मधून जाऊन, साहेबाना “बस बाळा, काय अडचण! बोल?” म्हणालो.
मग त्यांनी ऑफिशियल प्रश्न विचारला “बाबाजी, तुम्ही सर्वज्ञानी आहात. कृपा करून सांगा, दिल्ली च टेंडर भरू कि बडोदा?”
ह्या प्रश्नाला माझ्याकडे पक्क उत्तर होत “बडोद्याचे भर, वत्सा” अशी मी आज्ञा केली. कारण दिल्लीच्या टेंडरच सर्व काम मीच केलं होत आणि त्यात बऱ्याच चुका होत्या, हे मी जाणून होता. साहेबानी तो कौल ऐकला आणि कंपनीला ते बडोद्याचे मोठे काम मिळाल. मग साहेब पण माझ्यावर जाम खुश झाले (दिल्लीच काम मात्र हुकलं असूनही).
मागच्या वर्षभरात मी जनतेची गलेगठ माया (द्वर्थीक) प्राप्त केली. गावाकडे भक्ताने गुरुदक्षिणा म्हणून दिलेल्या ५ एकर शेतीत, आध्यत्मिक शेती करण्याचा माझा कयास आहे आणि जमलच तर छानशा आश्रम हि बांधाव म्हणतो. भक्तजण आणि अनुयायी माझी भरपूर सेवा करतात. पण सौ ने माझ्या सेवेतही काही बंधने ठेवलीत, बिजनेस एथिक्स म्हणून. महिला भक्तगणांचे नेत्रसुख आणि स्पर्शसुख सोडून बाकी भोग वर्ज केले, च्या बदल्यात मला रत्नखचित सिंहासन देण्याचे मात्र तिने कबूल केले आहे, नुकसानभरपाई म्हणून.
आता फक्त अश्या आंधळ्या-भोळ्या भक्तगणांची कृपा अशीच राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. काय आहे, बुधू लोकांसमोर बाबाजी म्हणून बौद्धिक सोडून त्यांना उल्लू बनवणं तस खूप सोपं आहे. आणि मला विश्वास आहे हे येडपट भक्तगण/अनुयायी उल्लू बनत राहणार आणि माझ्यासारख्या बनेल भोंदू लोकांची “बाबाजी” म्हणून चलती चालत राहणार”.
जय हो! जय हो! बाबाजी!!
— मनिष वसंतराव वसेकर, परभणी
Leave a Reply