१) सन १९८४- वर्षाखेर असावी. सातारच्या सातारा पॉलीटेक्निक मधील माझे तास संपवून मी पुण्याला जाण्यासाठी स्टॅण्डवरील लालपरीत बसलो होतो. दुपारी दोन-अडीच वाजले असतील. बस ठासून भरली होती. अचानक एक व्यक्ती आतमध्ये शिरली आणि बसण्यासाठी जागा शोधत होती. आणि तिच्या पाठोपाठ आणखी एक व्यक्ती प्रगटली.
मी पाहताक्षणी त्यांना ओळखले- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! पुढे आलेल्या व्यक्तीजवळ एक पिशवी होती आणि तिने अजीजीने सर्वांना विनंती करायला सुरुवात केली – ” अहो, यांना ओळखलं कां ? हे बाबासाहेब पुरंदरे ! पुण्याला निघाले आहेत. कृपया त्यांना बसायला जागा देता कां ?”
एवढं औदार्य कोणाकडे होतं, बसलेली हक्काची जागा सोडून दोन -तीन तास अवघडत बसमध्ये उभं राहायचं? मी उठून त्यांना बसायला जागा देणार,एवढ्यात माझ्या मागील रांगेत बसलेल्या एका व्यक्तीने बाबासाहेबांना आदरपूर्वक स्वतःची जागा दिली. आम्ही सहप्रवास केला पण ते अखंड विचारमग्न होते. त्यांच्याशी बोलण्याची संधी काही मिळाली नाही.
२) १९९०-९१ साल असावे. इस्लामपूरच्या दादासाहेब मंत्रींच्या शाळेत बाबासाहेब एका व्याख्यानाच्या निमित्ताने आलेले होते. दुपारची वेळ- शाळेच्या मैदानात प्रचंड गर्दी जमलेली. आम्हांला निमंत्रण असल्याने आणि शिवशाहीरांना ऐकण्याच्या उत्सुकतेने आम्ही तेथे पोहोचलो. बाबासाहेब आले. परिचय,स्वागत वगैरे सोपस्कार झाले. बाबासाहेब व्याख्यानाला उभे ठाकले. अचानक ३-४ फोटोग्राफर्सनी स्टेजला वेढा घातला. बाबासाहेब किंचित त्रस्त झाले. मग शांतपणे एवढंच बोलले-
” मी आत्ताच तुम्हांला हव्या त्या पोझेस देतो, पण नंतर व्याख्यानात व्यत्यय आणायचा नाही.”
शब्द खंबीर आणि ठाम होते.
खरोखरच माइमिंग केल्याप्रमाणे त्यांनी भाषणमुद्रा केल्या. त्यांचेच फोटो झाले.दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर विराजमान झाले.
फोटोग्राफर्स खुश. आपले काम संपवून तेही प्रेक्षकांमध्ये सामील झाले.
पुढे साधारण दीड तास आम्हांला विनाव्यत्यय श्रवणसंधी मिळाली.
परिसाचा एवढा सहवास अजूनही पुरतोय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply