नवीन लेखन...

बच्चू.. (काल्पनिक कथा)

रविवारची दुपार होती. मी मस्त जेवण करुन गॅलरीतील माझ्या आरामखुर्चीत विसावलो होतो. निवृत्तीनंतरचा काळ हा पुण्यातच घालवायचा हे माझं खूप वर्षांपासूनचं स्वप्न होतं. त्या स्वप्नपूर्तीचं सुख मी निवांतपणे उपभोगत होतो..
सहजच मोबाईलवर फेसबुक चाळताना, मेसेंजरवर एक मेसेज आला. मी मेसेंजर ओपन करुन पाहिलं, तर ‘रेवती जोशी’ असं नाव दिसलं. तिनं मला ‘Hi’ केलेलं होतं..
रेवती, हे नाव वाचल्यावर मी त्रेपन्न वर्षांपूर्वीच्या जे जे स्कूल आॅफ आर्ट्सच्या इंद्रधनुषी काळात जाऊन पोहोचलो..
माझं काॅलेजचं दुसरंच वर्ष चालू होतं. आमचे सर, प्रत्येक आठवड्याला नवीन असाईनमेंट करायला द्यायचे. चाळीस मुलांच्या वर्गात मी व माझे तीन मित्रच, इमानदारीत वेळेत दिलेली असाईनमेंट पूर्ण करायचो..
एकदा आमचा वर्ग भरल्यावर, एक सुंदर मुलगी आमच्या वर्गात नव्याने दाखल झाली. ती दुसऱ्या काॅलेजमधून आलेली होती. तिची घरची परिस्थिती श्रीमंतीची असावी, कारण ती येताना स्वतःची कार घेऊन यायची. कधी पंजाबी ड्रेस तर कधी टी शर्ट व पॅन्टमध्ये, काॅलेजच्या कॅम्पसमध्ये ती बिनधास्त वावरायची.
मी माझ्या कामात नेहमी मग्न असे. एकदा सरांनी रोमन लेटरिंगची असाईनमेंट करायला सांगितली. मी माझ्या पद्धतीने ती करीत होतो. माझ्या बॅनर करण्याच्या सरावामुळे माझ्या दृष्टीने ते काम अगदी सोपं होतं..
‘हॅलो संजय, मला जरा मदत करणार का?’ ती नवीन आलेली सुंदर मुलगी, मला आर्जवाने विचारत होती. तसं पहायला गेलं तर खादीचा झब्बा व पांढरा पायजमा व खांद्यावर शबनम बॅग असा मी साधा माणूस. तिनं पुन्हा तोच प्रश्न केल्यावर मी तिला विचारलं, ‘काय काम आहे?’ तिला ती लेटर्स करताना स्पेसिंगचा अंदाज येत नव्हता. मी तिला सोप्या भाषेत समजावून सांगितलं.. कागदावर मार्किंग करुन दिलं.. तिला ते पटलं..
संध्याकाळी पाच वाजता सरांनी, सर्वांना असाईनमेंट जमा करायला सांगितल्या. संपूर्ण वर्गातून आम्हा चौघांच्याच असाईनमेंट पूर्ण झाल्या होत्या. बाकीच्या मुलांना, सरांनी अजून दोन दिवसांची मुदत वाढवून दिली.
सोमवारी मी सांगितल्याप्रमाणे तिने तिची असाईनमेंट पूर्ण करुन सरांकडे दिली. दुपारच्या सुट्टीत ती मला कॅन्टीनमध्ये घेऊन गेली. ‘तुला इथलं काय खायला आवडेल?’ तिनं मला प्रश्न केला. मी ‘सॅण्डविच’ सांगितल्यावर, ती काऊंटरवरुन दोन डिश घेऊन आली. त्यानंतर काॅफी झाली. तिच्याशी गप्पा मारताना मला समजलं की तिचं नाव रेवती आहे. तिचे वडील, एका स्वदेशी फाऊंटन पेनचे उद्योजक आहेत.
त्यानंतर आमच्या वर्गात भेटी होत राहिल्या. असाईनमेंटमध्ये काही अडचण आली तर ती मला विचारत असे. एके दिवशी सकाळीच, क्लास सुरु झाल्यावर ती माझ्या बेंचजवळ आली आणि हातातील, कारची किल्ली माझ्यासमोर ठेवून तिच्या जागेवर जाऊन बसली.
मी दिवसभर रंगकामात मग्न होतो. दुपारी सुट्टीतही मी बाहेर पडलो नाही. संध्याकाळी जाताना ती पुन्हा माझ्याकडे आली व कारची किल्ली घेऊन गेली..
असं तिचं वर्गात आल्यावर माझ्याकडे किल्ली ठेवणं व जाताना घेऊन जाणं वर्षभर चाललं होतं. मी कधीही तिला, त्याचं स्पष्टीकरणही विचारलं नाही.
बघता बघता वर्ष संपलं. परीक्षेचा शेवटचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशी तिनं मला किल्ली ठेवतानाच बजावलं, ‘आजचा पेपर झाल्यावर, मी तुला ट्रीट देणार आहे.. आपल्याला बाहेर जायचंय. मी ‘होकार’ दिला..
पेपर झाला. ती माझ्याकडे आली व किल्ली घेऊन निघाली. मी तिच्या मागोमाग चालू लागलो. तिने कारजवळ येताच मला पुढे बसायला खुणावले. आम्ही दोघेही हाॅटेल ताजला पोहोचलो. तेथील पाॅश रेस्टॉरंट मध्ये बसल्यावर तिने मला विचारले, ‘संजय, काय खाणार?’ मी ‘सॅण्डविच चालेल’ असं म्हणालो. तिने आॅर्डर दिली व बोलू लागली..
‘मी पहिल्या दिवशी वर्गात आले, तेव्हा तू मला इतरांपेक्षा वेगळा दिसलास. मी मैत्रिणींकडे चौकशी केली तेव्हा मला समजलं की, तुझा स्वभाव अबोल आहे. कुणाशीही कामापुरतंच बोलतोस.. कुणाच्याही खाजगी गोष्टीत, विनाकारण ढवळाढवळ करत नाही.. मुलींशी कधीही अघळपघळ बोलत नाही..
मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. लहानपणापासून लाडाकोडात वाढलेली. वडिलांनी व्यवसायात वाहून घेतल्यामुळे, त्यांचं घरात कधीही लक्ष नसायचं. आई, तिच्या मैत्रिणी व पार्ट्यांमध्ये मशगुल असायची. मला पाॅकेटमनी भरपूर मिळायचा त्यामुळे मला चुकीच्या संगतीनं तंबाखूचं व्यसन लागलं. गेली चार वर्षे मी हे व्यसन सोडण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, तरीदेखील ते काही सुटलं नाही.
मला लागणारी विशिष्ट तंबाखू ही फ्लोरा फाऊंटन चौकातील एका दुकानातच मिळते. मी या काॅलेजमध्ये आल्यावर, मधल्या सुट्टीत कारने त्या दुकानात जाऊन दोन पुड्या घेऊन येत असे. एक दुपारसाठी व दुसरी रात्रीसाठी.
एकदा मी ठरवलं, माझ्या कारची किल्ली जोपर्यंत माझ्या हातात आहे, तोपर्यंत माझं हे व्यसन काही सुटणार नाही. ही किल्लीच दिवसभर माझ्याकडे नसेल तर मी बाहेर पडूच शकणार नाही.. त्यासाठी मी तुझी निवड केली. मला माहीत होतं, की तू मला किल्ली का ठेवली? असं कधीही विचारणार नाही.. आणि तसंच घडलं.. मी रोज किल्ली ठेवत होते व जाताना परत घेत होते..
वर्षभरात माझं तंबाखूचं व्यसन पूर्णपणे सुटलं. आता ती तंबाखू कुणी समोर ठेवली तरी, ती मी खाणार नाही..’
एवढं बोलून ती माझ्याकडे एकटक पाहू लागली. मी म्हणालो, ‘चला बरं झालं, माझ्यामुळं एका व्यक्तीचं तरी ‘भलं’ झालं. यापुढे अशीच आनंदात रहा आणि उर्वरित आयुष्याचा पुरेपूर आनंद घे. त्यासाठी माझ्याकडून तुला आभाळभर शुभेच्छा!!’
‘संजय, मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे, त्यामुळे मी तुला प्रेमानं ‘बच्चू’ म्हणू शकते! तुझ्या या निरागस स्वभावामुळे, तू मला फार आवडतोस. माझ्या वडिलांची सुप्रसिद्ध ‘पायलट’ फाऊंटन पेन तयार करणारी कंपनी आहे. मी मात्र तुला हे अमेरिकन बनावटीचं ‘पार्कर पेन’, माझी एक आठवण म्हणून तुला भेट देत आहे. जेव्हा कधी तू हे पेन हातात घेशील, तेव्हा या ‘नक्षत्रा’ची तुला नक्कीच आठवण होईल!!’ एवढं बोलून रेवतीनं हातातील रुमालाने डोळ्यांच्या कडा टिपल्या..
मी ते पेन माझ्या शबनम बॅगमध्ये ठेवलं. आम्ही दोघेही उठलो. तिनं मला तिच्या कारमधून माझ्या घरापाशी सोडलं. त्या तासाभराच्या प्रवासात मी एकही शब्द बोललो नाही.. ती मात्र ड्रायव्हिंग करताना समोरच्या छोट्या आरशातून माझ्याकडे पहात होती..
‌‌काॅलेजच्या तिसरं वर्ष सुरु झालं, मला वर्गात रेवती काही दिसली नाही. बहुधा तिनं काॅलेज सोडलं असावं. एकदा ड्राॅईंग मटेरियल घेण्यासाठी मी मार्केटमध्ये गेलो असताना, दुकानात रेवती दिसली. सुहास्य मुद्रेने ती स्वतःहूनच बोलू लागली, ‘कसा आहेस ‘बच्चू’?.. माझं लग्न ठरलंय. वडिलांनी माझ्यासाठी अमेरिकेतला मुलगा शोधलाय. पुढच्याच महिन्यात लग्न झालं की, मी अमेरिकेला जाणार आहे..’ मी हसून तिचं अभिनंदन केलं. तिनं हातातील ड्राॅईंगचं सामान कारमध्ये ठेवलं व एखादी सुगंधी झुळूक स्पर्शून जावी तशी ती निघून गेली..
माझं काॅलेज पूर्ण झालं. व्यवसायात रमलो. लग्न झालं. मुलगी झाली. चाळीस वर्षे काम केल्यानंतर पुण्यात येऊन स्थायिक झालो. मुलीचं लग्न झालं. मनासारखा जावई मिळाला. आता ‘नातू आणि आज्जो’ यांची मस्ती चालू असते..
आजच मेसेंजरवर ‘रेवती’चं Hi दिसल्यावर मला संपूर्ण भूतकाळ आठवला. मी तिच्या Hi ला ‘नमस्कार’ टाईप केलं. तिनं माझा मोबाईल नंबर मागितला, तो मी दिला. तिनं फोन करुन मला डेक्कनवरील ‘वैशाली’त बोलावलं.
मी गेलो. पन्नास वर्षांपूर्वीच्या त्याच झब्बा व पायजम्यातील मला पाहून, रेवती हसू लागली.. ‘बच्चू’ तुझ्यात काडीचाही बदल झालेला नाही.’ मी पाहिलं, रेवतीतही बदल झालेला नव्हता.. फक्त केसांना रुपेरी कडा दिसत होत्या. आम्ही दोघांनीही काॅफी घेतली. ती अमेरिकेतील गोष्टींवर भरभरून बोलत होती, मी ऐकत होतो.. ती तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आलेली, आजच परतणार होती.. तिनं माझीही आपुलकीने चौकशी केली..
‘संजय, तुझ्यासाठी मी एक भेट आणलेली आहे.’ असे म्हणून तिने एक विन्सर न्यूटनची कंपनीची कलर बाॅक्स दिली. ‘त्यावेळी तू मला भेटला नसतास, तर कदाचित मी व्यसनाच्या आहारी गेले असते.’ रेवती बोलत होती.. ‘आज मी जी काही आहे, ते केवळ माझ्या समोरच्या या ‘बच्चू’मुळे!’
रेवती आली तशी निघूनही गेली. मी मात्र ती कलरबाॅक्स, शबनम बॅगेत ठेवून त्या इंद्रधनुषी काळात पुन्हा एकदा हरवून गेलो..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२-११-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..