आदिवासींच्या बोहाडा या उत्सवासाठी विविध मुखवटे बनविण्याची वडिलोपार्जित कला जोपासत स्वत:च्या कर्तृत्वाने कागदाच्या लगद्यापासून सुंदर मूर्ती बनविण्याचे काम जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील पेपरमेशी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट करीत आहे. ही कलाकृती त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेण्याचा
मान मिळविला आहे.
समाजात सण उत्सव साजरे केले जातात. आदिवासींमध्ये बोहाडा हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवासाठी वेगवेगळ्या देवदेवतांचे ५२ मुखवटे तयार केले जातात. ते मुखवटे पुरुष मंडळी परिधान करतात हे मुखवटे घालून गावभर मिरविले जातात. हेच बोहाडयाचे मुखवटे जव्हार जवळील रामखिंड येथे तयार करीत असत. आकर्षक अशा या मूर्ती बनविण्यात भगवान, सुभाष, नवनाथ व सखाराम ही मंडळी पारंगत झाली होती. बनविण्याची ही कला वडिलांकडून अवगत केली व त्यात पारंगत होऊन भगवान व सुभाष यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने ती वाढविली. त्यासाठी त्यांना बचत गटाची मोलाची साथ मिळाली. त्यांच्या या कलेला विविध प्रदर्शनात मागणी येऊ लागली.
रामखिंड हे जव्हार तालुक्यातील छोटेसे गाव. डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात या उपजत कलेच्या विकासाला फारसा वाव नव्हता. बनविलेल्या मूर्तींना,वस्तूंना हक्काची बाजारपेठ नव्हती. व्यवसाय वाढीसाठी अर्थसहाय्याची गरज होती. कारण या कलाकाराजवळ स्वत:च्या घराव्यतिरिक्त शेती नाही की जमिन नाही. कुटूंबाचा विस्तार वाढू लागला. एक भाऊ अशिक्षित तर तिघांचे जेमतेम शिक्षण त्यामुळे नोकरी नाही अशा बिकट परिस्थितीत अशिक्षित भगवान कडू यांनी दहा सदस्यांचा पेपरमिशी स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन केला. त्या माध्यमातून शासन भरवित असलेल्या विविध प्रदर्शनात भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात मूर्तीची विक्री करून पैसा मिळू लागला.
या मूर्ती बनविण्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर न करता हातानेच मूर्तींना आकार देण्याचे काम केले जात होते. रद्दी कागद पाण्यात भिजवून उखळीमध्ये लगदा करणे, जंगलातील चेरीच्या झाडाची साल पाण्यात
भिजवून डिंक बनविणे आदी काम करावे लागते. या सर्व साहित्याचा वापर करून हाताने कासव, हरिण, देवदेवतांच्या मूर्ती बनविले जाते. त्यामुळे मूर्ती बनविण्यास अधिक वेळ जात होता म्हणून कागदाचा लगदा करण्याचे यंत्र व इतर साहित्यासाठी या बचतगटाने जव्हारच्या महाराष्ट्र बँकेतून २ लाखाचे कर्ज घेतले व त्यापैकी १ लाख ७ हजार रुपयाची परतफेड केलेली आहे. अशा या कारागिरांची दखल शासनाने ही घेतली. सुभाष धर्मा कडू यांना शासकीय खर्चाने एडबर्ग येथे पाठविण्यात आले. तेथे ही त्यांनी मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून २५ मूर्तींची विक्रीही केली. दिल्ली हट, महालक्ष्मी सरस, भिमथडी सारख्या प्रदर्शनात स्टॉल लावून या वस्तूंची विक्री केली जाऊ लागली तशी मागणी वाढत गेली. हुबेहुब मूर्ती बनविलेली पाहून ही हातानेच केली असावी यावर ग्राहकांचा विश्वास बसत नसे. त्यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांच्या समोर मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक ही हा बचतगट करीत असे. त्यांच्या या कलेकडे आकर्षित होऊन राज्य व राज्याबाहेरील अनेक व्यक्ती, कारागिर ही कला शिकण्यासाठी रामखिंड येथे येऊ लागले. आणि प्रत्यक्ष ही कला शिकून घेऊ लागले त्यातूनही त्यांना पैसा मिळू लागला. अनेक पारितोषिकांनी त्यांना गौरविण्यात आले.
असे हे गुणवंत कारागीर गरिबीमुळे गाव, तालुका, जिल्ह्याच्या सीमेपलीकडे जावू शकले नाही. परंतू अंगी असणा-या या कलेच्या साधनेतून व बचत गटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर जावू शकले. कारण शासनाच्या मदतीने हे शक्य होऊ शकले, असा विश्वास सुभाष धर्मा कडू यांनी व्यक्त केला. गरिबीमुळे पुरेसे शिक्षण घेऊ न शकलेल्या या कुटूंबात त्यांची मुले आता शिक्षण घेऊ लागली आहेत. दारिद्र्याशी झटणार्या या कुटूंबाच्या कलेच्या साधनेला शासनाचा आधार मिळाला आणि साता समुद्रापलीकडे ही कला पोहचू शकली.
(महान्यूजच्या सौजन्याने)
— बातमीदार
Leave a Reply