हा लेख गेल्यावर्षीचा असला तरी आज तितकाच ताजातवाना वाटतो आहे .
स्थळ : बदामी केव्ह , कर्नाटक
दिनांक : २३ नोव्हेंबर २०१९ , सायं.
४ वाजता.
गगनाला गवसणी घालणाऱ्या, उंचच उंच असणाऱ्या आणि पाहताक्षणी मनाला भुरळ पाडणाऱ्या दोन दैवतांची अनपेक्षित भेट होईल असं भविष्य आज कुणी सांगितलं असतं तर मी त्याला चक्क वेड्यात काढलं असतं .
कर्नाटकातील बदामी येथील अतिशय उंच आणि अतिविशाल खडकात कोरलेली लेणी पहायला मी आणि सौभाग्यवती जातो काय आणि सर्वात उंच असलेल्या खडकात कोरलेल्या लेण्यांसमोरच्या प्रांगणात निवांत बसलेले डॉ . प्रकाश आमटे आणि सौ. मंदाताई आमटे, दिसतात काय , सगळं अगदी अनपेक्षित आणि तरीही आनंददायक .
खूप उंचीवर चढून आल्यानंतर आलेला सगळा थकवा क्षणार्धात निघून गेला . आणि आम्ही उर्वरित लेणी पाहण्याचे सोडून , व्यावहारिक जगाच्या कठीण पाषाणावर,माणुसकीची मंगल लेणी परिश्रमाने निर्माण करणारा एक महामानव निवांत बसला होता ,त्याचं दर्शन घ्यायला गेलो .
अगदी अनपेक्षित .
वर अवघा निळा आसमंत .
सभोवती बदामी रंगाच्या खडकाची पार्श्वभूमी.
खाली पाहिल्यावर बोटाएवढ्या दिसणाऱ्या माणसांची गर्दी.
आणि खूप उंचीवर ,स्निग्ध हास्य करणाऱ्या , ऋषितुल्य प्रकाशभाई आणि मंदाताई .
चेहऱ्यावर प्रसन्न हास्य , स्वरातला साधेपणा .
त्यांना पाहिल्यावर वाटलं अमर्याद आकाश आपल्यासमोर हसतमुख रुपात उभ आहे.
नमस्कार केल्यानंतर तर आकाश अवघडल्यासारखं झालं होतं.
नियती सुद्धा किती विलक्षण…
ऑक्टोबर मध्ये आनंदवनात त्यांना भेटायला जाण्याचं आम्ही मित्रमंडळींनी ठरवलं होतं .
पण पाऊस , आम्ही आणि रेल्वेची तिकिटं , यांची सांगड जमता जमली नाही .आणि राहूनच गेलं.
पण नियतीनं आमची भेट घडवून आणली .
खरतर आसपासचा देखावा विलक्षण होता .
वर अथांग निळाई.
खडकाला आकार देणाऱ्यांची समृध्द कला आजूबाजूला .
खूप उंचीवर असल्यानं भणाणणारा वारा.
आणि अनपेक्षित झालेलं देवदूतांचं दर्शन .
जणू काय ते प्रतीकच भेटलं होतं .
माणुसकीचं अथांग आभाळ…
सभोवती परिस्थितीचा कठीण पाषाण असूनही त्याला वेगळ्या रुपात साकार करण्याची वृत्ती.
वाऱ्या वादळांना तोंड देत स्थिर राहण्याची वृत्ती.
आणि घेतला वसा न सोडण्याची प्रवृत्ती…
सगळं सगळं मला त्या क्षणी जाणवून गेलं आणि मी नतमस्तक झालो .
आभाळभर उंचीची दोन माणसं मला अनपेक्षित भेटली आणि कृतार्थ वाटलं .
आणि आपली एक सवय असते ,नाही का …
तशी मलाही सवय आहे, छायाचित्र काढण्याची.
मोह आवरला नाही,
विचारलं ,
‘ आपल्यासोबत फोटो काढू का ?’
आणि अनपेक्षित उत्तर आलं.
‘ हो , आम्हालाही आनंद होईल .’
काही वेळेला असामान्य उंचीची मोठी माणसं , अनपेक्षित भेटतात आणि आयुष्याचं सार्थक होऊन जातं .
आमच्या आयुष्यातील एक दिवस खरंच सार्थकी लागला .
अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पेरणारा आणि ओलावा देणारा आनंदघन , काही क्षण आम्हालाही लाभला .
केवळ अविस्मरणीय !!!
— डॉ. श्रीकृष्ण जोशी . रत्नागिरी.
९४२३८७५८०६
——
छायाचित्र आणि नावासह सर्वाना पाठवायला हरकत नाही .
Leave a Reply