आज सर्वत्र अनन्यसाधारण महत्व असणारा कागद चिनी लोकांनी तयार केला. इ.स. १०५ पासून कागदाचा वापर चिनी संस्कृतीत होत असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. मुद्रण कलाही चिनी परंपरेतूनच उगम पावली. जोहान्स गुटेनबर्ग या जर्मन तंत्रज्ञाने इ.स. १४४५ मध्ये विविध प्रयोगांती ‘४२ ओळींचे बायबल’ छापून प्रसिद्ध केले. त्या पुस्तकाचे मुद्रण करण्याकरता गुटेनबर्गने धातूच्या हलत्या अक्षर खिळ्यांचा वापर एका यंत्राद्वारे करून कागदावर शाईने छापण्याचे तंत्र विकसित केले होते. त्यामुळेच मुद्रण कलेचा जनक म्हणून गुटेनबर्गचे नाव सर्वत्र घेतले जाते. भारतामध्ये मुद्रणकला १५५६ साली आली. पोर्तुगीजांनी पोर्तुगालमधून जहाजावरून छपाईयंत्र प्रथम गोव्यात आणले.
भारतात धर्मप्रसार करण्याच्या उद्देशाने बायबलच्या प्रती छापण्याकरिता हे छपाईयंत्र भारतात आणले गेले. पुढे हळूहळू या तंत्राचा प्रसार संपूर्ण भारतात झाला. मुद्रण कलेचा जनक गुटेनबर्ग याचा २४ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘जागतिक मुद्रण दिन’ म्हणून साजरा केला जातो. या मुद्रण दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लेखक-प्रकाशकांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ व आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात मोठे प्रकाशक ठरलेल्या सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात मुद्रण कलेच्या माध्यमातून केलेली ‘ज्ञानक्रांती’ आजच्या ‘ऑनलाईन’ जमान्यात समजून घेणे मार्गदर्शक ठरेल.
रामजी संतूजी आवटे आणि दामोदर सावळाराम यंदे या सत्यशोधकांनी मिळून ‘बडोदा वत्सल’ हा छापखाना बडोदा येथे सुरू केला. तर ११ ऑक्टोबर १८८५ रोजी आवटे आणि यंदे यांनी मिळून ‘बडोदा वत्सल’ हे साप्ताहिक सुरू केले. मराठी, गुजराती व हिंदी या तीन भाषेतील मजकूर असणारे हे साप्ताहिक दर रविवारी प्रकाशित होई. पुढे यंदे आणि आवटे यांचे मतभेद झाल्यानंतर यंदे यांनी सयाजीरावांच्या परवानगीने ‘श्री सयाजीविजय’ हे नवे साप्ताहिक ३१ नोव्हेंबर १८९३ रोजी सुरू केले. दामोदर सावळाराम यंदे हेच संपादक असणारे हे साप्ताहिकसुद्धा मराठी, इंग्रजी व गुजराती भाषेत निघत होते. १८९६ नंतर ते गुजराती व मराठी भाषेतूनच प्रसिद्ध होऊ लागले. सत्यशोधकांनी चालवलेली सयाजीविजय, जागृती, बडोदावत्सल इ. वर्तमानपत्रे बडोद्यात मुक्तपणे काम करत होती. या वर्तमानपत्रातील लोकांच्या तक्रारींची दखल थेट सयाजीराव घेत होते. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांना आपल्या भूमिका मुक्तपणे मांडण्याचे स्वातंत्र्य संबंधित वर्तमानपत्रांना महाराजांनी दिले होते. लोकप्रबोधनासाठी मुद्रित माध्यमांना आश्रय आणि स्वातंत्र्य देवून कसे विकसित करावे याचा वस्तुपाठच महाराजांनी घालून दिला.
१८७० मध्ये दामोदर सावळाराम यंदे यांनी ग्रंथ निर्मितीद्वारे बहुजन समाजात ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ग्रंथ संपादक व ग्रंथ प्रकाशक मंडळीची स्थापना केली. या मंडळीच्या माध्यमातून ज्ञान चळवळीच्या उत्कर्षासाठी १९२६ साली सयाजीरावांच्या प्रेरणेने या मंडळीची सहकारी तत्त्वावर पुनर्रचना केली गेली. बडोदा संस्थानकडून होणार्या ग्रंथ प्रकाशनाच्या व वितरणाच्या कामाला अधिक गतिमान करण्याचा उद्देश यामागे होता. दामोदर यंदेंनी आपल्या कारकिर्दीत ७०० हून अधिक ग्रंथ प्रकाशित केले. मराठा जातीतील यंदे हे त्या काळातील सर्वात मोठे मराठी प्रकाशक होते. मराठीतील अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ यंदेंनी प्रकाशित केले होते. सयाजीरावांनी पाली भाषेतील बौद्ध ग्रंथांचे मराठी अनुवाद अग्रक्रमाने प्रकाशित करण्याची सूचना यंदे यांना दिली होती. यामध्ये असणारी सयाजीरावांची दूरदृष्टी आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर तर अधिक परिणामकारक ठरते.
१८९८ मध्ये सयाजीरावांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये ग्रंथ संपादक मंडळीचा पहिला वार्षिक समारंभ साजरा झाला. या समारंभावेळी सयाजीरावांनी प्रकाशनाच्या कामासाठी यंदेंना १,२०० रुपये देणगी दिली. आजच्या रूपयाच्या मूल्यात ही रक्कम ५० लाख रु.हून अधिक भरते. आधुनिक काळात एखाद्या प्रशासकाने समाजाला ज्ञानी करण्यासाठी महाराष्ट्रातच काय देशातही एवढी गुंतवणूक केल्याचे उदाहरण आढळत नाही. यंदेंसारख्या कर्तबगार व्यक्तीला पाठबळ देऊन मराठी ग्रंथ निर्मितीच्या क्षेत्रात महाराजांनी जो अभूतपूर्व प्रयोग केला तो मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठीचा आजवरचा सर्वोत्तम प्रयत्न ठरतो.
राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ सर्वांना समजावेत या उद्देशाने विधींचे मंत्र अर्थासह प्रकाशित करण्याच्या उद्देशाने सयाजीरावांनी २३ नोव्हेंबर १८८६ रोजी राजवाड्यात होणारी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. रा.रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर या तिघांनी सयाजीरावांच्या आज्ञेवरून धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा ‘ऐनेराजमेहेल’ नावाचा ग्रंथ तयार केला.
महात्मा फुलेंनी १८८७ मध्ये सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक विधिंसंबंधी मंगल अष्टकांसह सर्व पूजा विधींची छोटी पुस्तिका प्रकाशित केली होती. फुलेंच्या या उपक्रमाचा विकास करत सयाजीरावांनी १८८७ मध्ये ‘नितीविवाह चंद्रिका’, १९०३ मध्ये ‘वधूपरीक्षा’, १९०४ मध्ये ‘लग्नविधी व सोहळे’, १९१३ मध्ये ‘विवाह विधीसार’, १९१६ मध्ये ‘उपनयन विधीसार’, ‘श्राद्ध-विधीसार’, ‘अंत्येष्ठिविधिसार’, ‘दत्तकचंद्रिका’, ‘दानचंद्रिका’ इ. ग्रंथ प्रकाशित केले. महाराजांचे हे काम आधुनिक भारताच्या प्रबोधन चळवळीतील मैलाचा दगड ठरते. परंतु प्रबोधन चळवळीच्या इतिहासात सयाजीरावांचे साधे नावसुद्धा आढळत नाही. यादृष्टीने नव्याने संशोधन होण्याची गरज आहे.
१८९६ च्या वेदोक्तानंतर सयाजीरावांनी सर्व वेदोक्त विधींच्या संदर्भातील १६ संस्कारांच्या विधींचे रियासतकार सरदेसाईंकडून मराठी भाषांतर करून घेवून प्रकाशित केले. तर १९०५ च्या हिंदू विवाह कायद्यात १९२८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराती व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात आले. १९०३ मध्ये सयाजीरावांनी प्रायश्चित्त विधीची शास्त्रोक्त माहिती देणारा ग्रंथ लिहिण्याचा आदेश भिकाचार्य ऐनापुरे यांना दिला. या आदेशानुसार ऐनापुरे यांनी लिहिलेला ‘प्रायश्चित्तमयूख’ हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर १९१४ मध्ये सयाजीरावांनी प्रकाशित केले. १८८८ च्या प्रायश्चित्तानंतर प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून प्रकाशित केलेला हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या धर्मसाक्षरता अभियानाचा उत्तम नमूना आहे. धर्मानंद कोसंबींना १९०८ ते १९११ अशी तीन वर्षे बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात प्रसार आणि ग्रंथलेखन करण्यासाठी महाराजांनी महिन्याला ५० रुपये शिष्यवृत्ती दिली होती.
सयाजीरावांच्या इच्छेनुसार ‘सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचनें’ हा ग्रंथ १८९७ मध्ये कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी लिहिला. त्याचबरोबर १८९८ मध्ये सयाजीरावांनी केळूसकरलिखित बुद्ध चरित्र प्रकाशित केले. हे आधुनिक काळातील फक्त मराठीतीलच नव्हे तर भारतीय भाषेतील पहिले बुद्ध चरित्र होते. यानंतर महाराजांनी मॅक्स मुल्लरने भाषांतरीत केलेल्या ‘सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’ या मालेत प्रकाशित केलेल्या बारा उपनिषदांपैकी सात उपनिषदांचे मराठी अनुवाद करण्याचे काम केळूसकरांवर सोपवले. हे भाषांतर करत असताना केळूसकरांनी मॅक्स मुल्लरऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांवरून ते केले.
विशेष म्हणजे या अनुवादात मॅक्स मुल्लरचा कोठेही आधार घेतला नाही. फक्त उपनिषदांवरील शांकरभाष्यासाठी मात्र त्यांनी मॅक्स मुल्लरची मदत घेतली. हे भाषांतरही परीक्षण समितीने उत्कृष्ट ठरवले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेत्तर ठरतात. पुढे १९०६ मध्ये सयाजीरावांनी केळूसकर यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्र ग्रंथास आर्थिक सहाय्य करत ग्रंथाच्या २०० प्रती विकत घेतल्या.
महाराष्ट्रीयन इतिहासलेखनाच्या क्षेत्रात मुलभूत काम केलेले रियासतकार सरदेसाई सयाजीरावांकडे ३६ वर्षे नोकरीस होते. सुरुवातीला त्यांची निवड रीडर म्हणून झाली होती. सुरुवातीला महाराजांचे रोजचे टपाल व वर्तमानपत्र पाहून ती त्यांच्या सवडीप्रमाणे वाचून दाखवणे, खाजगी पत्रांची उत्तरे देणे, महाराज पुस्तके वाचीत त्यातील कठीण शब्द काढून टिपणे करणे यासाठी दिवसातील दोन-तीन तास सरदेसाईंना महाराजांकडे काम असे. उर्वरित वेळ मोकळा जाऊ नये यासाठी सयाजीरावांनी त्यांना मॅकिआव्हेलीचा ‘प्रिन्स’ व सीलीच्या ‘एक्स्पॅन्शन ऑफ् इंग्लंड’या ग्रंथांचे भाषांतर करण्याचे काम दिले.त्यानुसार सरदेसाईंनी या ग्रंथांचे अनुक्रमे ‘राजधर्म’ व ‘इंग्लंड देशाचा विस्तार’ असे भाषांतर केले. हे दोन्ही भाषांतरित ग्रंथ सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित झाले.
सयाजीरावांना इतिहासविषयक ग्रंथातील मजकूर वाचून दाखविणे आणि राजपुत्रांना शिकवणे ही दोन मुख्य कामे सरदेसाईंना सोपवण्यात आली होती. या मुख्य कामासाठी सरदेसाई लेखी टिपणे काढत. याच टिपणांतून पुढे रियासतींचा जन्म झाला. त्यातील पहिला खंड ‘मुस्लिम रियासत’ या नावाने १८९८ मध्ये बडोद्यातून प्रकाशित झाला. पुढे मराठी रियासत, ब्रिटिश रियासत यांच्या आवृत्या १९३५ पर्यंत निघाल्या. सरदेसाईंनी केलेल्या परमानंदांच्या अनुपुराणाचे संपादन ‘गायकवाड ओरिएंटल सिरिज’मध्ये प्रकाशित झाले. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचा ‘क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व’ हा ग्रंथ १९१२ मध्ये सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाला होता.
१९०७ मध्ये सयाजीरावांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ‘अस्पृश्योद्धार’ या विषयावर बडोद्याच्या न्यायमंदिराच्या दिवाणखान्यात एक व्याख्यान आयोजित केले. नंतर हेच व्याख्यान ‘बहिष्कृत भारत’ या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाच्या एक हजार प्रती सयाजीरावांनी विकत घेऊन बडोदा संस्थानात वाटल्या. १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या प्रेरणेने श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ‘स्पर्शास्पर्श अथवा चारही वर्णांचा परस्पर व्यवहार’ हा ग्रंथ लिहिला होता. त्यावेळी या ग्रंथासाठी महाराजांनी ५०० रुपये बक्षीस दिले होते.
महाराजांनी जातसाक्षरतेसाठी जे विविध प्रयत्न केले त्यामध्ये जातीबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती हिंदू धर्मग्रंथातून भाषांतरित करून प्रकाशित करणे, जातीवरच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे याबरोबरच जातीबद्दलची माहिती एकत्रित करून प्रकाशित करणे यांचा समावेश होता. असाच एक प्रयत्न म्हणजे १९२८ मध्ये बडोदा संस्थानकडून प्रकाशित केलेला ‘A Glossary of Castes, Tribes and Races In The Baroda State’ हा ग्रंथ होय.
प्राचीन ग्रंथांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने १८८७ च्या पहिल्या युरोप दौर्यात सयाजीरावांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रारंभी पाटण आदी ठिकाणी जावून हस्तलिखितांचे अध्ययन, संकलन व अनुवादाची जबाबदारी महाराजांनी मणिभाई, नभुभाई द्विवेदी, अनंतकृष्ण शास्त्री यांच्यावर सोपविली. अनंतकृष्ण शास्त्री यांच्याकडे संपूर्ण भारतभर फिरून प्राचीन हस्तलिखिते जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली. सात वर्षाच्या भ्रमंतीतून शास्त्रींनी १०,००० हस्तलिखिते जमा केली. या सर्व प्रयत्नांतून १९३३ पर्यंत १३,९८४ हस्तलिखितांचा संग्रह बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो.
हस्तलिखितांच्या फोटोप्रती तयार करणे हे एक महत्वाचे काम असते. यासाठी १९२३ मध्ये बडोदा संस्थानतर्फे या संस्थेला अमेरिकन बनावटीचा छायांकनाचा कॅमेरा (आजच्या भाषेत झेरॉक्स मशीन) देण्यात आला. भारतात हे तंत्रज्ञान आणण्याचे श्रेय सयाजीरावांना जाते. भारतात १९४० पर्यंत ग्रंथालयांना हे तंत्रज्ञान परिचितही नव्हते. हे मशिन दिवसाला १०० ताडपत्रावरील हस्तलिखितांच्या फोटोप्रती करून देत असे. अगदी १९४५ पर्यंत हे मशिन उत्तम सेवा देत असे. बाहेरील अभ्यासकांना हव्या त्या हस्तलिखितांच्या छायांकित प्रती मोफत देण्याची व्यवस्था होती. प्राच्यविद्या संस्थेच्या ग्रंथालयाची सेवा विनामूल्य उपलब्ध होती.
महाराष्ट्रातील पुण्याचे भांडारकर प्राच्यविद्यामंदिर सर्वांना परिचित आहे. भारतातील अग्रगण्य आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या संस्थेच्या पायाभरणीत सयाजीरावांचे आर्थिक आणि बौद्धिक योगदान आहे हे महाराष्ट्राला अपरिचित आहे. सयाजीरावांनी १९१६ मध्ये या संस्थेच्या स्थापनेसाठी १ हजार रु.ची आर्थिक मदत केली होती. पुढे १९१६ पासून १९४० पर्यंत एकूण २४ वर्षे वर्षाला ५०० रु. (१२ हजार) असे एकूण १३ हजार रु. आर्थिक सहाय्य केले होते. आजच्या रूपयाच्या मूल्यात ही रक्कम २ कोटी ३ लाख ३२ हजार रु. इतकी होते. १९२२ मध्ये महाभारताच्या प्रकाशनाकरता महाराजांनी ५,५०० रु. दिले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १ कोटी ४२ लाखाहून अधिक भरते. संस्थेच्या उभारणीत एवढे पायाभूत योगदान असणार्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत संस्थेचे आश्रयदाते म्हणून सयाजीरावांचा फोटोसुद्धा येथे आपल्याला आढळत नाही ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
सयाजीरावांनी मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत ८-१० ग्रंथमाला प्रकाशित केल्या. बडोदा प्राच्यविद्या संस्थेतर्फे १९१५ मध्ये ‘गायकवाड ओरिएन्टल सिरिज’ ही संशोधन प्रकाशनमाला सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. १९१६ मध्ये या मालेतील पहिला ग्रंथ म्हणजे राजशेखर कृत ‘काव्यमीमांसा’ प्रकाशित झाला. १९३८ मध्ये या सिरीजमध्ये प्रकाशित झालेला ‘The Foereign Vocabulary of the Qua’ran’ हा ग्रंथ सयाजीरावांचा इस्लाम धर्मविषयक सकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट करतो.
सयाजीरावांच्या मृत्यूनंतर आजअखेर ही माला सुरू असून प्रकाशित ग्रंथांची संख्या अंदाजे ३०० हून अधिक असेल. यात संस्कृत, पाली, अर्धमागधी, अरेबिक आणि पोर्तुगीज भाषेतील ग्रंथांचा समावेश आहे. हिंदू, बौद्ध, जैन या प्रमुख भारतीय धर्मांच्या दुर्मिळ आणि मौलिक हस्तलिखितांचे चिकित्सक संपादन आणि प्रकाशनाचे ऐतिहासिक काम या संस्थेच्या माध्यमातून सयाजीरावांनी केले.
१९१८ मध्ये सुरू केलेली ‘द गायकवाड स्टडीज इन रिलीजिन अँड फिलॉसॉफी’ ही ग्रंथमाला सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण होती. या मालेत एकूण १७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले होते. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या प्रमुख धर्मांबरोबरच तुलनात्मक धर्म अभ्यास आणि नीतिशास्त्र या विषयांवरील ग्रंथांचा त्यात समावेश होता. जगाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही आजअखेरची एकमेव ग्रंथमाला आहे. विजेरी यांचा या मालेतील १९२२ मधील ‘द कंपॅरेटीव्ह स्टडी ऑफ रिलीजन’ हा ग्रंथ ४०० पानांचा आहे. या ग्रंथात ‘आत्मा ’ ही संकल्पना घेऊन आत्म्याच्या कल्पनेबाबत काय मांडणी केली आहे याचा धांडोळा तुलनात्मक पद्धतीने घेतला आहे.
या मालेत पहिल्या वर्षी करवीरपीठाचे शंकराचार्य कुर्तकोटी यांचा पीएच.डी चा प्रबंध असणारा ‘द हार्ट ऑफ भगवद्गीता’हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. कुर्तकोटींनी हा प्रबंध अमेरिकेतील ओरिएंटल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. पदवीसाठी सादर केला होता. टिळक भक्त असणार्या कुर्तकोटींनी टिळकांचे ‘गीतारहस्य’ १९१५ ला प्रकाशित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन केले होते. हा भगवद्गीतेवरील पहिला पीएच. डी. प्रबंध आहे.
‘द डॉक्टरीन ऑफ कर्मा’ हा या मालेत प्रकाशित झालेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ होय. कारण या ग्रंथात जगातील विविध आणि प्रमुख धर्मातील कर्म सिद्धांतांची तुलनात्मक चर्चा केली आहे. या मालेत ‘अ बुद्धिस्ट बिब्लिओग्राफी’ हा आणखी एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ प्रकाशित झाला. जगभर बौद्ध धर्माबाबत झालेल्या संशोधनाची सूची या ग्रंथात एकत्रित करण्यात आली आहे. हा ग्रंथ दोन खंडात असून पहिल्या खंडात पाली भाषेतील बौद्ध साहित्य, संस्कृत भाषेतील बौद्ध साहित्य, बौद्धेत्तर संस्कृत वाड्मयातील बौद्ध धर्माचे संदर्भ, यूरोपियन भाषेतील बौद्ध साहित्य याची चर्चा करण्यात आली आहे.
या ग्रंथाच्या दुसर्या खंडात यूरोपियन भाषेतील भारतीयांचे बौद्ध वाड्मय, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, जावा, कंबोडिया, हिमालयीन पट्ट्यातील, तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, चीन, कोरिया, जपान इ. १३ देशातील बौद्ध वाड्मयाचा आढावा घेणारी सूची देण्यात आली आहे. भारतातील अशा प्रकारचा बहुधा हा पहिला ग्रंथ असावा. या ग्रंथाच्या माध्यमातून महाराजांनी बौद्ध तत्वज्ञानाशी त्यांची असणारी बांधिलकी अधोरेखित केली आहे.
सयाजीरावांनी धर्म, संस्कृती, तत्वज्ञान, नीतिशास्त्र या विषयावरील अनेक ग्रंथ प्रकाशित केले. त्यामध्ये ‘राजधर्म’ (१८९०), ‘नीतिवाक्यांमृत’ (१८९१), ‘सद्वाक्यरत्नमाला’ (१८९३), ‘परमार्थ प्रवेश’ (१८९८), ‘आचारमयूख’ (१९०५), ‘धर्म शास्त्रांची मूलतत्वेॱ’ (१९०५), ‘संस्कृत वाड्मयाचा इतिहास’ (१९१५), ‘तत्वज्ञानांतील कूटप्रश्न’ (१९२६), ‘चीन देशातील सुधारणा’ (१९२८), ‘जर्मनसाम्राज्याची पुन:स्थापना’ (१९२८), ‘पाश्चात्य तत्वज्ञान’ (१९३१), ‘बौध्दधर्म अर्थात धर्मचिकित्सा’ (१९३२), ‘सुलभ नीतिशास्त्र’ (१९३३), ‘नीतिशास्त्रप्रबोधन’ (१९३३), ‘जगातील विद्यमान धर्म’ (१९३६), ‘प्राच्य आणि पाश्चात्य नीतिध्येये’ (१९३७), ‘धर्म,उद्रम आणि विकास’ (१९३७) यासारख्या ७२ ग्रंथांचा समावेश आहे. या विषयावरील मराठी ग्रंथांबरोबरच ६४ गुजराती ग्रंथही महाराजांनी प्रकाशित केले होते.
पाश्चात्य सुपशास्त्राची माहिती आपल्या लोकांना व्हावी या उद्देशाने सयाजीरावांनी दोन होतकरू विद्यार्थी सरकारी शिष्यवृत्ती देऊन पाश्चात्य देशात पाठविले. पुढे पाकशास्त्र ग्रंथमाला काढून पाश्चिमात्य पाकशास्त्र (भाग ३) व ‘सुपशास्त्र’ (मद्रासी, मुसलमानी, इंग्रजी, तंजावरी इ. पद्धतीचा अंक ४) हे मोठे ग्रंथ व ‘भोजनदर्पण’ (१८९७), ‘भोजन दर्पण कला’ (१९०९), ‘पाकशिक्षण’ क्रमिक पुस्तके १ ते ३ (१९०८), ‘सयाजीपाकरत्नाकार’ (१९१७) ‘महाराष्ट्रीय स्वयंपाक’ इत्यादी बरीच पुस्तके तसेच जेवणाच्या अनुषंगिक गोष्टींवर ‘टेबल सर्विस’ अथवा ‘आंग्ल परिवेषण पद्धती’ (१९१६), पदार्थवार लागणाऱ्या जिन्नसांचे प्रमाण यावरील पुस्तक (भाग-३. १९२८), पदार्थवार आकाराचे पुस्तक (१९३०) इत्यादी अनेक पाकशास्त्रीय ग्रंथ लिहून घेतले. त्यामुळे भारतीय आणि पाश्चात्त्य पाककलेवरचे सविस्तर आणि सर्व वाङमय मराठीत प्रसिद्ध झाले.
पाकशास्त्राप्रमाणे राष्ट्रीय खेळासंबंधीही पुस्तके असावी व जुने खेळ नामशेष न होता नव्या पाश्चात्य खेळांची त्यात भर पडावी या हेतूने महाराजांनी ‘क्रीडामाला’ या नावाने एक माला सुरू केली. या मालेतून नऊ-दहा पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली. तर श्री कालेलकरांनी लिहिलेले व देवधरांनी दुरुस्त करून प्रसिद्ध केलेले ‘मराठी खेळाचे पुस्तक’ हे अत्यंत महत्त्वाचे पण आज दुर्मिळ असणारे मोठे पुस्तक छापण्यासाठी महाराजांनी ४,००० रुपये मदत दिली होती.
नोकरांना शिस्तीने काम करण्याची सवय लागावी या उद्देशाने नियमबद्ध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये अहेर, बहुमान पोशाखाचा नियम, खाजगी खात्याच्या सामानसंबंधी नियम, अर्डली रूमसंबंधी नियम, स्वारी नियम खात्याच्या अर्थव्यवस्थेसंबंधी नियम, सिंहाचे व वाघाचे शिकारी संबंधीत नियम, छायाचित्रसंबंधी नियम, मरळ माशांच्या पैदाशीसंबंधित नियम इत्यादी पुस्तके तयार करून घेतली होती. ही सर्व पुस्तके सयाजीरावांनी संस्थानच्या खर्चाने प्रकाशित केली.
१८८८ मध्ये ‘The Antiquities of Dabhoi’ तर १९०३ मध्ये ‘The Architectural Antiquities of North Gujarat’ हे बडोदा संस्थानातील प्रमुख स्मारकांचे महत्व सांगणारे दोन ग्रंथ संस्थानच्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आले. पुरातत्व विभागातर्फे १९४१ पर्यंत या पुरातत्व विभागाची तीन विभागीय संस्मरणे ‘Gaekwad’s Archaeological Series’ मध्ये प्रकाशित केली. या तीन संस्मरणिकांपैकी एक ‘Indian Pictorial Arts as Developed in Book Illustration’ ही आहे. या पुस्तकात विविध चित्रांच्या सहाय्याने वर्णन केले आहे.
दुसरे पुस्तक ‘Asokan Rock at Girnar’ हे आहे. हे पुस्तक अशोकावरील विविध महत्वाच्या नोंदी जाणून घेण्यासाठी महत्वाचे आहे. याचबरोबर मौर्य सम्राट रुद्रदामन, महाक्षत्रप व स्कंधगुप्त, गुप्त सम्राट यांच्या संदर्भात गिरनार येथे कोरलेल्या शिलालेखांच्या माहितीचा समावेश आहे. ‘Ruins of Dabhoi or Ancient Darbhavati’ या तिसऱ्या पुस्तकात दाभोई येथील पुरातत्व वास्तूंचे वर्णनात्मक व ऐतिहासिक महत्व विषद केले आहे.
सयाजीरावांनी आपल्या प्रजेला केवळ साक्षर नव्हे तर ज्ञानी करण्यासाठी १८८७ पासूनच जगातील मौल्यवान ग्रंथांचे मराठी व गुजरातीत भाषांतर करण्याचे काम हाती घेतले होते. इंग्रजी भाषेतील लोकोपयोगी, ज्ञानसंवर्धक आणि माहितीप्रधान ग्रंथांचे भाषांतर करण्याचा ध्यास महाराजांनी अगदी १८८७ पासून घेतला असल्याचे पुरावे सापडतात. त्यावेळची परिस्थिती बघता मराठीमध्ये स्वतंत्र अभ्यास संशोधन करून लेखन करणारे लेखक फारच कमी असल्यामुळे जगातील अद्ययावत ज्ञान आपल्या प्रजेला मिळवून देण्याचा एकमेव मार्ग म्हणून महाराज भाषांतराकडे पहात होते.
महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात शेकडो ग्रंथ अनुवादीत केले. ज्यावेळी स्वतंत्र लेखनासाठी तज्ञ उपलब्ध झाले त्यावेळी स्वतंत्र ग्रंथही लिहून घेतले. महाराजांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये मुख्यत: इतिहास, धर्म, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, चरित्र, शेती, कुटुंब, खेळ, व्यायाम, आहार इ. विषयांचा समावेश दिसतो. उल्लेखनीय बाब म्हणजे यापैकी अनेक विषयांवरील मराठीतील पहिले ग्रंथ महाराजांनी प्रकाशित केलेले आहेत.
१८८७ मध्ये महाराज जेव्हा आपल्या पहिल्या परदेश प्रवासास युरोपला गेले तेव्हा तेथून त्यांनी कॅसलची ‘Dictionary of Cookery’ हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे आदेश दिवाणांना दिले होते. मराठीत प्रकाशित झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ होता. १८९७ मध्ये सयाजीरावांनी विलियम मॉरीसन यांच्या ‘क्राइम अँड इट्स कॉझिस’ या इंग्रजी ग्रंथाचे ‘गुन्हा आणि त्याचीं कारणें’ हे रामचंद्र हरी गोखले यांनी केलेले मराठी भाषांतर आपल्या ‘महाराष्ट्रग्रंथमाले’त प्रकाशित केले.
महाराजांनी १९२८ मध्ये ‘श्री सयाजी साहित्यमालेत’ ‘मुंबई इलाख्यातील जाती’ हे “TRIBES & CASTS OF BOMBAY” या पुस्तकाचे मराठी भाषांतर गोविंद मंगेश कालेलकर यांच्याकडून करून घेऊन प्रकाशित केले. १९४३ ला सयाजी साहित्यमालेत ‘पिता-पुत्र-संबंध’ हे यशवंत रामकृष्ण दाते यांनी लिहिलेले पुस्तक मुलांच्या योग्य विकासाच्या दृष्टीने प्रजेला मार्गदर्शन करण्यासाठी प्रकाशित झाले होते. जरी हे पुस्तक महाराजांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले असले तरी या पुस्तकाची बीजे महाराजांच्या विचारात होती.
१९३१ मध्ये भाषांतर शाखा प्राच्यविद्या संस्थेशी संलग्न करण्यात आली. परंतु भाषांतर मालेची खरी सुरुवात १८८८ ला झाली होती. शास्त्रीय शिक्षणाची पुस्तके गुजराती भाषेत तयार करण्यासाठी यावर्षी महाराजांनी ५० हजार रु. मंजूर करून प्रो. गज्जर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. १८९३ मध्ये संस्थानामार्फत विद्वान लेखक नोकरीत ठेऊन त्यांच्याकडून ग्रंथ लेखनाचे काम करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. या योजनेअंतर्गतच मनिलाल द्विवेदींनी पाटण येथील प्रसिद्ध जैन भांडारातून २१ ग्रंथांचे संशोधनात्मक भाषांतर केले होते. हीच भाषांतर शाखेची सुरुवात होय. धर्मानंद कोसंबींचे फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थी चिंतामण वैजनाथ राजवाडे हे बडोदा कॉलेजमध्ये पाली भाषेचे पहिले प्राध्यापक होते. बडोदा संस्थानसाठी भाषांतर केलेल्या बौद्ध धर्मावरील दोन पुस्तकांचे प्रकाशन सयाजीरावांनी केले.
१९०८ मध्ये विद्याधिकारी खात्याच्या देखरेखीखाली महाराजांनी भाषांतर शाखा नवीन पद्धतीवर स्थापन केली. इंग्रजी ग्रंथांप्रमाणेच संस्कृत भाषेतील उत्तम आणि दैनंदिन उपयोगाच्या पुस्तकांचे मराठी भाषांतर करण्यास सुरुवात झाली. यासाठी श्रावणमास दक्षिणेपैकी ५,५०० रु. दिले. नंतर याच निधीतून धर्मशास्त्रावरील पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी वार्षिक १० हजार रु. खर्च करण्याचा हुकूम दिला. १९३२ अखेर भाषांतर शाखेवर दीड लाख रु. खर्च केले होते. एकंदरीतच महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ६ लाख रुपये ग्रंथ निर्मितीसाठी खर्च केले.
सयाजीरावांनी प्रजेला ज्ञानमार्गी बनवण्यासाठी ग्रंथ निर्मिती करून घेतली. इतरांकडून साहित्यनिर्मिती करून घेण्याबरोबरच महाराजांनी स्वतःही ग्रंथनिर्मिती केली. त्यामध्ये ‘कैसरकडून सुलतानाकडे’, ‘दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी’ आणि ‘Goods and Bads’ या ग्रंथांचा समावेश होतो. सयाजीरावांच्या प्रेरणेने त्यांच्या पत्नी महाराणी चिमणाबाईंनी प्रगत देशातील स्त्रियांच्या दर्जाशी भारतीय स्त्रियांची तुलना करून १९११ साली ‘द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाइफ’ हे भारतातील स्त्रियांच्या स्थितीबद्दलचे पुस्तक लिहिले व ते लंडनमधून प्रकाशित झाले.
महाराजांनी केवळ बडोदा संस्थानात साहित्यनिर्मिती केली नाही तर महाराष्ट्रातही यादृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली. महाराष्ट्रातील व्यक्ति आणि संस्थांना ग्रंथ निर्मितीसाठी सढळ हाताने मदत केली. दत्तात्रय चिंतामण मुजूमदार यांच्या दहा खंडातील पाच हजार पानांच्या मराठीतील पहिल्या ज्ञानकोशास महाराजांनी ७,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य केले. मराठी शब्दकोशास ५००० रु. तर य. रा. दाते यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोशास’ १००० रुपयांची मदत केली. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशाच्या गुजराती भाषांतरास ५००० रु. व मराठी भाषांतरास २००० रु. इतकी भरघोस मदत केली.
१९२७ मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी, पुणे या संस्थेच्या ज्ञानप्रकाश छापखान्यास आग लागून झालेल्या नुकसान भरपाईसाठी ४००० रु. दिले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम सुमारे १ कोटी ५ लाख रु.हून अधिक भरते. तर १९३३ मध्ये सयाजीरावांनी मुंबई सरकारतर्फे प्रकाशित झालेल्या पेशवे दफ्तराच्या प्रकाशनासाठी ३००० रु. आर्थिक सहाय्य केले. ही रक्कम आजच्या रुपयाच्या मूल्यात सुमारे ५९ लाख ४१ हजार रु.हून अधिक भरते. सयाजीरावांना ‘बडोद्या’चे म्हणून दुर्लक्षित करताना मराठी भाषेच्या संवर्धनाला असलेले त्यांचे हे योगदान विसरणे कृतघ्नपणाचे ठरेल.
महाराजांच्या २४ जगप्रवासाचे अहवाल, परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दौऱ्यांचे अहवाल, महाराजांनी नेमलेल्या शेकडो अभ्यास समित्यांचे अहवाल, संस्थानाचे प्रशासकीय अहवाल इ. चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मुद्रण कलेचा किती परिणामकारक आणि परिपूर्ण उपयोग करून घेता येवू शकतो याचा पुरावा मिळतो. आपला समाज ज्ञानउर्जेने संपन्न व्हावा यासाठी महाराजांनी इंग्रजीतील सर्व विषयांचे सर्वोत्तम ग्रंथ मराठी भाषेत मुद्रित करून घेतले. याबरोबरच आपल्या प्राचीन भाषांमध्ये साहित्य, संस्कृती आणि तत्वज्ञान यादृष्टीने महत्वाच्या ग्रंथांचे महाराजांनी पुनर्मुद्रण केले. हजारो हस्तलिखिते भारताबरोबर जगभरातून गोळा करून त्यांचे संवर्धन केले. आज सयाजीराव गायकवाडांच्या कारकीर्दीवर लेखन-संशोधन करताना बडोद्याबरोबरच आधुनिक भारताच्या अभ्यासासाठी हे अनमोल धन अतिशय उपयुक्त ठरते.
आर.ए. एन्थोवेन यांच्या ‘The Folklore of Bombay’ या ग्रंथाचा गोविंद मंगेश कालेलकर यांनी केलेला ‘लौकिक दंतकथा’ हा मराठी अनुवाद सयाजीसाहित्य मालेत १९३४ मध्ये प्रकाशित करण्यात आला. लोकसाहित्यावरील मराठीतील हे पहिले पुस्तक सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाले होते. या ग्रंथाच्या पुनर्मुद्रणाच्या निमित्ताने लिहिलेल्या प्रस्तावनेत प्रख्यात लेखक आणि समीक्षक भालचंद्र नेमाडे म्हणतात, “आपली भाषा ज्ञानाच्या बाबतीत आत्मनिर्भर असावी, असे सर्वांनाच वाटते. परंतु, ह्यासाठी सत्तेवरच्या लोकांना आणि विद्या क्षेत्रातील लोकांना सतत कष्ट उपसावे लागतात. ज्ञानसंवर्धनासाठी एक प्रकारची अभियांत्रिकी शासनापाशी असावी लागते. परभाषांमधील नवनवीन ज्ञान व तंत्रे आत्मसात करून त्यांना देशी भाषांमध्ये जिरवणारे वाचक, अभ्यासक, संशोधक, शिक्षक, भाषांतरकार लागतात. विद्याक्षेत्रातल्या सुखवस्तू होऊन आळशी बनलेल्या लोकांना ज्ञान ग्रंथ निर्माण करण्याच्या मेहनती कामाला लावणे किती कठीण असते, हे स्वातंत्र्योत्तर काळातल्या महाराष्ट्रातल्या कॉलेज-युनिव्हर्सिट्यांमधल्या लोकांवरून कोणाच्याही लक्षात येईल. सयाजीरावांनी हा सर्व प्रयोग यशस्वी करून शेकडो ग्रंथ मराठीत निर्माण केले. मातृभाषेचा एवढा जिव्हाळा त्यांच्यानंतर सत्तेवरच्या दुसऱ्या कोणी मराठी माणसाने दाखवलेला नाही.” नेमाडे सरांचे हे निरीक्षण महाराष्ट्राला ‘आत्मटीके’कडे नेणारे आहे.
आजच्या मुद्रण दिनाच्या निमित्ताने सयाजीरावांच्या या अद्वितीय कामाचे चिंतन आपल्याला ‘दुरुस्त’ करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.
– शिवानी घोंगडे, वारणानगर
Shivani Ghongade
(८०१०४४७७४०)
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply