साड्यांच्या दुकानात ढिगाऱ्यातून एक एक साडी काढून व्यवस्थित घड्या घालत असलेल्या त्या दुकानदाराकडे मी बराच वेळ बघत होतो. माणूस थोडा ओळखीचा वाटत होता. कुठे बरं बघितला आहे ह्याला?, मी विचार करत होतो, तेवढ्यात दुकानाच्या मालकांनी त्याला हाक मारली
“अरे बग्या, ह्यांना जरा काल आलेल्या नवीन स्टॉक मधल्या नऊवारी साड्या दाखव ”
तो साड्यांच्या घड्या घालायचे काम सोडून आमच्या समोर काउंटरला आला.
“हा बोला, कुठल्या प्रकारच्या नऊ वारी साड्या बघायच्या, बोला,”
त्याच्या प्रश्नाने आम्ही थोडे विचारात पडलो, म्हणजे नऊ वारी साड्यांमध्ये प्रकार असतात हेच आम्हाला माहित नव्हते. कारण नऊवारी म्हणजे नऊवारी, साधारणतः आजी नेसतात तशी, एक तर बारीक चौकडी, नाहीतर मोठी चौकडी, नाहीतर साधी रंगीत , त्यात काय प्रकार असणार? हिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या ग्रहमकाला सगळ्यांनी नऊवारी साड्या नेसायचे ठरवले होते म्हणून आम्ही गिरगावात खास नऊवारी साडी खरेदी करण्या करिता आलो होतो.
बग्याने मग समोरच्या कपाटातून नऊ दहा वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साड्या काढल्या.
“हि नऊवारी सिल्क, हि कॉटन ब्लेंड नऊवारी , बॉर्डर नऊवारी, पैठणी नऊवारी, कोल्हापुरी नऊवारी, पेशवाई नऊवारी, बॉलीवूड कलेक्शन नऊवारी आणि हि कॅज्युअल कॉटन नऊवारी, जी आपल्या आजी नेसतात ती आणि ज्यांना नऊवारी नेसायची सवय नसेल त्यांच्याकरिता हि रेडीमेड नऊवारी, म्हणजे नेसण्याच्या पद्धतीवरून आणि कापडाच्या प्रकारावरून पडलेले हे प्रकार सांगितले, बोला कुठली देऊ?”
मग बाहेर शोकेस मध्ये एक वेगळीच हटके साडी लावली होती, हिने त्या साडीबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला
“हा, ती ना, ती डिझाईनर नऊवारी, हल्ली काय आहे नवरी मुलगी सुद्धा लग्नात कधी कधी नऊवारी नेसते फॅशन म्हणून, ती खास तिच्याकरिता बनवली आहे.”
बग्या बराच वेळ साड्यांबद्दल बोलत होता, वेगवेगळ्या साड्या दाखवत होता. पण माझं त्याच्याकडे लक्षच नव्हते. मालकांनी त्याला बग्या म्हणून हाक मारल्यापासून मला सारखे वाटत होते हा बहुतेक बग्या देसाई असणार गिरगावातील चाळीतला, फक्त प्रश्न असा होता कि तो तर त्या वेळी पोस्टात नोकरीला होता मग आता इथे कसा?
मला आठवते,बग्याची आणि माझी पहिली ओळख सत्तरीच्या दशकातली. त्या वेळेस माझ्या आईचे निधन झाल्याने वडिलांनी मला आणि भावाला गिरगावात मावशीकडे शिकायला ठेवले होते. वडीलही गिरगावातच एका सहकारी बँकेत होते. गरजू लोकांना अत्यंत कमी व्याज दरात कुठलेही तारण न घेता आवश्यक कर्ज उपलब्ध करून देणारी ती एकमेव सहकारी बँक होती. अर्थात सचोटीने वागणारा पापभिरू मराठी माणूस जो पर्यंत गिरगावात टिकून होता तो पर्यंत ती बँक टिकली. पुढे काही स्वार्थी लोकांनी कर्जाच्या खिरापती वाटून, अफरातफरी करून ती बुडवली. त्या वेळचे गिरगांव म्हणजे एक मराठमोळे कुटुंब होते. मराठी शाळा होत्या, साहित्य संघ मंदिरात दर्जेदार मराठी नाटके लागलेली असायची, सेंट्रल, नाझ, अलंकार अशी चित्रपटगृह होती, सेंट्रलला तर दर शुक्रवारी वेगवेगळा मराठी चित्रपट लागायचा, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात नावाजलेल्या लेखक – कवींची व्याख्याने असायची. नाक्यावर पणशीकर, देसाई, कोना अशी घरगुती खाद्य पदार्थ पुरवणारी उपहारगृहे होती, शहाडे – आठवले, गिरगांव पंचा डेपो अशी मराठी माणसांची कापडाची दुकाने होती. ठाकुरद्वार,हेमराज वाडी,परशुराम वाडी, गंगाराम खत्र्याची वाडी अशा वेगळी ओळख असलेल्या मराठी वसाहती होत्या, नाक्या नाक्यांवर मंदिरे होती. गणपती, दही हंडी, पाडवा, दसरा सारें उत्सव उत्साहात साजरे होत असत. पारंपरिक पोशाखात आणि वडिलोपार्जित संस्कारात. मुख्य म्हणजे एक मराठी माणूस तेव्हा दुसऱ्या माणसाशी मराठीत बोलायचा. तशा अजून काही गोष्टी टिकून आहेत पण तेव्हाचे मराठमोळे गिरगाव काही निराळेच होते.
त्या वेळेस गिरगावात आत्तासारख्या टोलेजंग इमारती नव्हत्या.बहुतेक कुटुंब चाळी चाळीत राहत असत. चाळी साधारण ऐशी ते शंभर वर्षे जुन्या. शंभरहून अधिक बिऱ्हाडांच्या, तीन ते चार मजली. प्रत्येक मजल्यावर वीस पंचवीस खोल्या. दहा समोरा समोर आणि एका बाजूला पाच, वरच्या मजल्यावर जाण्याकरिता लाकडी जिना, मध्ये एक चौक, प्रत्त्येक मजल्यावर कोपऱ्यात पाण्याचे नळ आणि पांच सहा संडास. नळाला फक्त सकाळी साडेपांचला एक तास पाणी येत असे. त्या मुळे मोठी मोठी पिंपे भरून ठेवलेली असत. मला आठवतं मी तेव्हा सातवी आठवीत असेन. आमची मावशी सुद्धा अशाच एका चाळीत राहत असे. मावशीला दोन मुलगे होते. आमच्या मावशीच्या शेजारी देसाई म्हणून एक कुटुंब राहात होते. देसाईंना तीन मुले होती, एक मुलगा आणि दोन मुली, म्हणजे तसं बघितलं तर त्या काळातील छोटे कुटुंब, पण देसाई काकांचा थोरला भाऊ वारल्यावर त्यांनी त्यांचे तीन पुतणे शिक्षणा करीता गिरगांवात आणले होते, त्यातला सगळ्यात थोरला म्हणजे बग्या, काकूंची आई आणि दोन बहिणी आगोदरच त्यांच्याकडे राहत असत. अशाने चाळीतल्या त्या दहा बाय दहाच्या दोन खोल्यात ती अकरा माणसे राहत असत. मुंबई मध्ये काही काम निघाले कि गावाकडच्या माणसांचा राबता असायचाच. आमच्या मावशीकडे आम्ही सहाजण तर होतोच कि. बहुतेक घरी अशीच विस्तारित कुटुंब होती आणि वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत होती. पिढ्यानपिढ्या म्हणाना. बग्या हा त्यातल्याच एका पिढीचा भागीदार आणि साक्षीदार.
बग्याचे नाव बग्या असे का पडले ते कोणालाच माहित नाही. एखादेवेळेस त्याचे खरे नाव खूप मोठे किंवा कठीण असेल. बोलवायला सोपे जावे म्हणून बग्या हे टोपण नांव पडले असावे. शाळेतला हजेरीपट सोडला तर कोणालाच त्याचे संपूर्ण नाव माहित नव्हते. सगळे त्याला बग्याच म्हणत. भावंडांमध्ये सगळ्यात मोठा असल्याने देसाईकाकांच्या त्याच्या कडून खूप अपेक्षा होत्या. त्यांना वाटायचे हा चांगला शिकेल, नोकरीला लागेल आणि धाकट्या भावंडांना पण हात देईल, पुढे आणेल. पण तसे काही घडले नाही. बग्याचं आणि अभ्यासाचे काही जमेना. तो कसाबसा आठवी नववी पर्यंत गेला. दहावीला पुढच्या वर्गात ढकलला गेला आणि पुढे गणित – इंग्रजी खूपच अवघड जाऊ लागले. मॅट्रिकला एकदोन वेळा गटांगळ्या खाल्ल्यावर त्याने शिक्षणाचा नाद सोडला. पण धाकटे दोघे अभ्यासात बरे होते.
नाक्यावर चकाट्या पिटत बसण्यापेक्षा काही तरी हात पाय हलव, काम कर म्हणून देसाईकाका बग्याच्या मागे लागले होते. त्याच्याकरिता ते छोटी मोठी नोकरी शोधत होते. त्याच सुमारास त्यांना समजले कि चाळीत चौथ्या मजल्यावरच्या जोशी आजींकडचा वडे विकणारा सदू गांवी जाणार आहे, काकांनी मग जोशी आजींना सांगून ते काम बग्याला मिळवून दिले. साधारण संध्याकाळी पांच साडेपांचला, टोपलीत गरमा गरम वडे घेऊन चारही मजल्यांवर “वडे घ्या वडे, बटाटे वडे, गरम बटाटा वडा SSS ” अशी आरोळी ऐकली कि घेणारे जमा होत. त्या काळी त्याला त्या बदल्यात रोजचे दोन वडे आणि आठ आणे सुटत. जोशी आजींच्या वड्यांची चवच इतकी अप्रतिम होती की रोज खाल्ले तरी कंटाळा येत नसे. वड्या बरोबर त्या हिरव्या मिरचीचा ठेचा देत असत, शिवाय तिखट लसूण चटणी असायचीच. वड्याची टोपली घेऊन बग्या बाजूने जरी गेला तरी तळलेल्या खरपूस वड्यांचा घमघमाट सुटलेला असे आणि चाळीतील लोकांचे हात नकळत खिश्याकडे जात. आसपासच्या दोन तीन चाळीत पण बग्या वडे विकायला जात असे. बेडेकर सदन मध्ये तर बग्याची आठ दहा रोजची गिऱ्हाईके होती.
सुदैवाने एक महिन्या करीता गावी गेलेला सदू काही कारणास्तव परत आलाच नाही. बग्याला वडे विकण्याचे कायमचे काम मिळाले. बग्या सकाळी काकांच्या दुकानात मदतीला जात असे आणि संध्याकाळी वडे विकत असे. चार सहा महिने चांगले चालले होते. बग्याने विकणे सुरु केल्यापासून वड्यांचा खपही चांगलाच वाढला होता पण जास्त महिनात करून कि काय कीं जाणे, जोशी आजी आजरी पडल्या आणि पुढे पुढे त्यांना वडे करणे जमेना त्या मुळे बग्याचं वडे विकणं थांबलं. मग बग्या नाक्यावरच्या हरीच्या दुकानातून आलेपाक आणून चाळीत विकू लागला. त्या काळी आलेपाकाची एक मोठी वडी तो पंधरा पैशाला विकत असे. हरी त्याला ती दहा पैशाला देत असे, वरचे पाच पैसे बग्याचे.
“आलेपाक, आलेपाक, आलेपाक, सर्दी – खोकला झटपट मोकळा ” अशी हाळी आली कि चाळीतल्या बाया सुट्टे पंधरा पैसे घेऊन डब्यातली त्यातल्या त्यात मोठी वडी शोधून घेत असत. सहा नंबर वाले जोगळेकर तर रोज दोन वड्या घेत आणि उकळत्या चहात टाकून संध्याकाळी तोच चहा पीत. बग्याच्या आलेपाकाची ती एक किमया होती की चाळीतला कोणी कधी शिंकताना किंवा खोकताना दिसायचा नाही. इतकेच काय शेम्बडे पोर देखील कधी नाक पुसताना दिसायचे नाही.
आलेपाक विकून काय ते पैसे मिळणार म्हणून मग देसाईकाकांनी एका मध्यस्थाला सांगून बग्याला पोस्टात चिटकवला. थोडे दिवस हंगामी स्वरूपावर त्याने शिपायाचे काम केले, चार एक महिन्यांनी पोस्टात पोस्टमनच्या काही जागा भरण्याकरिता जाहिरात निघाली. बग्याने अर्ज केला आणि थोडा वशिला लावत तो कायम स्वरूपी पोस्टात चिकटला. पगार तसा बेताचाच पण सरकारी नोकरी. खाकी वर्दी, डोक्यावर लाल कड असलेली तिरकस टोपी लावून, खांद्याला खाकी झोमटी लटकावून आणि बगलेमध्ये पत्रांची चवथ घेऊन, बग्या जेव्हा चाळीत पत्र वाटायला येत असे तेव्हा घरातील इतरांना त्याचं खूप अप्रूप वाटायचं. खरं तर, कडक उन्हात गिरगावातल्या त्या चार चार मजली जुन्या इमारतींचे उंच उंच लाकडी जिने चढून बग्या घामाघूम होत असे. कोणाची मनी ऑर्डर वैगेरे असेल तर अजून जोखमीचे काम, पैसे नीट मोजून द्यावे लागत. त्यातच एखाद्याला वाचता येत नसेल तर पत्र वाचून पण दाखवावे लागे. तशी त्याला कोणाच्याच घरात एन्ट्री नव्हती. गॅलरीतच दोन पायांवर उकिडवा बसून तो मायन्यापासून समारोपा पर्यंत, पत्र वाचून दाखवत असे. कधी पत्रातून चांगली बातमी आली तर चहाचा घोट वैगेरे मिळत असे नाहीतर नुसतेच कोरडे आशीर्वाद.
बग्या असेल त्या वेळेस साधारण बावीस तेवीस वर्षांचा. उंची पाच फूट सहा इंच. मध्यम बांधा, रंग सावळा, पिंगट डोळे, तरतरीत नाक, शुभ्र दंतपंक्ती. डोक्यावर काळे कुरळे केस. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून आत्मविश्वासाने बोलण्याची सवय. नेहमीचा पोस्टाचा पोशाख सोडला तर चाळीत तो पट्टेरी अंडर पॅन्ट आणि बाह्या वाला बनियान घालायचा. नाक्यावर कुठे जायचे असेल तर पांढरा स्वच्छ लेंगा आणि अंगात पांढरा शुभ्र सदरा घालायचा. तसा तो देखणा नव्हता पण चारचौघांसारखा ठीक होता. बघितल्यावर हुशार वाटायचा. लग्नाला उभा राहिला असता, तर हसत कोणी मुलगी दिली असती. तशी त्याची पोस्टाची सरकारी नोकरी हि जमेची बाजू होती, पण मुख्य प्रश्न होता तो घरच्या जबाबदाऱ्या आणि राहत्या जागेचा.
काकांकडे मुलीबाळी असल्याने आणि राहण्यास जागा अपुरी पडत असल्याने बग्या पडवीतच राहायचा. चौथ्या मजल्यावर गच्ची समोर एक चिंचोळी जागा होती तिथेच त्याने संसार थाटला होता. देसाई काकांच्या खोलीचा आणि त्याचा संबंध तसा निव्वळ पत्ता लिहिण्यापुरता होता. कारण मागे एकदा जेवणावरून काकुंशी भांडण झाल्यापासून त्याने काकांच्या घरचे जेवण देखील सोडले होते. नाक्यावरच्या एका खानावळीत तो जमेल तसे जेवायचा, कधी पोळी भाजी तर कधी नुसताच वरण भात खायचा. चहा प्यायला शाळेजवळ टपरी होती, बाकी झोपायला इमारतीची गच्ची. अंघोळीला सार्वजनिक मोरी आणि सार्वजनिक संडास. नळ आल्यावर चौथ्या मजल्यावरील सगळी पिंपे भरण्याचे काम मात्र तो न चुकता करायचा. तेव्हढीच चाळीतल्याना मदत. गच्चीला लागून चिंचोळा खोलीवजा आडोसा होता, तेथेच त्याने आपले सामान एका ट्रँकेत ठेवले होते. खरे तर पोस्टात कायम झाल्यावर उपनगरात भाड्याने घर घेऊन वेगळे राहणे त्याला सहज शक्य होते, पण काकांच्या एकट्याच्या पगारात कुटुंबाचे भागले नसते आणि अजून सर्वाचीच शिक्षणं बाकी होती.
पोस्टात लागल्यापासून एका मित्रामुळे त्याला विडी ओढण्याचे व्यसन लागले होते. तर्जनी आणि लगतच्या बोटात नीट पकडून विडी शिलगावताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचे. दिवसभर उन्हा पावसात राबून दमल्यावर पाठीवर मायेने हात फिरवून विचारणारे कोणी नसल्याने विडी हीच त्याची मैत्रीण होती, जिव्हाळा होता, सखी होती, विडी हाच त्याचा विरंगुळा होता. एका जुन्या रिकाम्या स्टॅम्प पॅड मधील पॅड काढून त्याने ओळीने विड्या ठेवायला पेटी केली होती. लाल, निळ्या धागा बांधलेल्या विड्या शिस्तीने क्रमवार लावलेल्या असायच्या. त्यातील एक काढून काडीने शिलगावल्या वर त्याला कशाचे भान नसायचे. चाळीतल्या कुणीतरी चुगली केल्याने त्याचे बिडी प्रकरण काकूंना कळले आणि मग त्यांनी बग्याची चांगली खरडपट्टी काढली. काकूंची कटकट नको म्हणून मग बग्याने पुर्ण पगार काकूंच्या हातावर ठेवायला सुरवात केली, काकू त्यातील खाणावळीचे आणि चहा नाश्त्याचे पैसे त्याला काढून देत. विडीकाडी करिता मग त्याने पुन्हा हरी कडून आलेपाक आणून विकायला सुरवात केली.
बग्या पोस्टात कायम होऊन आता दोन तीन वर्षे झाली होती. घरोघरी पत्र वाटून त्याच्या ओळखी वाढत चालल्या होत्या. मोठं मोठया अधिकाऱ्यांशी संबंध येत होते. एकदा एका पारशी बाबाची मनी ऑर्डर देण्यास तो गेला आणि तो पारशी बाबा पोस्टाबाबत चौकश्या करत बसला. मनी ऑर्डरच्या फॉर्म वर त्याने पैसे न घेताच, ते मिळाल्याची सही देखील केली आणि बग्या सुद्धा बोलण्याच्या नादात रोख रक्कम द्यावयाची विसरला. रात्री घरी आल्यावर त्याला खिशात पैसे तसेच राहिल्याचे लक्षात आले. तो तडक निघाला. घरापासून दोन बसेस बदलत तो पारशी कॉलनीला पोहचला आणि त्याने क्षमा मागत त्या पारशी बाबाचे पैसे दिले. खरे तर बग्याने पैसे ढापले असते तर तो पारशी बाबा कायद्याने काही करू शकला नसता कारण तो पावती देऊन बसला होता. प्रामाणिकपणे रात्री मुद्दाम पैसे देण्यास आलेल्या बग्याचे त्या बाबाला खूप कौतुक वाटले. तो बाबा खूपच खुश झाला.
“अरे मी कंपनी मंदी डायरेक्टर आहे, तुझा कोण भाव बहीण असेल तर घेऊन ये, नोकरीला लावून देतो” पारशी बाबाने स्वतःहून सांगितले. मग बग्याने दोघा भावांना त्याच्या कंपनीत नोकरीला लावले.
असाच पार्सल द्यायला जाऊन जाऊन त्याची काही सोनारांशी पण ओळख झाली होती. दर महिन्याच्या पगारातून थोडी थोडी रक्कम बाजूला काढून बग्याने एका दिवाळीत, गावी असलेल्या आईला आणि काकूंना सोन्याच्या चांगल्या घसघशीत बांगड्या केल्या होत्या. त्याच सोनारांच्या दुकानात शब्द टाकून, त्याने काकूंच्या बहिणींना पण नोकरीला लावले होते. एकंदरीत काय तर,बग्याच्या प्रयत्नाने आता घरचे सगळेच नोकरीत स्थिरावत होते. थोडे फार कमावू लागल्याने घरात सुबत्ता आली होती. अशी पांच सहा वर्षे गेली. काकाही दुकानातून रिटायर्ड झाले. एक एक करत सगळ्या भावंडानी उपनगरात घरे घेतली, लग्न केली, काकूंच्या बहिणींची पण लग्ने झाली, सगळे मार्गाला लागले. पण ह्या गडबडीत, बग्या मात्र लग्नाचा राहून गेला. घरची जबाबदारी आणि भावंडांच मार्गी लावता लावता त्याच्या लग्नाला खूप उशीर होत गेला आणि नंतर त्याच्या वयाची मुलगी न मिळाल्याने त्याचे लग्न राहिले. मुख्य म्हणजे अजून देखील त्याने स्वतःचे असे घर घेतले नव्हते. गॅलरीत संसार थाटलेल्या माणसाशी कोण लग्न करणार?
पहिल्या पहिल्यांदा बग्याच्या ओळखीने नोकरी मिळाली म्हणून त्याचे धाकटे भाऊ आणि काकूंच्या दोघी बहिणी त्याला खूप मान देत. पहिल्या पगाराला प्रत्येकाने त्याला हॉटेलात नेले, नवीन कपडे शिवले, नवीन चप्पल घेतल्या, काय काय केले. पण हळू हळू जसे त्यांचे संसार वाढले, मुले झाली, तसे त्यांचे गिरगावात येणे कमी झाले,बग्याचे चित्र पुसट होऊ लागलं. बग्या मागे पडत गेला. बग्या आणि त्यांच्यातील अंतर वाढत गेलं आणि एकदा नात्यातील अंतर वाढत गेले की मायेचा ओलावा आपोआप कमी होत जातो तसे काहीसे झाले आणि बग्या एकटा पडला. अगदी एकटा.
आमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही परत घरी आलो आणि आमचे गिरगाव सुटले. त्याच दरम्यान ,मावशीच्या यजमानांचे निधन झाले. मावशीच्या एका मुलाने बोरिवलीला ब्लॉक घेतला होता आणि दुसऱ्याने कांदिवलीला, मावशीच्या दोन्ही सुना सरकारी नोकरीत होत्या. नातवंडांना सांभाळण्याकरता त्यांनी मावशीला बोलावून घेतले, ते कायमचेच. अशा रीतीने मावशीचे गिरगाव सुटले. थोडे दिवसांनी मुलांनी गिरगावातील जागा देखील विकून टाकली. त्या नंतर माझेही गिरगावात जाणे कमी झाले. तसा मध्ये एक दोन वेळेस गेलो होतो पण चाळीतील ती लहानपणीची मजा नव्हती. कधी कधी चाळीतला कोणी भेटला की एकेकाच्या खबरी मिळत. कोणी वारल्याचे कळायचे तर कोणी उपनगरात कोठे जागा घेतल्याचे, कोणाचे लग्न ठरल्याचे तर कोणाचे बिनसल्याचे कळायचे. पण बग्याचा विषय कधी निघाला नाही कारण सांगण्यासारखे बग्याच्या आयुष्यात काही घडलेच नव्हते. तर अशी हि बग्याची गोष्ट ……..
हिची साडीची पसंती अजून चालूच होती. हि मला काहीतरी विचारात होती म्हणून मी भानावर आलो.
“अहो, लक्ष कुठे आहे तुमचे, हा रंग झालाय का, ते विचारतेय ? ” हि एक साडी दाखवत मला विचारत होती. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या रंगांच्या इतक्या साड्या घेऊन देखील एखादा रंग राहू शकतो का? आणि राहिला असेल तर तो ओळखायचा कसा? हे मला आजतागायत न सुटलेले कोडे आहे. पण बग्या शांत होता. त्याने स्टुलावर चढून वरच्या खणातून अजून एक साडी काढली, स्टूल थोडे घसरले.
“अहो, सावकाश” मी ओरडलो.
“सवय आहे, मला” तो म्हणाला.
हीच विचारायची संधी आहे म्हणून मी त्याला विचारले “तुम्ही, ठाकूरद्वारला, शाळेजवळच्या चाळीत राहत होतात का हो? ”
“हो” एक स्मित हास्य देत तो म्हणाला.
“पोस्टात होतात ना नोकरीला ?” मी.
“हो बरोबर, पोस्टमन होतो, रिटायर्ड झालो, घरी बसून कंटाळा आला आणि मग ह्या दुकानात लागलो. आपण, मी ओळखलं नाही ” तो माझ्या जवळ येत म्हणाला.
“अहो मी, चिंतामणी तुमच्या शेजारी सिंधूमावशी नव्हत्या का रहात ? त्यांचा भाचा, शाळेत असताना त्यांच्याकडे राहायला होतो बघा आम्ही दोघे भाऊ, तेव्हा तुम्हीं शेजारीच तर राहायचात काकूंकडे. आज खूप वर्षांनी बघितलं, खूप फरक पडला तुमच्यात, खरं तर ओळखलंच नसतं, पण मालकांनी मघाशी बग्या म्हणून हाक मारली तेव्हा पासून विचार करतोय ” मी सांगितले.
“अहो, कसे ओळखणार? बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला, तुमच्या मावशींनी जागा सोडूनच दहा एक वर्षे झाली, तुम्ही राहायचात शाळेत असताना, त्याला सुध्दा तीस एक वर्ष होऊन गेली असतील, एव्हढ्या वर्षात फरक तर पडणारच ना ?” बग्याचा हिशेब बरोबर होता.
“मग तुमच्या देसाईकाकांकडचं कोण असतं हल्ली चाळीत?” मी विचारले.
“कोण नाही, काका गेले तेव्हा तर तुम्ही होतातच, नंतर काकूहि गेल्या. आशु आणि अर्चू लग्न होऊन पुण्याला गेल्या. दिलीप राहतो मालाडला. खोलीला कुलूप लावून ठेवलंय, टावर होण्याची वाट बघतोय, तसा दिलीप मला म्हणाला होता,बग्या तू खोलीत राहा म्हणून, पण म्हंटले नको, उगाच भानगड नको, उद्या इमारत बांधायला घेतली आणि माझें काही बरेवाईट झाले तर आमचे दोघे बंधू यायचे हक्क सांगायला, राहील त्याचे घर म्हणून, उगाच महाभारत घडायचं. दुसरे असे कि अख्खे आयुष्य गच्चीत उघड्यावर गेल्यावर घरात राहायची भीती वाटते हो, जीव गुदमरतो घरात, त्या पेक्षा आपली गच्ची बरी, रात्री आकाशातला नाईट लॅम्प आणि सकाळी नळाचा पाण्याचा गजर, आवाज आला कि उठायचं, बरं, हे सगळे फुकट, पाणी बिल नाही कि लाईट बिल नाही. नाही म्हणजे पोस्टाची पेन्शन मिळते तशी बऱ्यापैकी, त्यातून खाणावळीचे पैसे देतो आणि आपला आलेपाक आहेच ना जोडीला” हे सांगताना बग्या दिलखुलास हसला.
“तू कुठेतरी बँकेत आहेस ना, मॅनेजर म्हणून, आमच्या काकू आम्हाला नेहमी तुमचं उदाहरण देत असत, नेहमी सांगत, सिंधूमावशींच्या भाच्यांकडे बघा, कसे अभ्यास करतात ते, माय मरो नि मावशी जगो असं झालाय, कसे हुशार आहेत बघा, नावं काढली दोघांनी, नाहीतर तुम्ही ”
मग हिच्याकडे वळून तो म्हणाला “पहिल्या पासून हुशार हो हे दोघे बंधू, दोघांचा शाळेत पहिला नंबर असायचा आणि आमचा शेवटून पहिला, ह्यांच्यासारखेच काकांनी शिकायला मुंबईला आणलं आम्हाला, पण त्या गणित आणि इंग्रजिचं काही जमलं नाही बघा ”
मग मी हिला सांगितलं कि तेव्हाचे गिरगावातले ते दिवस कसे मंतरलेले होते ते. दोन खोल्यांमध्ये बारा पंधरा जण कसे राहायचो, कसे अभ्यास करायचो, सणासुदीला कशी मजा करायचो, तिथीला दही हंडी, गणपती उत्सव, खुप खुप मजा असायची. ….. बग्याहि कान देऊन ऐकत होता.
“चाळीत कोण आहे हो आता जुन्या पैकी ? ” मी विचारले.
“आहेत ना, तुम्ही तीन चार बिऱ्हाडकरू सोडून गेलात तेव्हढेच, बाकी सगळे आहेत, सगळे टावर होण्याची वाट पाहतायत, आपले आलेपाकचे जुन्यात जुने गिऱ्हाईक जोगळेकर काका आहेत आजून वय वर्ष ९९, आता पुढल्या वर्षी सेंचुरी मारली कि ब्राम्हण सभेत समारंभ करणार आहोत चाळीतले सगळे मिळून, त्या वेळेस या बरं, तुमचे पत्ते आहेत आमच्याकडे, बोलावूच तुम्हाला , जोगळेकर काका अजून क्रीझवर टिकून आहेत माझ्या आलेपाक मुळे, अजून रोज रात्री चहात आलेपाक घालून पितात” असे म्हणून बग्या पुन्हा खळखळून हसला.
“म्हणजे आजून आलेपाक विकता तुम्ही?” मी विचारले.
“अहो पैशाकरिता नाही, आता तशी गरज नाही, पूर्वी विडी काडीला लागायचे आलेपाकचे पैसे, पण काकू गेल्या तेव्हा विडी सोडली त्यांना आवडायचं नाही ना मी विडी ओढायचो ते, पण आलेपाक शिवाय दुसरे आहेच काय माझ्या आयुष्यात? ह्या दुकानात सुध्दा पैशाकरिता नाही नोकरी करत, आपल्या निरगुडकरांचा मनोहर होता इथे नोकरीला, तात्या निरगुडकर, तुलाही आठवत असतील, मनोहर लहान असतानाच वारले, बापाविना वाढलेला पोर, शिकला कमी, ह्या दुकानात इमान इतबारे नोकरी करायचा, पण नशिबाचे वासे फिरले कि काय होते बघा, मध्ये एकदा त्याला ताप आला, तो डोक्यात गेला, तेव्हापासून अंथरुणाला खिळून आहे, दोन वर्षे झाली, कधी बरं वाटणार आहे कोणास ठाऊक, दोन मुले आहेत पदरात, बायको आपली कुरडया, मिरगुंड,पापड आणून विकते, तिचे माहेर पेणचे ना, पण त्यांनी काय होतंय? मी रिटायर्ड झाल्यावर मोकळाच होतो, मालकांना भेटलो, म्हंटल मी काम करेन विना मोबदला, त्याच्या बदली, तेव्हढा त्याचा पगार बंद करू नका आणि दुसरा कोणी ठेऊ नका, मालक दर महिन्याला पगार त्याच्या घरी पाठवतात, मी त्याच्या बदली काम करतोय ते सांगितलंच नाही त्याच्या घरी. एखादेवेळेस आवडायचे नाही त्याच्या बायकोला, हो आणि आलेपाकाचं म्हणाल तर हरीची पंच्याऐशी वर्षाची बायको अजून आलेपाक बनवते, नाक्यावर एक दोघे गुजराथी दुकानदार ठेवतात त्यांच्या दुकानात, पण खप बेताचाच, म्हंटले, मला तरी काय काम आहे, हे दुकान बंद झाल्यावर, संध्याकाळी राऊंड मारतो चाळीत ‘आलेपाक आलेपाक ओरडत, जुनी सवय, त्या मुळे माणसे भेटतात, बोलतात, संवाद चालू राहतो, खुशाली कळते, हल्ली चाळीत सुध्दा काही लोक दरवाजे बंद करून बसू लागलेत तुमच्या त्या ब्लॉक सिस्टिम सारखे, पूर्वी वडीमागे पांच पैसे जास्त घेऊन पंधरा पैशाला विकायचो, आता दोन रुपयाला एक वडी विकतो, मुद्दलाच्या भावात, तेव्हढीच हरीच्या बायकोला मदत, हरी गेला तेव्हा त्याच्या दहाव्याला पिंडाला कावळा शिवत नव्हता, पिंडासमोर उभा राहून शपथ घेतली, सांगितले, मरेपर्यंत तुझा आलेपाक विकेन, एक वडी पिंडाजवळ ठेवली आणि नेहमी सारखा ओरडलो “आलेपाक, आलेपाक” म्ह्णून, हे ऐकल्यावर झाडावरचे सगळे कावळे खाली आले एकदम ” बग्या हसत हसत सांगत होता, पण त्याच्या बोलण्यात अगतिकता होती, कळकळ होती, त्याच्या सांगण्यात विनोद होता पण विनोदाला कुठेतरी दुःखाची झालर होती……..
“काय वाहिनी, आवडतेय का एखादी नऊवारी, एक तरी घ्या, विकलेल्या प्रत्येक साडीवर , मालक पांच टक्के कंमिशन देतात आम्हाला, तेव्हढेच आमच्या मनोहरच्या औषधाला उपयोगी पडतील, आपण एकमेकांच्या उपयोगी पडलं नाही तर माणूस म्हणून जगण्यात काय अर्थ?” आणि बग्याने एक साडी दाखवत हिला कशी शोभून दिसेल ते सांगितले. मग आम्ही ती साडी घेतली. मालकही आमच्या संभाषणाकडे कुतूहलाने पाहत होते.
निघताना बग्याने खाली वाकून पत्र्याचा एक गोल डबा काढला, तो डबा माझ्या ओळखीचा होता, त्याच डब्यातून बग्या तेव्हा चाळीत आलेपाक विकत असे. आश्चर्य म्हणजे तीस वर्षे झाली तरी तो गंजला नव्ह्ता.
त्यातील एक वडी माझ्या आणि एक वडी हिच्या हातावर देत तो म्हणाला
“साडी घेतल्या बद्दल माझ्यातर्फे हा तुम्हाला बोनस बरं , असेच भेटत चला, बोलत चला, आणि जोगळेकरांच्या सेन्चुरीला या स्टँडिंग ओव्हेशन का काय म्हणतात ते द्यायला.”
बग्याला भेटून आता सात आठ महिने होऊन गेले. त्याने सांगितल्याप्रमाणे परवा जोगळेकर आजोबांच्या शंभरीच बोलावणं आलं, ब्राह्मण सभेत कार्यक्रम आयोजित केला होता, सकाळी सत्कार समारंभ,दुपारी स्नेह भोजन आणि संध्यकाळी नाट्य संगीत असा भरगच्च कार्यक्रम होता. आयोजक समितीच्या सदस्यांची नावं खाली छापली होती, बग्याच नाव कोठे दिसत नव्हते, मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. बग्याचं काही बरं वाईट तर झालं नसेल ?
स्वस्थ बसवेना, चौथ्या मजल्यावरच्या केळकरांच्या जावयाचा नंबर माझ्याकडे होता, म्हंटले त्याला विचारावं, म्हणून फोन केला
“कोण बग्या ना, अरे तोच तर मुख्य आयोजक आहे, त्यांनीच तर सगळी धावपळ केलीय, नाहीतर आहे कोण त्या जोगळेकरांला” तो म्हणाला.
“मग, नाव कसं नाही बग्याच कुठेच” मी त्याला विचारलं.
“अरे,बग्याचं खरं नाव तुला तरी माहितेय का? काय छापणार? निमंत्रण पत्रिकेचे पान उलटून पाठी बघ ना, त्याच्या आलेपाकाची जाहिरात छापलीय, त्या खाली लिहिलंय ना शुभेच्छूक बग्या देसाई म्हणून, त्यांन तेवढंच छापा म्हणून सांगितले, म्हणाला तीच माझी खरी ओळख आहे.”
खरंच बग्या सारखी माणसं हि आलेपाकाच्या वडी सारखी असतात, अत्यंत गुणकारी, थोडी गोड, थोडी तिखट , पण जिभेवर ठेवल्या शिवाय कुठल्याच पदार्थाची खरी चव कळत नाही हेच खरं.
— चिंतामणी प्रभाकर मुळे.
Leave a Reply