मराठीची पताका क्षितिजापार नेऊन ठेवणारी ज्ञानशलाका म्हणजे ज्ञानेश्वरी.. महाराष्ट्र शारदेच्या चरणी तिच्या सुपुत्राने अर्पण केलेलं सदोदित सहस्त्रदलकमल म्हणजे ज्ञानेश्वरी, माऊलीच्या कळवळ्याने भक्ती-ज्ञानाचा साक्षात अमृतार्णव पाजणारी चिद्विलासी अखंडता म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीला तीनही संमित उपदेशांपलिकडे जाऊन मातृसंमित उपदेश म्हटलं आहे ते उगाच नाही! आणि खरंतर अशी कितीही ललितरम्य विधानं केली तरी त्याही पलिकडे प्रचंड उरणारी, खर्या अर्थाने ‘निरोपमु’ प्रत्यय देणारी ज्ञानेश्वरी.
‘..बोधाचा हा संसारा। जाला जो आमुते।।
तो घेऊनि आघवा। कळी गिळतया जीवा।
सर्व प्रकारे धावा। करी पां वेगी।।’
या गुरू आदेशावरून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली खरी, पण ज्या सहजतेने प्रवराकाठी, पैसाच्या खांबाला टेकून माऊलीच्या मुखातून साक्षात अमृतवाणी पाझरते आहे, सच्चिदानंद बाबांचं लेखकुपणच नव्हे, तर जीवित कृतार्थ होत आहे.. हे दृश्य शारदाही किती कौतुके पाहात असेल! ज्ञानेश्वरीच्या शेवटी माऊली लिहितात ‘बहु काय बोलू सकळां । मेळविलो जन्मफळा । ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा’ … त्याक्षणी ग्रंथपूर्तीचा समीप आलेला क्षण जाणवू लागतो, दिसू लागतात माऊली मूर्त प्रसन्नाताच होऊन बसलेले. ग्रंथपूर्तीचा कोण आनंद झाला असावा माऊलींना! ‘मेळविलो जन्मफळा’ या शब्दावरून वाटतं, की ज्ञानेश्वरीची निर्मिती हेच माऊलींच्या अवतार कार्याचं मुख्य उद्दिष्ट होतं याचंच तर हे सूचक आहे! म्हणून हे जन्मफळ.. गीतेचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, तर त्यासाठी त्याच तोडी-ताकदीचा प्रतिपादक हवा. म्हणूनच गीतेचा अवतार ज्ञानेश्वरी धरला, तर माऊलींना भगवान श्रीकृष्णाचा अवतार मानण्यात काहीच वावगं नाही. ‘ज्ञानेशो भगवान विष्णुः’ असा पैठणमधील धर्म मार्तंडांचा निर्वाळा आहेच! पण हा पूर्णतेचा क्षण किती हृद्य असेल! ‘माऊलीला’ही कृतार्थ करणारा, ग्रंथ सिद्धीचा सोहळा ज्या पैसाच्या खांबाने पाहिला तो किती भाग्यवंत म्हणावा!
पुन्हा एकदा, ग्रंथ सिद्धीचा सोहळा ‘तुम्ही’ दाविला जो हा, असं म्हणून किंवा ‘येथ माझे जी उरले पाईकपण’ हे माऊलींचे उद्गार पाहून कैवल्यतेजाची शालीनता पुन्हा पुन्हा दिसून येते. ज्याने इतक्या कोवळ्या वयात इतकं अनुचित सोसलं, त्याने त्याचा साधा उल्लेखही करू नये? हा काळास आहेच, पण पुढे जाऊन ज्यांनी अवहेलना केली त्यांच्यासाठीही पसायदान मागावं या करुणेला विशेषण तरी कुठलं द्यायचं? त्या कृतार्थतेतून आलेलं पसायदान म्हणजे खरंतर प्रत्येकाला, अगदी प्रत्येकालाच आपापल्या जन्म फळकडे नेणारा ह्रद्-मार्ग!
माऊलींनी गीतेला ‘सर्व शास्त्रांचे माहेर’ म्हटलं आहे. असं वाटतं, की माहेरच्या उत्कट जिव्हाळ्यानेच त्यांनी सर्व शास्त्रांच्या घड्या ज्ञानेश्वरीतून अलवार उघडल्या. म्हणूनच तत्वज्ञानाचा सुद्धा दहीभात करून माऊली प्रत्येकाला भरवते! आधीच ते अमृत आणि देणारा साक्षात शारदापुत्र म्हटल्यावर त्याचा मोह किती स्वाभाविक आहे! हितकारक सुद्धा.
काळाच्या ओघात, या ज्ञानेश्वरी नामक रसोत्कट अनुभूतीची अनेक हस्तलिखितं निर्माण झाली, पण त्याचसोबत अनेक अपपाठही त्यात शिरले. पण या सर्व प्रतींचं संशोधन करून, अपपाठ दूर सारून मूळ ज्ञानेश्वरी आपल्याला प्राप्त करून दिली ती शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी. या अर्थी ते मराठीतील पाहिले संपादकही ठरतात! या निमित्ताने ज्ञानेश्वरीच्या आजच्या शुद्ध आवृत्तीसाठी एकनाथ महाराजांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवं.
हे काम पूर्ण झालं ते भाद्रपद वद्य षष्ठी दिवशी. मूळ ज्ञानेश्वरीची तिथी ज्ञात नसली, तरी हा परिष्करण दिवस आपण श्री ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा करतो. शेवटी, काय काय आणि किती बोलावं, लिहावं उणेपणानं.. माऊलींबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल? ज्ञानेश्वरी आपल्या मातीचं संचित असणं, किंबहुना ज्या मातीत ज्ञानेश्वरी निर्माण झाली तिथे जन्म लाभणं हे जन्माने दिलेलं या अर्थी आपलं जन्मफळच नाही का? त्यातील अमृत निरंतर चाखत राहूयात, ‘शब्देविण संवादु’ हा अनुभव माऊलींसोबत घेण्याचं भाग्य माऊलीपणानं ते कधीतरी नक्कीच देतील!
ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त मनापासून इतकंच.
बहु काय बोलू आतां..?
-पार्थ जोशी
28parthjoshi@gmail.com
(नावासह शेअर करण्यास हरकत नाही)
Leave a Reply