सावरकर यांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. लहानपणी त्यांनी केलेल्या व्यायामामुळे शरीर मजबूत होते चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. प्राध्यापक पेंडसे लिहितात “१९२४ मध्ये सावरकर रत्नागिरीहून त्र्यंबकेश्वर येथे आले होते. अंदमानचा कारावास भोगूनही त्यांचे व्यक्तिमत्व विलक्षण होते. तेजस्वी गौर वर्ण कमवलेली रुंद भारदार छाती,पिळदार शरीरयष्टी, पाहून त्यांनी अंदमानच्या यातना कश्या सहन केल्या असतील ही समजून येते.” सावरकर यांना गबाळा वेष मुळीच आवडत नसे. विद्यार्थी दशेत लंडनमध्ये कोट पॅंट घालीत मात्र भारतात असताना धोतर कोट टोपी व वर काळी गोल टोपी घालत. गालावर लांब कल्ले सोनेरी काड्याचा चष्मा एका हातात छत्री असा वेष असे.
सावरकरांची विनोदबुद्धि सुद्धा विलक्षण होती. एकदा सावरकरांची बैठक चालू होती. तेव्हा एका माणसाचा विषय निघाला,कोणीतरी सांगितले की तो माणूस तोंडपूजा व सरकारशी सामील आहे. सावरकर म्हणाले ”सध्या आपण इन मीन तीन आहोत तेव्हा असलेल्या लोकांना दूर सारून आपण काय मिळवणार आहोत ? आपल्या जवळ घोडा नसला तर नसू दे गाढव आहे ना सध्या, त्याचा उपयोग करून घेऊ. घोडा मिळवायचा प्रयत्न करू तोवर हे गाढव हातचे घालवणे हा गाढवपणा होईल.” लिखाण तर सावरकरांचे अभिवाज्य अंग होते. अंदमानात त्यांच्या जवळ लिखाणाचे कोणतेही साहित्य नसताना काटे खिळे याच्या मदतीने भिंतीवर कमला काव्य लिहिले ते स्मरणशक्तीच्या जोरावर. उद्योगशिलता हा सुद्धा सावरकरांचा गुण होता. अंदमानमध्ये त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि बाटलेल्या हिंदूंचे शुद्धीकरणाचे काम केले.
— रवींद्र वाळिंबे
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई )
Leave a Reply