१९०१ च्या जानेवारीत इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया वारली. सातवे एडवर्ड हिंदुस्तानचे बादशाह झाले. त्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथील गावकरी सत्कार करणार होते.सावरकर तेथे गेले व त्यांनी सांगितले की “ राजा असो नाहीतर राणी ती कोणाची? राजा इंग्लंडचा म्हणजे आपल्या शत्रूचा. त्याच्या राज्यरोहणाच्या प्रसंगी राजनिष्ठा दाखवणे हि गुलामीशी राजनिष्ठा दाखवणे हा तर स्वराज्यद्रोह आहे.” त्यांनी हे केवळ सभेतच सांगितले नाही तर राजनिष्ठेची निषेध करणारी भित्तीपत्रकेही लावली.
सावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही” कारण सांगायच्या आधीच एका इंग्रजाने त्यांच्या तोंडावर ठोसा मारला. सावरकरांचा चष्मा फुटला. डोळा घायाळ झाला. रक्त वाहू लागले. पण भर सभेत निषेध करायचे धाडस त्यांनी दाखवले.
अंदमानात असताना उल्हासकर दत्त यांच्या बंडाच प्रकरण झाले, तो आजारी पडला त्याच्या अंगात १०७ ताप होता त्याच्याच्याने काम करवेना, पण तो आजारपणाच ढोंग करतोय असे सांगून त्याला विजेची पेटी लावून विजेचे धक्के दिले. तो तीन दिवस बेशुध्द होता. त्याला वेड लागले तेव्हा बंदिपाल बारी सावरकरांना म्हणाला “ तुम्हाला कधी वेड लागणार ?” सावरकर म्हणाले “तुम्हाला वेड लागल्यानंतर” पुढे ते म्हणाले “ मागे इंदुभूषण राय याने गळफास लाऊन घेतला तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात, त्याने वेडाच्या भरात कृत्य केले. उल्हासला वेड लागले त्याचे कारण असह्य कष्ट होते.” बारी म्हणाला, ” तो काम चुकवण्यासाठी ढोंग करतोय “ सावरकर म्हणाले “ जर उल्हासकरला वेड नसेल लागले तर तुम्हाला लागले असेल, तुम्ही राजबंद कैद्यांचा छळ थांबला नाहीत तर आम्हाला संप करावा लागेल “ बारीसारख्या क्रूरकर्माला बंदिवासात असताना सुनावणे हि सोपी गोष्ट नव्हती.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार (शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई )
Leave a Reply