१९३७ मध्ये सावरकर पुण्याला आले होते.तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक निघाली. श्री शं. ग. चापेकर त्यावेळी वर्ग चालवत. त्यावेळी त्यांनी सावरकरांना हार घातला.व वंदन केले. सावरकरांनी त्यांना विचारले “आपण कोण ?” ते म्हणाले “मी चापेकर” सावरकर म्हणाले “ चापेकरांनी सावरकरांना हार नाही घालायचा. मीच चापेकराना हार घालायचा कारण मी चापेकर बंधुंपासून स्फूर्ती घेतली. असे म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील हार श्री शं. ग. चापेकर यांना घातला. १९३८ मध्ये सावरकर पनवेल येथे गेले होते. तेथे त्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतण्याने त्यांना हार घातला. व सांगितले कि फडक्यांची पत्नी जवळच शिरढोण येथे राहतात. व्याखान झाल्यावर सावरकर शिरढोण येथे गेले, त्यांना लवून नमस्कार केला. व पायावर हार घातला. १९३९ मध्ये सावरकर कलकत्याला गेले होते. त्यांच्या सत्कारावेळी त्यांना हार घातले गेले. त्यावर ते म्हणाले “याच पावन भूमीत क्रांतिकारक झाले. तेव्हा मला त्यांची आठवण येते आहे.” त्यानंतर त्यांच्यासोबत अंदमान मध्ये हृषीकेश, भूपेश गुप्ता, आशुतोष लाहिरी यांनी शिक्षा भोगली होती. त्यांचाही सन्मान व्हायला हवा म्हणून आपल्या गळ्यातील हार काढून त्यांना घालून मिठी मारली.
मादाम कामा सावरकरांची दुसरी आई होत्या. त्यांच्या बद्दल सावरकरांना अत्यंत आदर होता. त्यांनीसुद्धा सावरकरांवर पोटच्या मुलाप्रमाणे माया केली. १५- १२ १९१४ ला भावाला लीहिलेल्या पत्रात सावरकर म्हणतात “कामांना भेटायची उत्कंठा मला किती आहे मी सांगू शकत नाही. त्या तुला नियमित पत्र पाठवतात. हे वाचून आनंद झाला. त्यांच्या उदात्त चरित्र याबद्दल अत्यंत आदर आहे. मी त्यांना समक्ष भेटू शकत नाही याचा मला खेद आहे तेव्हा आपल्या आप्ता आधी मादाम कामांना माझा प्रणाम सांग.” १९२५ मध्ये सावरकरांचे अत्यंत जवळचे स्नेही अय्यर निधन पावले. त्यावेळी लिहिलेल्या मृत्युलेखात ते लिहितात “अति दु:खामुळे माझे जीवन असह्य झाले होते. अनेकदा जीवनही नकोसे वाटे. तुझ्या निधानानी माझ्यावर ताण पडला आहे, ज्यांच्यासाठी तू सोसलेस त्यांनी तुझ्याशी सबंध ठेवले नाहीत. तू जी गुप्त कामे केलीस ती लिहावीशी वाटतात पण लिहू शकत नाही. तुला जिवंतपणी कधीच शांतता लाभली नाही ती आता तुला लाभो.“
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई).
Leave a Reply