नवीन लेखन...

बाहुबली आणि आयुर्वेद!

Bahubali and Ayurveda

बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती.

चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
बाहुबली आणि भल्लालदेव (की बल्लाळदेव?) यांच्यातील द्वंद्वयुद्धाचा प्रसंग आठवा. रक्तबंबाळ बाहुबली शिवाच्या पिंडीवरील भस्म उचलतो आणि आपल्या भळभळत्या जखमांवर लावतो आणि अल्पावधीतच रक्त वाहायचे कमी होऊ लागते. हा शिवाचा चमत्कार म्हणायचा, दाक्षिणात्य तडका म्हणायचा की अन्य काही?! हा चमत्कार नाही; रजनीकांत स्टाईल तडकादेखील नाही. हा आयुर्वेद आहे. आश्चर्य वाटलं ना? पण अगदी आयुर्वेदच आहे हा!
सुश्रुतसंहितेत अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी आलेली ही सूत्रे पहा;

चतुर्विधं यदेतद्धि रुधिरस्य निवारणम् |
सन्धानं स्कन्दनं चैव पाचनं दहनं तथा ||
व्रणं कषायः सन्धत्ते रक्तं स्कन्दयते हिमम् |
तथा सम्पाचयेद्भस्म दाहः सङ्कोचयेत् सिराः ||

(सुश्रुतसंहिता सूत्रस्थान १४/ ३९-४०)
चार प्रकारांनी रक्त वाहणे रोखता येते. संधान, स्कंदन, पाचन आणि दहन. यांतील संधान हे तुरट रसाच्या वनस्पतींच्या काढ्याने, स्कंदन हे थंड गुणाच्या गोष्टींचा वापर करून, पाचन हे भस्म वापरून तर दाह हा तापलेली शलाका वापरून केला जातो. यातील दाह हा प्रकार आजही शस्त्रकर्म करताना वापरतात; त्याला cauterisation असं म्हणतात. हा संदर्भ आयुर्वेदाला कालबाह्य समजणाऱ्या लोकांसाठी सहज नमूद करत आहे. आपल्यासाठी इथे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भस्म. रक्त थांबवण्यासाठी वापरण्यात येणारे हे भस्म म्हणजे औषध म्हणून वापरले जाणारे धातूंचे भस्म नसून इथे विशेषतः तुरट रसाच्या वनस्पती वा रेशीम, कापूस इत्यादी जाळून तयार केलेले भस्म अपेक्षित आहे. पूर्वी यज्ञ, होम हवन होत असत. त्यात वापरल्या जाणाऱ्या समिधा बहुतांशी औषधी वनस्पतींच्या असत. या भस्माचा उपयोग संध्यावंदनाच्या वेळी केला जात असे. आपल्याकडे भस्मस्नान हा एक स्नानप्रकारदेखील सांगितला आहे. सुश्रुत संहितेत वर्णन करण्यात आल्याप्रमाणे या भस्माचा वापर करून रक्तस्राव खरोखरच थांबवता येतो हे आम्ही आयुर्वेद शिकताना प्रत्यक्ष करूनदेखील पाहिले आहे. (कृपया आयुर्वेद वैद्यकीय सल्ल्याशिवाय हा प्रयोग कोणीही स्वतः करायला जाऊ नये. वैद्यांची देखरेख अत्यावश्यक आहे.) बाहुबलीच्या या एका दृश्यात हा आयुर्वेद अंश सामावला आहे. अन्य काही ठिकाणी नाडी परीक्षणाचे एक दृश्यही आहे. मात्र त्यात दाखवलेला वैद्य अभिनेता चुकीच्या बाजूला नाडी पाहतो आहे; काही चित्रपट वा मालिकांत डॉक्टरची भूमिका करणारे अभिनेते स्टेथोस्कोप उलटा लावत असतात; अगदी तीच गत इथे नाडी परिक्षणाची झाली आहे.
विषयाच्या अनुषंगानेच हेही आवर्जून नमूद करावेसे वाटते की; तलवार, भाला, गदा, मुद्गर, शक्ति आदि एक से बढकर एक घातक आयुधे वापरून ज्या काळात युद्ध होत असे त्यावेळी जखमींना केवळ मलमपट्टी करण्यास नव्हे तर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासही आयुर्वेदच होता. असे खंडीभर संदर्भ सुश्रुतसंहितेत मिळतील. जिथे ब्रिटिशांनी आमच्याकडच्या विणकारांचीदेखील बोटे छाटली तिथे शस्त्रकर्म आणि मर्मविद्या जाणणाऱ्या व्यक्तींची या परकीय आक्रमकांसमोर काय कथा? यामुळेच एकेकाळी प्रगत असलेल्या आयुर्वेदीय शल्यतंत्राचा आज थेट प्रत्यक्ष वापर फारसा दिसत नाही. कदाचित बाहुबलीच्या आगामी भागात शल्यतंत्रातील एखादा संदर्भ मोठ्या पडद्यावर पहायलादेखील मिळेल. तूर्त बाहुबली-२ पाहताना वर नमूद केलेले दृश्य पाहताना आयुर्वेदाला नक्की आठवा!

जय माहिष्मती!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..