नवीन लेखन...

बहुगुणी आवळा (विज्ञान कथा)

आज जंगलातील वातावरण शांत निरामय होते. दुपारची वेळ होती. एका झाडावर माकडांचा कळप गप्पा मारत बसला होता. बालक माकडांची आजी त्यांना गोष्टी सांगत होती. आजचा विषय “जंगलातील झाडांचा परिचय” हा होता. एकेका झाडाचा, त्याच्या फांद्यांचा, त्यांच्या मजबुतीचा परिचय देवून झाला होता. बालक माकडे कान देवून ऐकत होती. त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका विचारून निरसन करून घेत होती. विविध झाडांची, त्याच्या पानांची, फुलांची, फळांची माहिती घेत होती .

तेवढ्यात एका बालक माकडाने जवळचं असलेल्या झाडाकडे बोट दाखवत शंका विचारली, “ आजी, आजी ते बघ ते झाड दिसतयं ना तुला ! त्या झाडाला कित्ती फळं लगडलेली दिसत आहेत! काय गं त्या झाडाचं नाव ?”

“अरे बाळा ते आवळीचे झाड. मी सांगणारच होते त्याची गोष्ट तुम्हाला… माझी एवढी गोष्ट सांगून झाल्यावर…” असे बोलून आजी दुसरी गोष्ट सांगायला सुरुवात करण्याच्या तयारीत असताना बालक माकड बोलले…..

“आजी, थांब थांब…. तू गोष्ट सांगायला सुरुवात करण्याअगोदर मी दादाला बोलवतो. त्यालाही काही शंका आहेत. तो त्याच्या मित्राला त्याच झाडाबद्दल काहीतरी विचारात होता. पण त्याच्या मित्राला फारसं काही सांगता आलं नाही म्हणून दादा हिरमसून बसला होता परवा.”
“बरं बाबा थांबते मी…. बोलाव आपल्या दादाला …. त्याला मीच पाठवले होते तुझ्या आईला मदत करण्यासाठी.”

बालक माकड आपल्या दादाला बोलावण्यासाठी गेले. मग बाकीच्या माकडांनी अंग मोकळे करण्यासाठी या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारल्या. काही मादी माकडं शेजारणीच्या केसातील उवा काढत बसल्या… खूप छोटी बालक माकडे आपापल्या आईच्या छातीला कवटाळून बसण्यासाठी तिचा शोध घेत होते… काहींनी ते ज्या झाडावर बसले होते त्या झाडाची फळे तोडून त्यांचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. तेवढ्यात बालक माकड आपल्या दादाला घेवून आले.

माकडांची सभा पुन्हा भरली. आता बालकांसोबत त्यांचे पालक सुद्धा आले होते. त्यांनाही आपल्या ज्ञानात भर पडेल असे वाटले. काहींना विरंगुळा पाहिजे होता… म्हणून तेही या सभेत सहभागी झाले होते… आणि आजच्या सभेला बालक – पालक मेळाव्याचे स्वरूप आले होते.

आजी सांगू लागली, ” आवळा हा मध्यम आकाराचा 8 ते 9 मीटर ऊंची पर्यन्त वाढणारा आणि पर्णझडीचा वृक्ष आहे. जी जमीन समुद्र सपाटी पासून 1299 मीटर उंच असते अशा जमिनीवर हा वृक्ष वाढतो. हा वृक्ष हलक्या जमिनीत सुद्धा चांगला वाढतो. भारतातील पश्चिम घाट व पूर्वेच्या भागातील अल्कली जमिनीवर सुद्धा येतो. हा वृक्ष 46 से.ग्रे. पर्यन्त तापमान सहन करू शकतो. कोरडवाहू जमिनीवर घेण्यासाठी उत्तम पीक आहे हे. या झाडास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. या झाडाला नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये फळे येतात. ही फळे औषधी गुणधारक असतात. यात जीवनसत्व ‘क’ भरपूर प्रमाणात असते. याची फळे सहा रेखायुक्त व आत बी असणारे असतात.”

मध्येच एका पालकाने प्रश्न विचारला, “ या झाडाच्या फांद्यांचा, काड्यांचा आपल्याला नक्की उपयोग करून घेता येईल नाही का पावसाळ्यासाठी ?”
“हो तर निश्चित…. कसं आहे बघा आवळ्याची लाकडं आहेत ना ती खूप कठीण असतात आणि ती पाण्याखाली उत्तम टिकतात. ”
“आजी, आजी आपली शेतकरी मंडळी याची लागवड कशी करत असतील गं ?”

“या झाडाची लागवड विविध रितीने करता येते..

रित क्र.. 1 : आवळा फळातील बिया (आटाळी) काढून सावलीत सुकायला ठेवावे. चार पाच दिवसांनी ते तडकुन चॉकलेटी रंगाच्या 4 बिया बाहेर पडतात. लागवडीसाठी बिया नेहमी ताज्या वापरव्यात. जुन्या बियांची उगवण क्षमता कमी असते. बियांना गरम पाण्याचा उपचार पाच मिनिटे द्यावा. असे उपचार केलेले बीज पेरल्यास आठवडाभरात उगवण सुरू होते.

रित क्र. 2 : आवळ्याच्या झाडाचे डोळा कलम करून रोपे तयार करतात. यामुळे मुळची झाडे सुधारित वाणामध्ये बदलता येतात.”
“मुळची झाडे सुधारित वाणामध्ये बदलता येतात म्हणजे काय असतं गं आजी .”
“अरे बाळा, अलीकडील काळात आपले शेतकरी मित्र नवीन नवीन प्रयोग करत असतात. लोकसंख्या वाढली तशी सगळ्याच पिकांची चणचण भासू लागली. जास्तीच्या उत्पादनाची निकड जाणवायला सुरुवात झाली. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात ते उगाच नाही. जुनी झालेली झाडे उत्पादन कमी देतात तेंव्हा याच झाडांची नवनवीन वाणं शोधली जातात. याकामी शेतकरी मित्रांना कृषि संशोधक मित्रसुद्धा खूप मदत करतात. ते शेतकर्यांासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करतात. या शिबिरांमधून उत्पादन वाढविण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत यांचं मार्गदर्शन करतात.’’
“मी तर ऐकलय की हे जे संशोधक शास्त्रज्ञ असतात नं… त्यांच्या सुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस आयोजित केले जातात. या कॉन्फरन्सेस मधून ते संशोधक शास्त्रज्ञ आपापले प्रबंध सादर करतात.” दुसरे पालक माकड बोलले.
“हो तर, मी सुद्धा ते ऐकलं आहे ते…. तर मी काय सांगत होते रे बाळांनो आठवतय का कुणाला ?”
“आजी तू आम्हाला आवळ्याच्या झाडाची लागवड विविध रितीने कशी करता येते ते सांगत होतीस.”
“हां आलं माझ्या लक्षात …. तर…

रित क्र. 3 : आवळ्याचे झाड कापल्यावर फुटवे अधिक जोमदार येतात.

रित क्र. 4 : आवळ्याच्या झाडाच्या मुळांपासून सर्कस फुटतात.
आणि यापासून सुद्धा आवळ्याची झाडे पिकविता येतात. विशेषत: जंगलातील आवळ्याच्या झाडांची उगवन अशा रीतीने होत असते.’’

“आजी ग आजी, आवळ्यांच्या झाडांची लागवड कशी करत असतात हे सांगतांना तू एक वाक्य बोललीस की, आवळ्याच्या झाडामध्ये औषधी गुण आहेत. कसं ते संग ना बरे ”
“ऐका तर मग.. च्यवनप्राश / अमृतप्राश तयार करण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त फळ आहे. आवळा यकृत उत्तेजक आहे. पित्तनाशक आहे.”
“आजी ग आजी, पित्तनाशक म्हणजे ग काय ?”
“अरे हो हो हो … सांगते ना मी … थोडा दम तर धरशील ….
“आपलं डोके दुखतं की नाही ते कशामुळे दुखतं माहिती आहे का तुम्हाला ?”
या प्रश्नावर सगळ्याच बालक माकडांनी नकारर्थी माना हलविल्या, हे पाहून आज्जी बोलली,
“आपल्या शरीरात पित्त, कफ, आणि वात असे तीन गुण वाशिष्टे असतात. त्यापैकी आपल्या शरीरातील पित्ताची मात्रा बिघडली किंवा जास्त झाली तर त्याला पित्त खवळले असे म्हणतात. म्हणून मी म्हंटलं की आपले डोके दुखत असेल तर आवळ्याचे चूर्ण मधात घ्यावे.”
“आजी दातदुखीवर आवळा उपयोगी पडत नाही का ग ? ”
“हो तर …. दात दुखीवर आवल्याची साल चघळावी. म्हणजे दातदुखी कमी होते.”
“माझ्या बायकोचे गळतात आणि माझे तर पांढरे सुधा होत आहेत. या आवळ्याच्या उपयोगाने काही फरक पडला तर बरे होईल बुवा “ एक पालक माकड बोलले.

“अरे व्वा नक्की नक्की … केस गळणे वा केस पिकणे यावरील उपायासाठी आवळा तेल उपयुक्त आहे. अर्धा चमचा मधात 15 ग्राम आवळ्याचा रस घालून रोज पिला तर केस पांढरे होणे थांबून पुन्हा काळे होण्यास सुरुवात होते.” माहिती सांगत सांगत आजीने आपली मांडी बदलली.
“ मी तर असे ऐकले आहे की, डोळ्यांची निगा राखण्यासाठी आवळ्याचा खूप उपयोग करतात लोक. आजी सांगा ना बरे आम्हालाही त्याची पद्धत’’… एक मादी माकड काळजीच्या स्वरात बोलली.
“चांगला प्रश्न विचारलास तू … मला खूप आवडतात असे प्रश्न… ऐक तर मग … डोळयांची काळजी घेण्यासाठी आवळ्याची फळे रात्री पाण्यात भिजत टाकून त्या पाण्याने डोळे धुवावीत.”
“ अहो आजी आमच्या पिंटूची एक नवीनच समस्या सुरू झाली आहे. त्याचं दहावीचं वर्ष सुरू झालंय …. त्याचे सर,मॅडम त्याला दररोज काही सूत्र, काही प्रश्न-उत्तरे पाठ करायला देत आहेत. तो पाठ करण्याचा प्रयत्न सुध्द्धा करतो बिचारा ….पण त्याच्या लक्षातच राहत नाही काही. काय करावं काहीच सुचत नाही आम्हाला …..” दुसर्याच मादी पालक माकडाने समस्या मांडली .
“आवळ्याच्या नित्य सेवनाने स्मृतीवर्धन होते म्हणजे स्मृति वाढते.” आजीने उपाय सांगितला.

आजी पुढे बोलू लागली ….ती म्हणाली आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होवून ऐका, कोणीही काही शंका असतील तर माझं बोलून झाल्यावरच सुरुवात करायची. मध्येच कोणीही बोलायचं नाही. ऐका तर मग… “ मुरांबा करण्यासाठी चकैय्या जातीचे आवळे खूप चांगले असतात. तर शरीराची कांती तजेलदार होण्यासाठी व केस काळे होण्यासाठी आवळकंठी किंवा भाजलेले आवळे आणि गोड तीळ एकत्र वाटून अंगास चोळावेत आणि गरम पाण्याने स्नान करावे. आवळकंठीचे चूर्ण व तिळाचे चूर्ण समभाग एकत्र करून तूप व मध यामध्ये सकाळी घ्यावे. याने देह तेज:पुंज होतो. वय झाल्याचा खुणा हळूहळू नष्ट होतात. तसेच तोतरे किंवा अडखळत बोलणाराचे बोलणे, उच्चार यात स्पष्टता येण्यासाठी रोज एक हिरवा आवळा खावा. भूक किंवा पचनशक्ती वाढवायची असेल, शांत झोप लागावी असे वाटत असेल तर सुक्या आवळ्याचे 3 ग्राम चूर्ण रात्री झोपतांना मध व पाण्यासोबत प्यावे. त्यानंतर काही खाऊ किंवा पिऊ नये.” असे सांगून आजीने गोष्ट संपविली.

— श्रीपाद यशवंतराव देशपांडे
जिल्हा परिषद कन्या शाळा परभणी
9421083255

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..