मन भरून येणारी सैर
ही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो,
तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात,
“फ्लॉवर कोबी नीट बघून घे रे, कीड नाही ना आत…”
आता कीड पाहण्यासाठी किती आत जाणार ? पण मी आपला “हो” म्हणतो.
लगेच पुढे, कोथिंबीर जुडी घे मोठीशी आणि मसाला घेतानाही थोडी कोथिंबीर टाकायला सांग तिला. कडीपत्ता माग भरपूर..”
आता, मी काही मागत वगैरे नाही, पण त्या ही सवयीप्रमाणे तटातटा कडीपत्त्याच्या दांड्या तोडून टाकतात पिशवीत.
पुढे, “ती सांगेल तो भाव ऐकून पैसे देऊ नकोऽऽऽस, कमी कर. ती तुला भाऊ भाऊ म्हणून गुंडाळते.”
आता काय बोलणार यावर. या सगळ्या सूचना नित्याच्याच असतात. मी पैसे खिशात सारून आणि पिशव्या गुंडाळून मार्गाला लागतो. बायकोने थोडे जास्तच पैसे दिलेले असतात, कारण तिला कल्पना असते की मी सांगितलेल्याच गोष्टींबरोबरच लक्षात ठेवून इतर वस्तूही घेत असतो. त्यामुळे वस्तूंची यादी हातात ठेवल्यावर ही म्हणते, “हे आणायचंय, आणि बाकी तुला काही आठवलं तर आण.
मी पिशव्या फलकावत भाजी बाजारात येतो. हिरव्यागार भाज्या दृष्टीला पडल्या ना, की माझ्या चित्तवृत्ती का काय म्हणतात, त्या अगदी फुलून येतात. मटारचा मोसम सुरू झाल्यावर तर तो घेतल्याविना मी घरी परतत नाही. आजकाल तो गोड गावठी मटार औषधालाही दिसत नाही. सगळीकडे टणटणीत गोट्यांच्या आकाराचे दाणे असलेला मटारच दिसतो. मधून मधून नाशिकचा मटार बाजारात येतो, आणि मी एक दोन किलो उचलतो. तो सोलताना बारीक गोड दाणे भांड्यात न पडता पोटात जात रहातात. हीची बडबड सुरू असते, तरीही मी खाणं काही थांबवत नाही. लांबसडक कमनीय बांध्याची रसरशीत लालबुंद गाजरं पाहिली, की माझ्या डोळ्यांसमोर हलवा, ताजं लोणचं उभं रहातं(किती अरसिक मी) तसा किसण्याचा त्रास असतो, पण पुढे सगळं गोड होणार असतं.
म्हणजे काय? तर मला कोणतीही भाजी दिसली ना की तिचं finished product डोळ्यांसमोर दिसायला लागतं.माझी भाजीवाली(म्हणजे मी जीच्याकडून भाजी घेतो ती)मी आलो की, “ताई नाय आल्या….?” असं कधीही विचारत नाही, पण कधी ही एकटीच गेली आणि भाव करायला लागली की ती लगेच विचारते, “ताई, भाऊ नाय आले….?” त्यावर ही लगेच उत्तरते,
“कशाला भाऊ?, तू सांगशील त्या भावाने घेतात म्हणून वाटतं ?”
अहो, त्या भाजीवाल्या किती लांबून, पहाटेची ट्रेन पकडून भाजी विकायला येतात. दुपारपर्यंत सावली आडोशाने बसून भाजी विकतात. वीस पंचवीस रुपये त्यांना जास्त गेलेच तर काय होणारय असं?.
या माझ्या समर्थनावर ही लगेच म्हणते, “व्यवहार म्हणून तुला कळत नाही….”
तर सांगत काय होतो, तिच्याकडे एका टोपलीत लालसर चिकू असतात. चिकूच्या रंगावरूनच कळतं की हा गोड असणार. वीसचे पाच असा भाव ती सांगते पण पिशवीत टाकताना दोन वर टाकते, बोनस म्हणून. भरिताची गबदुल वांगी बघितली, की मला ताटात वाढलेलं खमंग भरीत, भाकरी, दही आणि शेंगदाण्याची चटणी असा बेत डोळ्यांसमोर उभा रहातो, आणि घेऊन टाकतोच मी एक वांगं. भाज्यांच्या एका हाताला सापासारखी पसरलेली, लांबसडक कोवळी पडवळ लक्ष वेधून घेतात, आणि त्यांनाही सोबत घेतल्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरत नाही. घेवडा, फरसबी या भाज्यांकडे का कोण जाणे, मी फारसा आकर्षित होत नाही. फार फार तर गवार एक पाव किलो घेतो झालं. लांबडे दुधी आपली शेंडी दाखवत स्वतःकडे लक्ष वेधून घेत असतात. कोबी मी एकच गोष्टीसाठी घेतो, पचडी. मस्त किसून त्यात दाण्याचं कुट,मिरची, साखर,मीठ आणि वरून तेल मोहोरीची फोडणी दिल्यावर चविष्ट पचडी तयार होते, वाह ! मस्त.
शेजारीच लालबुंद गोमटे टॉमॅटो टक लावून पहात असतात माझ्याकडे. घेतले की अगदी आनंदाने टणाटण उड्या मारत सगळ्यात वर उतरतात पिशवीत. कोथिंबीरीचं माझ्या बायकोला फार वेड आहे. ती बाजारात गेली की पुष्प गुच्छासारख्या भल्या मोठ्या दोन जुड्या घेऊन येते आणि पाठ भरेपर्यंत त्या निवडत बसते. तिला म्हटलं,
“अगं कशाला या मोठ्या जुड्या आणतेस, मग तुलाच त्रास होतो.”
यावर फक्त भुवया विस्तारून ती म्हणते,
“हे सल्ले देण्यापेक्षा थोडी मदत कर मला.”
मग मी लगेच गप्प बसतो आपला.
मी आपल्या छोट्या जुड्या घेतो.
अशा तऱ्हेने एक एक वस्तू घेत घेत पिशवी भरून जाते, मी भाजी खरेदी आवरती घेतो आणि तिने सांगितलेले पैसे देऊन समाधानाने तिथून निघतो. पुढे दहा पावलांवर पालेभाज्या बसलेल्या असतात.
“मेथी तू निवडून देणार असलास तरच आण”
असं हिने आधीच सांगितलेलं असतं. पण ती हिरवीगार टवटवीत पानांची जुडी पाहून पाय पुढे निघत नाहीत, परतून केलेली भाजी, किंवा ठेपले समोर उभे रहातात आणि अखेर तिला पिशवीत जागा मिळते. गडद हिरव्या रंगाची हत्तीच्या कानाएव्हढ्या पानांची अळूची जुडी समोर दिसत असते, पण डोळ्यांसमोर दिसणाऱ्या अळूवड्याना पुसून मी मार्गस्थ होतो.
तिथून अगदी पुढेच म्हणजे मराठा कॉलनी दहिसर पूर्व इथे एक मराठी तरुण आणि सुशिक्षित जोडप्याचा अल्पोपहार स्टॉल आहे. स्टॉल म्हणजे डोक्यावर मोठ्ठी थोरली छत्री आणि त्याखाली स्वच्छ टेबलावर सगळी मांडणी केलेली. तसे आमच्या जवळपास खाण्याचे अनेक स्टॉल थाटलेले दिसतात, पण मला कधी तिथे जावं आणि काही विकत घ्यावं असं वाटलं नाही. पण इथून मात्र मी अधून मधून काही घेतो, याचं कारण म्हणजे स्वच्छतेचे बेसिक नियम पाळलेले दिसतात, तो आणि ती दोघंही अगदी हसतमुख आणि ग्राहक जोडणारी. याआधी तोच दिसायचा स्टॉलवर, पण हल्ली मात्र ती असते. सकाळी आठ वाजता हा स्टॉल सुरू होतो. छान स्टीलचे डब्बे, कॅसरॉल भरून पोहे, उपमा, गोड शिरा, साबुदाणा खिचडी, इडली, मेदुवडे सोबत भरपूर चटणी सांबार. प्रत्येक पदार्थाला उत्तम चव आणि माफक दर. ग्राहक तयारच असतात घ्यायला. पार्सल पॅक, चमचे, कागदी प्लेट सगळं जय्यत तयार असतं. आता आमच्याकडे रोज सकाळी ताजं खाणं लागतं. पण अधून मधून हिला कंटाळा आला की मी या स्टॉलकडे वळतो. भाजी घेऊन येत असताना तो हाक मारतो,
“काय काका कसे आहात ? आज नाही घेणार काही ?”
पावलं थबकतात आणि आधी हिला फोन करतो, काही बनवलं असेल तर फुकट जायचं.
“अगं काय बनवलयस खायला ?”
त्यावर अगं उत्तरते,
नाही अजून, आता पोहे करायला घेतच होते(मी काहीतरी घेऊन येणार ही थोडी तिलाही कल्पना असतेच)
“अगं नको काही करुस, मी येतोय घेऊन.”
मग इडली, पोहे किंवा मस्त खिचडी अशा साग्रसंगीत नाश्त्याचं पार्सल घेऊन मी पुढे होतो.
तिथून थोड्या अंतरावर माझा केळीवाला बसलेला….नाही उभा असतो. तो बहुधा बसलेला कधीच दिसत नाही. मी शक्यतो त्याच्याशिवाय कुणाकडे केळी घेत नाही. आम्ही दोघंही मौनातून बोलतो. त्याला माझा कोटा माहीत असतो, तेव्हढी तो पिशवीत हळुवार टाकतो, मी पैसे देतो आणि वाटेला लागतो.
आता शेवटचा स्टॉप येतो माझ्या फुलंवालीचा. इथेही तेच, केळीवाल्यासारखंच मौनातून संवाद. मला पाहिल्यावर ती सवयीनुसार मान हलवते, पिशवी भरून सगळ्या प्रकारची भरपूर ताजी फुलं त्यात भरते, तुळस, बेल दुर्वा सहित भरलेली पिशवी माझ्या हातात ठेवते. मी पैसे देतो आ.वा.ला.
एव्हाना पिशव्या आणि मन दोन्ही भरून आलेले असतात. पिशव्या वजनाच्या भाराने आणि मन मनसोक्त झालेल्या बाजारहाटाने.
ऑटोचा मोह टाळून पिशव्या डाव्या उजव्या हातात धरत आणि झालेल्या खर्चाची उजळणी करत समाधानाने घरी परततो.
प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.
९७६९०८९४१२
Leave a Reply