महाभारतातील कथांमध्ये भीम बकासूराची कथा लहानपणी वाचली होती. पांडव अज्ञातवासात असताना त्या गावातील लोकांना रोज एक माणूस व गाडा भरुन जेवण त्या बकासूराला द्यावं लागायचं. गावातील प्रत्येक कुटुंबातील एकेक माणूस त्या बकासूरासाठी बळी जाऊ लागला.
गेल्या वर्षीपासून कोरोनाने त्या दुष्ट बकासूरासारखेच थैमान मांडले आहे. देशातील, राष्ट्रातील, शहरातील, गावातील, कुटुंबातील एकेक माणूस कोरोनामुळे हकनाक बळी पडू लागला आहे.
गेले वर्षभर कोरोनाला सहन केलं, नंतर त्याचा प्रभाव कमी झाला. जरा कुठे परिस्थितीत सुधारणा होते आहे असं वाटेपर्यंत पुन्हा त्याने डोकं वर काढलं. सर्व सामान्य जनतेला लाॅकडाऊनच्या ‘काळ्या पाण्या’च्या शिक्षेला सामोरे जावे लागले.
कालच प्रकाश कान्हेरेचा मेसेज आला. ‘कान्हेरे स्टुडिओत २४ वर्षे काम करणारा सहकारी डीके, कोरोनामुळे गेला.’
१९८५ पासून कान्हेरे फोटो स्टुडिओशी आमचा संपर्क सुरु झाला. विजय टाॅकीजच्या कंपाऊंड मधील, विजय टाॅकीजला लागूनच असलेल्या बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर कान्हेरेंचा स्टुडिओ होता. तिघेही भाऊ आम्हाला तिथं भेटायचे. मोठा चायनीज दिसणारा गणेश, देवानंद दिसणारा प्रकाश व धाकटा श्याम. तिघेही आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या स्टुडिओचा वारसा यशस्वीपणे चालवायचे.
या तिघांच्याही मदतीला त्यांनी डीके नावाचा एक तरुण ठेवला होता. तो ब्लॅक अँड व्हाईट रोल डेव्हलपिंग करणे, प्रिंट काढणे, प्रिंट ड्रायरवर सुकविणे अशी सर्व कामे करायचा.
काही वर्षांनंतर गणेशने कोथरूडला स्टुडिओ सुरु केला. श्यामने शंकर महाराज मठाजवळ, सातारा रोडला स्टुडिओ सुरु केला. प्रकाश आणि डीके विजय टाॅकीज कंपाऊंड मधील स्टुडिओत काम करु लागले. प्रकाशने स्टुडिओचं नूतनीकरण केलं. दरम्यान ब्लॅक अँड व्हाईट फोटोंचं युग संपलं, डेव्हलपिंग प्रिंटींग बंद झालं. कलर फोटोंची क्रेझ वाढली.
नाटकांच्या, लावणींच्या फोटोसेशनच्या निमित्ताने आम्ही वारंवार स्टुडिओत जात होतो. आधी कलाकारांच्या मेकअपला दोन तास लागायचे. नंतर फोटोसेशन, तीन चार तास चालायचं. लायटींगला डीकेची मदत असायची. अनेकदा तो थर्माकोलचा शीट हातात धरुन लाईटचा बाऊन्स कलाकारांवर द्यायचा. प्रिंट मिळाल्यावर आम्ही डिझाईन करायचो.
लग्नाच्या सीझनला दोघांचीही धावपळ असायची. काही नवीन काम केलं असेल तर प्रकाश आम्हाला बोलावून घ्यायचा. आम्हा मंडळींच्या गप्पा व्हायच्या. चहा, वडापाव खाणं व्हायचं.
काही वर्षांनंतर प्रकाशने डीकेला स्टुडिओतून काढल्यावर तो कधी एखाद्या समारंभात भेटल्यावर, जवळ येऊन आपुलकीने बोलायचा.
हळूहळू फोटोग्राफीचा व्यवसाय कमी होऊ लागला. कामं कमी झाली. आधीची जागा सोडून प्रकाशने ‘रंगवर्षा’ समोर स्टुडिओ सुरु केला. काही वर्षातच त्याला कळून चुकले की, आता स्टुडिओ चालवणं अवघड आहे. तो स्टुडिओ बंद करुन प्रकाश व यतीन आता घरी राहूनच ऑर्डरची कामं करतात.
गेले वर्षभर कोरोनाने नकोनकोसं केलं. आता पुन्हा या मार्चपासून तीच वेळ आली आहे. कोरोनात, परिचयातील अनेक माणसं गेली. त्यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या भेटीला देखील दोन तीन वर्षे झाली असतील, पुन्हा भेट अशी झालीच नाही. डीकेचं तसंच झालं, तो गेल्याचं समजल्यावर आठवणी दाटून आल्या. तो गेल्यानंतर त्याच्या घरची परिस्थिती कशी झाली असेल? त्याची मुलंही अजून हाताशी आली नसतील.
हा कोरोनाचा बकासूर अजून किती बळी घेणार आहे? याला नामोहरम करणारा भीम, सध्यातरी आपल्यात नाहीये, एवढं मात्र खरं!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१०-४-२१.
Leave a Reply