नवीन लेखन...

बॅलन्सशिट

पाटील साहेब वारल्यानंतर नवव्या दिवशी त्यांचा मुलगा रशियाहुन परतला. दुसऱ्या दिवशी दहावा आणि त्याच्या पुढल्या दिवशी अकरावा. पाटील साहेबांच्या पुतण्याने त्यांच्या मुलाला ते सिरीयस असताना कळवलं होतं. विमानाचे तिकिटं महाग आहेत, दहा दिवसांनी येतो असं त्याने कळवलं. दोन दिवसांनी पाटील साहेब वारल्यानंतर मुलाला कळवले असता, त्याने चुलत भावाकडून अंतिम संस्कार करण्यास सांगितले. पाटील साहेबांची मिसेस ज्यांना संपूर्ण गावात अक्का नावाने बोलले जाई. मुलाच्या निरोपाने अक्का एकदम खचून गेल्या.

पाटील साहेब तहसीलदार कचेरीत क्लार्क म्हणून लागले होते आणि रिटायर्ड होता होता नायब तहसीलदार बनले होते. शेजारच्याच दोन तीन तालुक्याच्या ठिकाणी त्यांची आलटून पालटून बदली होत होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगी वयाच्या बाराव्या वर्षी रस्ता ओलांडताना गाडीखाली येऊन देवाघरी गेली. पाटील साहेबांनी त्यांच्या मुलाला शिकवण्यात कोणतीच कसर ठेवली नाही. तहसीलदार कचेरीत क्लार्क असल्याने थोडी वरकमाई होती पण एवढीही नव्हती की मौज मजा किंवा ऐश आराम करता येत होती. खाऊन पिऊन आणि गावातली वडिलोपार्जित दहा एकर शेती आणि वडिलोपार्जित वाडा जेमतेम सांभाळला जात होता. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी खर्च करताना मागे पुढे बघितले नाही. नोकरीला लागल्यापासून मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बचत करायला सुरुवात केली. सुट्टीमध्ये फिरायला जाणे, पर्यटन, मौज मजा सगळ्यापासून दूर राहिले, अक्कांनी सुद्धा कपडे लत्ते, दाग दागिने यांचा मोह सोडून साधे राहणीमान कबूल केले.

मुलगा इंजिनियर झाला आणि पुढे शिक्षणासाठी अमेरिकेत जायला निघाला, पाटील साहेबांनी पंचवीस वर्षात केलेली लाखो रुपयांची बचत त्याला अमेरिकेत पुढिल शिक्षणासाठी कामी आली. पुढील पाच वर्ष अमेरिकेत शिक्षण आणि नोकरी करून मुलगा परतला. पाटील साहेब नायब तहसीलदार होऊन सहा महिन्यापूर्वी रिटायर झाले होते. रिटायर्ड झाल्यावर जवळपास पस्तीस लाख रुपये त्यांना मिळाले होते. मुलगा फॉरेनला कामाला आणि उच्चशिक्षित म्हणून त्याच्यासाठी खूप मुली सांगून आल्या. पण मुलाने फेसबुकवर एका बंगाली मुलीशी सूत जमवलं होतं.

अक्का आणि पाटील साहेब दुःखी झाले पण बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी लग्नाला होकार दिला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने लग्न उरकले. परंतु मुलाचे आणि त्याच्या बंगाली सुनेचे पंधरा दिवसातच बिनसले, तिने घटस्फोट मागायला सुरुवात केली. मुलाने अमेरिकेत कमावलेले पैसे पोटगीपोटी तडजोड रक्कम म्हणून देण्यासाठी कमी पडू लागले. शेवटी पाटील साहेबांनी पोरगा मोकळा होईल या आशेने त्यांचे रिटायरमेंटचे आलेले सगळे पैसे काढले आणि मुलाला एकदाचा सोडवला.

पाटील साहेब आणि अक्काने पोराला मन मारून शिकवला, पोरगा शिकला पण त्याच्यात आई वडिलांविषयी भावनाच नव्हती, ते त्यांचे कर्तव्यच आहे त्यासाठीच त्यांनी आपल्याला जन्माला घातले अशी त्याची विचारसरणी होती. घटस्फोटित म्हणून त्याचे समाजातल्या एका मुलीशी दुसरे लग्न लावून दिले. दुसऱ्या बायकोने महिनाभरातच वेगळं राहायचंय असा निर्णय सांगून टाकला. त्यातच पाटील साहेबांच्या मुलाला एका रशियन कंपनीची ऑफर आली. मुलगा आणि सून दोघेही म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून रशियात निघून गेले.

सुरवातीला फोनवर ख्याली खुशाली कळवली जायची, सून तर दोघांपैकी कोणाशीच फोनवर बोलायची नाही. एक वर्षाने त्यांना नातू झाला हे सुद्धा त्यांना पुतण्या कडून कळाले. पुतण्याने त्यांच्या मुलाचे फेसबुक वर स्टेटस पाहिले आणि सरळ अक्का कडे पेढे मागायला आला. अक्का नातवंड खेळवण्याची त्यांचे लाड करण्याचे स्वप्न रंगवत असताना, सुनेला दिवस जाऊन नातू होतो याची साधी कल्पना सुद्धा न देणाऱ्या मुलाच्या वागण्याने दुःखी होऊन हुंदके द्यायला लागतात.
पुतण्याला सुद्धा खूप वाईट वाटते. त्याची आई तो दहा वर्षांचा असताना वारल्यानंतर अक्काने त्याला पोटच्या पोरासारखी माया लावली होती. पाटील साहेबांच्या नोकरी मुळे पुतण्याला त्यांना जवळ ठेवता आले नव्हते. पण गावांत आल्यापासून त्यांचा पुतण्याचं दोघांकडे लक्ष देत होता, पाटील साहेबांना पेन्शन मिळत असल्याने पैशाची अडचण नसायची. पाटील साहेबांचा भाऊ वर्षभरापूर्वी वारल्यानंतर त्यांचा पुतण्या एकटाच राहत होता.

अक्का आणि पाटील साहेबांनी पुतण्याचे लग्न लावून दिले आणि त्याला वाड्यातच राहायला बोलावले. लग्नासाठी त्यांच्या मुलाला येणे शक्य नसल्याचे त्याने कळवले. पुतण्याची बायको बारावी शिकलेली होती, तिने पाटील साहेब आणि अक्कांची मनापासून आईवडील असल्याप्रमाणे काळजी घ्यायला सुरुवात केली.

पोटच्या पोराची सून सोडून गेली तरी पुतण्याच्या बायकोने त्यांना पोटच्या पोरीसारखे सांभाळले. तिला दिवस गेल्यावर माहेरी न पाठवता बाळंतपण त्यांच्याच घरी करून घेतले. तिला हवं नको त्याची काळजी घेताना मायेचा आणि ममतेचा वर्षाव केला. पुतण्याचे सासू सासरे तिला माहेरी न्यायला आले असता त्यांना पहिले बाळंतपण मला करू द्या, पुढल्या वेळेला अडवणार नाही असं सांगून कसबसं तयार केले. पोटच्या पोराचे दुःख विसरून पाटील साहेब आणि अक्का त्यांच्या सत्तरीत सुखी आणि समाधानी झाले.

मुलाला शिकविण्यासाठी, मोठा करण्यासाठी हौस मजेचा बळी देऊन तारुण्यात केलेली तडजोड म्हातारपणातल्या सुखाने विसरता येत होती.

एके दिवशी अचानक रशियातून त्यांच्या मुलाचा फोन आला आणि त्याचे बोलणे ऐकून अक्का विचलित झाल्या. क्षणाचाही विचार न करता त्यांनी रिक्षा केली आणि पाटील साहेबांना घेऊन तालुक्याला जाऊन आल्या. पुतण्याला आणि सुनेला त्यांच्या अशा वागण्याचे कोडे पडले.

अकरावा झाल्यावर पुतण्याला आणि त्याच्या बायकोला पडलेले कोडे सुटायची वेळ आली. पाटील साहेबांच्या मुलाने गावातली दहा एकर जमीन आणि वाडा विकून अक्कांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा प्रस्ताव मांडला.
त्यावर पुतण्याने सांगितले अक्कांना कुठेही पाठवले जाणार नाही, आम्ही वाडा सोडून आमच्या घरात एकत्र राहू, जमीन आणि वाडा विकून तू पैसे घेऊन निघून जा.

अक्का काहीच न बोलता जड पावलांनी खोलीत गेल्या आणि हातात झेरॉक्सचे कागद घेऊन बाहेर आल्या. सगळे कागद तोंडातून एकही शब्द न काढता त्यांनी स्वतःच्या मुलाच्या दिशेने भिरकावले.

पाटील साहेबांचे रजिस्टर केलेले मृत्यपत्र ज्यामध्ये वाडा, बँक बॅलन्स आणि जमीन पुतण्याच्या नावावर केलीय हे वाचून मुलगा रागाने लाल पिवळा झाला. पण आमच्या घरातून आताच्या आता चालता हो या अक्कांच्या शब्दांनी सगळेच जण भानावर आले.

बॅलन्सशिट सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या प्रत्येक आईबापांच्या नशिबात असे पुतणे येतातच असे नाही. पुस्तकी ज्ञान आणि शिक्षणासोबत संस्कार आणि आपलेपणाची जाणीव देणेही तितकंच महत्वाचे आहे.

सदरचा लेख काल्पनिक आहे.

© प्रथम रामदास म्हात्रे.

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DME, DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..