नवीन लेखन...

वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे

वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख काम म्हणजे आदिवासी समाजास मुख्य प्रवाहात आणणे. समाजाचा सर्वांगीण विकास साधतानाच त्यांच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांना जपणे. त्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्यातूनच नेतृत्व उभे राहील हे पाहणे. एकूणच आदिवासी समाज आणि अन्य समाज यातील दरी बुजवण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मुख्यतः करत आहे.

वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म दिवस २६ डिसेंबर १९१३ रोजी झाला.

स्वातंत्र्योत्तर काळात जशपूर (सध्या झारखंड राज्याचा भाग) या तत्कालीन मध्य प्रदेश आणि बरार प्रांतातील गावात या संघटनेची स्थापना झाली. अशा प्रकारची संघटना स्थापन करणे आवश्यक का वाटले, त्याची पार्श्वभूमी :

स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५२ सालची एक घटना. तत्कालीन मध्य प्रदेश प्रांताचे मुख्यमंत्री पंडीत रविशंकर शुक्ल यांनी या भागास भेट दिली. अन्य ठिकाणी त्यांचे चांगले स्वागत झाले असले तरी जशपूरनगर येथे मात्र त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. हा प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येचा प्रदेश होता आणि ख्रिश्चन मिशनरी या सर्व प्रकारामागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी भागात काम करणाऱ्या ठक्कर बाप्पा यांच्याकडे सल्ला मागितला. त्यांनी या भागात भारतीय लोकांची संस्था असावी, असे सांगितले.

त्यानुसार ‘पिछडा वर्ग समाज कल्याण विभाग’ १९४८ साली स्थापन करण्यात आला. ठक्कर बाप्प्पा यांनी आपले विश्वासू सहकारी पांडुरंग गोविंद वणीकर यांना या कामाची जबाबदारी दिली. जशपूर येथे काम सुरू करणे हे अवघड आहे, याची वणीकर यांना जाणीव होती. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि नागपूर येथील रामटेक या ठिकाणी वकिली व्यवसाय करणाऱ्या रमाकांत केशव देशपांडे यांना जशपूर येथील कामाची जबाबदारी दिली. त्यानुसार देशपांडे जशपूर येथे आले आणि प्रवासाला सुरुवात केली. शासनाने सुरुवातीला आठ शाळा, जनजागृती आणि अन्य कार्य यासाठी आवश्यक असे अंदाजपत्रक संमत केले होते, मात्र देशपांडे यांनी अत्यंत आग्रहाने तब्बल १०० शाळांसाठी तरतूद करून घेतली. अवघ्या वर्षभरात त्यांनी १०० शाळांचे आपले उद्दिष्ट पूर्ण करून दाखवले. याचा दृश्य परिणामही लगेच समोर यायला लागला. ज्या भागातील लोक भारताला आपला देशच मानत नव्हते त्या भागात आता ‘भारत माता की जय’ या घोषणा ऐकू यायला लागल्या. आदिवासी समाजास पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची सुरुवात देशपांडे यांनी यशस्वीपणे केली होती.

जानेवारी १९५१ मध्ये ठक्कर बाप्पा यांचे निधन झाले. दरम्यानच्या काळात कामाची व्याप्तीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. शासकीय चौकटीत राहून काम करणे अवघड बनत चालले होते. त्यामुळे आता स्वतंत्र अशी संस्था बनवण्याचे विचार देशपांडे यांच्या मनात होतेच. दरम्यान एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख करणे आवश्यक आहे. संविधान लागू झाल्यानंतर १९५२ साली निवडणुकांची घोषणा झाली. प्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना कदाचित देशपांडे यांची अडचण वाटली असावी, त्यामुळे देशपांडे यांची चौकशी करण्याच्या नावाखाली त्यांना चंद्रपूर येथे स्थानबद्ध केले आणि निवडणुकीपासून दूर ठेवले. निवडणुकीनंतर देशपांडे यांनी आपल्या सरकारी पदाचा राजीनामा दिला आणि जशपूर येथे वकिली व्यवसायाला प्रारंभ केला.

जशपूर येथे पुन्हा येण्यापूर्वी देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर) यांच्याची विचारविनिमय केला. त्यांनीही एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याविषयी सांगितले आणि देशपांडे यांच्या मदतीसाठी संघाचे प्रचारक मोरेश्वर केतकर यांना पाठवले. सुरूवातीला वसतीगृहाची स्थापना करून कामाला सुरूवात करण्याचे ठरले त्यानुसार जशपुर येथील राजा विजयभुषण सिंह जुदेव यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी आपल्या वापरात नसलेल्या राजमहालाच्या काही खोल्या लगेचच वापरायला दिल्या आणि २६ डिसेंबर १९५२ रोजी वसतीगृहाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १९५३ साली राजा जुदेव यांनी संस्थेचे औपचारिक नाव असावे असे सुचवले आणि त्यांच्या सांगण्यानुसार ‘कल्याण आश्रम’ हे नाव निश्चित झाले. अशा प्रकारे १९५२ सालात या संस्थेची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सांगण्यावरून १९७७ साली ‘कल्याण आश्रम’ या संस्थेस अखिल भारतीय स्वरूप देण्याचे ठरले आणि ‘अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या नावाने संस्थेची नोंदणी करण्यात आली.

या सर्व प्रवासात जशपूरचे राजा विजयभूषण सिंह जुदेव यांनी सर्वांत मोठे सहकार्य केले. संस्था स्थापनेची प्रेरणा, आर्थिक मदत, जागेची मदत अशा सर्व अडचणी त्यांनी सोडवल्या. या संस्थेच्या वाटचालीमध्ये यांचा वाटा फार मोठा आहे.

वनवासी कल्याण आश्रमाची वाटचाल प्रेरणादायक असली तरी वनवासी क्षेत्रात अद्यापही समस्यांचा डोंगर उभा आहे. पूर्वीची आव्हाने तर आहेतच, पण त्यात काळानुरूप नव्याने भर पडत आहे. या साऱ्या समस्यांचा सामना करून वनवासी समाजाला अधिक शक्तिशाली बनवण्याचे कार्य आपण सर्वाना मिळून पूर्ण करायचे आहे. आतापर्यंतची वाटचाल हजारो हातांच्या बळावर शक्य झाली पण या क्षेत्रातील समस्या पाहता आता लाखो हातांची आवश्यकता भासणार आहे. या कार्यात आपण तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे वनवासी कल्याण आश्रमाचे आवाहन आहे.

बाळासाहेब देशपांडे यांचा मृत्यू दि २१ एप्रिल १९९५ रोजी झाला.

— अनिल सांबरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..