गेली काही दिवस बाळासाहेब ठाकरे मृत्यूशी झुंज देत होते. अनेक दिग्गज राजकिय विरोधकांना शमवणारे बाळासाहेब यांच्यापुढे मृत्यूचेही काही चालेना. मृत्यू गयावया करू लागला तेव्हा बाळासाहेबांना मृत्यूची दया आली आणि दिनांक १७ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनीटांनी बाळासाहेब ठाकरे यांनी मृत्यूस स्वतःला अर्पण केले आणि अवघा महाराष्ट्र पोरका झाला. गेली चार पाच दशके लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हिंदुह्रदयसम्राट आपल्याला सोडून गेला. नेहमी कठोर ह्रदयाने तीव्र आंदोलन करणारे शिवसैनिक शोकाकूल होऊन अश्रूधारा वाहताना दिसले. अवघा महाराष्ट्र अश्रूमय झाला. आता मराठी माणसाला वाली कोण? आता हिंदुंना आधार कोण देणार? आता शिवसैनिकांचे कसे होणार? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात सैरावैरा धावत आहेत. बाळासाहेब वयोवृद्ध झाले होते तरीही शिवसैनिकांना त्यांचा आधार होता. सुर्याच्या नुसत्या असण्यामुळेच प्रकाश मिळतो, उष्णता जाणवते, जीवन मिळते. परंतु आता तर सुर्यच विझला. ज्यांचे अस्तित्व सुर्यावर अवलंबून होते त्यांनी काय करावे? मला वाटते प्रत्येक शिवसैनिकाने त्याच्या ह्रदयात मंदपणे तेवणारी बाळासाहेब नावाची ज्योत प्रज्वलीत करावी आणि बाळासाहेबांच्या विचारांनी व त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करावं.
एक सर्वसाधारण पत्रकार आणि व्यंगचित्रकार आपल्या माणसांवर होणार्या अन्यायाविरोधात खळवळून उठतो आणि पाहता पाहता लोकनेता होतो हा चमत्कारच म्हणावा. “फ़्री प्रेस जर्नल” या लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्राविरोधात बंड करुन बाळासाहेबांनी १९६० मध्ये “मार्मिक” हे मराठीतील पहिलंवहिलं व्यंगचित्र साप्ताहिक काढले. त्यामुळे दक्षिण भारतियांकडून मराठी भाषिकांना कसे दाबले जात आहे, याची जाण मराठी भाषिकांना झाली. मराठी माणसांच्या प्रश्नांना मार्मिकमध्ये मनाचं स्थान मिळू लागले. पूढे मराठी माणसे मार्मिककडेच दाद मागू लागले. “उठाओ लूंगी बजाओ पूंगी” अशी मिश्कील घोषणा देत सहस्रो लक्षो मराठी लोक रस्त्यावर उतरले. यातून एक चळवळ निर्माण झाली. दक्षिण भारतियांविरोधात चळवळीतून आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी शिवसेनेचा जन्म झाला. १९६६ च्या विजयादशमीला शिवसेनेची पहिली जाहीर सभा म्हणजेच दसरा मेळावा झाला. तेव्हा बाळासाहेबांनी जमावाला आपल्या प्रखर वाणीने मंत्रमुग्ध केले. “राजकारण हे गजकरण आहे, म्हणून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हाच शिवसेनेचा अजेंडा राहिल” असे बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले. परंतु काळाच्या ओघात त्यांनी राजकारणालाच महत्व दिले. १९६७ मध्ये शिवसेनेने ठाणे महापालिकेच्या निवडणूका लढवल्या आणि १९६८ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूका लढवल्या. १९७० मध्ये हेमचंद्र गुप्ते महापौर झाले व १९७३ मध्ये सुधीर जोशी. पाहता पाहता शिवसेनेच्या पदरी यश येत गेलं. आधी महापालिका व १९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. तेव्हा बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर ते सहज मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण मंत्रालयात बसून फायली चाळत बसणे हे बाळासाहेबांच्या रक्तातंच नव्हते. त्यांना मुख्यमंत्रीच्या खूर्चीपेक्षा शिवसेनाप्रमुख या सिंहासनावर विराजमान होणे अधिक प्रिय वाटले आणि शेवटपर्यंत त्यांनी ते कायम ठेवले.
एक धुरंदर राजकारणी, उत्तम व्यंगचित्रकार आणि हळवा माणूस म्हणून शिवसैनिकांना ओळखले जाते. शिवसेनाप्रमुख नेहमी वादाच्या भोवर्यात असत. त्यांच्या रोखठोक आणि मिश्कील भाषाशैलीमुळे ते विरोधकांना पळता भूई करत. अनेक लोकांशी राजकीय वाद असूनही त्यांचे सगळ्यांशी वैयक्तिक संबंध पौष्टीक होते. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच राजकारण केले परंतु देशाच्या कुठल्याही प्रश्नांवर बाळासाहेबांची प्रतिक्रिया काय असेल? याची उत्सूकता प्रत्येकालाच असायची. भारत-पाक या विषयावरही ते जहालपणे बोलायचे. भारतीय सैनिकांनी सिंधू नदी मुक्त करावी अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती. ज्या शिवतीर्थावरून त्यांची राजकीय खेळी सुरू झाली त्याच शिवतीर्थावर बाळासाहेबांवर अंतिम संस्कार करण्यात आले. हा अतिशय सुंदर योग होता. आतापासून बाळासाहेब असे म्हणाले, बाळासाहेब तसे म्हणाले हे आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळणार नाही. किती दुर्दैव आहे हे? आतापासून बाळासाहेबांच्या ठाकरी वाणीने शिवतीर्थ दुमदुमणार नाही. किती दुःखास्पद आहे हे? “सगळे जग जरी आमच्या विरोधात गेले तरी एकटा मराठी माणूस सिंधू नदिला मुक्त करेल.” असे सावरकर म्हणाले होते. त्याच वाटेने बाळासाहेब चालत होते. आधी मराठी माणसाचे संघटन केले व त्यांच्या हाती हिंदुत्वाचे खडगं दिले. ज्या दिवशी हिंदुत्वाचे खडगं घेऊन प्रत्येक तरुण शिवसैनिक राष्ट्ररक्षणासाठी सज्ज होईल, त्या दिवशी बाळासाहेबांना खर्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल. गेली चाळीस पन्नास वर्षे महाराष्ट्रभर बाळासाहेब नावाचं वादळ घोंघावत होतं, ते आता शांत झालंय. परंतु त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रातून आणि दिलेल्या भाषणांतून त्यांचे विचार नवीन पीढीपर्यंत पोहोचतील. पाच दशकं लोकांच्या ह्रदयावर एकछत्री राज्य करणार्या हिंदुह्रदयसम्राट कै. बाळासाहेब केशव ठाकरे यांना मानाचा मुजरा.
जय हिंद, जय महाराष्ट्र……
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply