काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचण्यात आली होती. अवघ्या आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर चौघा नराधमांनी बलात्कार करून हत्या केली आणि तिचा मृतदेह नाल्यात फेकला. या घटनेकडे फक्त एक बातमी म्हणून पाहत कित्येकजण विसरूनही गेले असतील कारण या अशा बातम्या हल्ली आपल्याला वारंवार वाचण्यात येतात आणि वाचनात येते ती बलात्काऱ्यांना फाशी द्या ही मागणी ! पण मला कधी कधी प्रश्न पडतो की बलात्काऱ्यांना फाशी देऊन हा प्रश्न खरोखरच सुटणार आहे का ? कारण यापूर्वी कित्येक बालात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊनही देशात वाढत्या बलात्काराचं प्रमाण कमी झालेले नाही. उलट दिवसेन दिवस ते अधिक वाढत तर आहेच उलट ते अधिक भयंकर आणि क्रूरतेच्या स्वरूपात समोर होत आहे. बहुसंख्य बलात्कार करणारे व्यसनी असतात. त्यात बहुतांश दारू प्यायलेले असतात. त्यामुळे दारूवर बंदी घालावी असा विचार का पुढे येत नाही. हल्लीच्या स्त्रियांचा पोषाख त्यांच्यावरील बलात्कारास कारणीभूत आहे असे म्हणावे तर त्या आठ वर्षाच्या मुलीने असा कोणता पोषाख परिधान केला होता ? हा प्रश्न निर्माण होतो. आणि कोणा पुरुषाने तिच्याकडे आकर्षित व्हावे असे त्या आठ वर्षाच्या मुलीत काय होते ? म्हणजे ती एक स्त्री आहे इतकं कारण बलात्कार करण्यास पुरेसं असतं .
आपल्या देशातील घडलेल्या मागील काही वर्षातील बलात्काराच्या घटना पहिल्या तर आपल्या देशातील कोणत्याही वयाची स्त्री या बलात्कारी नराधमांपासून सुरक्षित नाही. मग ती स्त्री गरीब – श्रीमंत , सुशिक्षित – अशिक्षित आणि कोणत्याही जाती धर्मातील का असेना ? त्यामुळे गरज आहे ती समाजाने बालात्काऱ्याकडे फक्त एक बलात्कारी म्हणून पाहायला हवे ! बलात्कारी हा फक्त बलात्कारी असतो , खरं तर तो माणूस काय प्राणीही बोलावून घेण्याच्या लायक नसतो. त्याला फाशी देऊन मारण्यात काही अर्थ नसतो कारण जेव्हा त्याच्या मनात आठ वर्षाच्या निरागस मुलीवर बलात्कार करण्याचा विचार येतो तेव्हांच तो माणूस म्हणून खरं मेलेला असतो. या नराधमांमुळे आज पुरुष जात बदनाम होत आहे. यांच्यामुळेच आज प्रत्येक पुरुषाकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टिकोनच बदलला आहे. त्यामुळे या बलात्काऱ्यांना वेसण घालण्याची जबाबदारी परुषांवर जास्त आहे.
एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचे आकर्षण वाटणे वेगळे आणि ते ओरबाडून घेणे वेगळे हे प्रत्येक सुज्ञ पुरुषाने लक्षात घ्यायला हवे ! भारतातील बहुसंख्य तरुण दारूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडलेले आहेत असे निरीक्षणावरून कळते. मग ! वयात आलेल्या आपल्या मुलांनाच नव्हे तर मुलींनाही या अशा व्यसनापासून दूर ठेवणे हि त्यांच्या पालकांची जबाबदारी नाही का ? शिक्षक हल्ली विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करत नाहीत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. त्यात त्यांचा दोष नाही सध्याची जी शैक्षणिक व्यवस्था आहे तिच त्याला कारणीभूत आहे. प्रसारमाध्यमांमुळे बलात्कार वाढले आहेत यातही काही तथ्य नाही. बलात्कार हा एका विकृत विचार सरणीतून जन्माला येतो. तो विचारानेच बलात्कारी असतो, त्यांच्या या विचारांनाच ठेचण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. एखाद्याने बलात्कार करणाऱ्याला अथवा तो करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला कोणी जीवे मारले तर त्याचे समर्थनच करावे लागेल. असे दुर्दैवाने म्हणावे लागते. प्रत्येक स्त्रिला सुरक्षा देणे हे आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा करणे ही आपली म्हणजे पुरुषांची जबाबदारी आहे. कारण हे बलात्कारी पुरुष आपल्यातच बेमालूमपणे वावरत असतात. त्यांना शोधण्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास आता आपली नजर सराईत व्हायला हवी ! नाही का ?
लेखक – निलेश बामणे
Leave a Reply