बालभारती हा ज्ञानाचा वैभवशाली वारसा आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे, जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात. अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात.दरवर्षी अंदाजे 19 कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही खडतर आणि विलक्षण प्रक्रिया आहे. प्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहून अधिक शाळांमधील शिक्षक, कोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारती जोडली गेली आहे.
बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. शालेय शिक्षण मंत्री आणि बालभारतीचे अध्यक्ष श्री. विनोद तावडे यांनी तत्काळ या प्रस्तावास मंजुरी दिली व सोबतच एका माहितीपटाची देखील निर्मिती करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती स्थापन करण्यात आली. समितीत बालभारतीमधील अधिकाऱ्यांसोबतच ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे, जाहिरात तज्ज्ञ श्री. मिलिंद लेले, अभिनेते राहुल सोलापूरकर, फोटोग्राफी तज्ज्ञ आशिष केसकर यांचा समावेश होता. बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर अध्यक्ष असलेल्या या समितीच्या सदस्य सचिव पदाची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली. हे काम त्रयस्थपणे आणि व्यायवसायिक रीतीने होण्यासाठी डाॅक्युमेंटेशन क्षेत्रातील अनुभवी संस्था असलेल्या इमेज मीडियाकडे हे काम सोपवण्यात आले. डाॅक्युमेंटेशनचा हा प्रकल्प सहा महिने सुरू होता. या काॅफीटेबल बुकचं व फिल्मचं प्रकाशन नुकतंच शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते नाशिकला झालं.
जवळपास पन्नास व्यक्तींच्या मुलाखती, ग्रंथालय-अन्य स्रोतांकडील जुने संदर्भ आणि साहित्याचा अभ्यास, छायाचित्रांचा शोध-संकलन-निवड, पुस्तकाचं लेखन-अनुवाद, डिझाईन अशा टप्प्यांतून तयार ‘बालभारती-ज्ञानभारती’ हे काॅफीटेबल बुक आणि ‘बालभारती-इयत्ता पन्नास’ ही फिल्म तयार झाली. छपाई , बांधणी आणि एकूण निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत दर्जेदार असे हे पुस्तक झाले आहे. इमेज मीडियाच्या टीमने या प्रकल्पासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. गुणवत्तापूर्ण व निर्दोष निर्मितीसाठी नवनीत देशपांडे, दीनदयाळ वैद्य, मिलिंद वाडेकर, विवेक राजूरकर, शर्वरी जोशी, श्रीकांत सूर्यवंशी ही मंडळी सहा महिने सतत कार्यरत होती. `बालभारती – इयत्ता पन्नास` या डॉक्युड्रामा स्वरूपातील चित्रपटाचे दिग्दर्शन भाई डोळे यांनी केले असून माधव अभ्यंकर, संज्योत हर्डीकर आणि कवी संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे यांनी भूमिका केल्या आहेत.कॉफी टेबल बुक व फिल्म मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत आहे.
राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
— किरण केंद्रे
कार्यकारी संपादक ( किशोर)
बालभारती, पुणे
सर एक विनंती आहे की बालभारती स्थापन होण्यापूर्वी खाजगी प्रकाशकांची मंगल वाचन, अरुण वाचन, सुभाष वाचन, नवयुग वाचनमाला, नवीन वाचन इ. पाठ्यपुस्तक तसेच सरकारी मराठी वाचनमाला ही पुस्तके आपल्या ग्रंथालयात आहेत ती देखील डीजिटालाईज करुन वाचकांना आॅनलाईन उपलब्ध करुन दिली तर एक मोठे दालन खुले होईल. कृपया विचार व्हावा ही विनंती