नवीन लेखन...

बालगंधर्व

Balgandharva - The Movie by Nitin Chandrakant Desai

मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट! या चित्रपटाच्या निमित्ताने झडणार्‍या चर्चा, आक्षेप आणि गदारोळ. चर्चा करणारी माणसंही सर्व थरातील- सिने-नाट्यसमीक्षक, संगीतज्ञ, अभिजन व सामान्य रसिक अशी. पण ह्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचताना तीव्रतेने आठवते ती ‘हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट!’ यात कोणाचा अधिक्षेप करायचा नाही तर एक दृष्टांत द्यायचा आहे. ज्याला जो अवयव हाती लागला तो त्याचा हत्ती! याचा व्यत्यास म्हणजे जे हाती लागले नाही तो हत्ती नाही. पण या सर्व चर्चेत कोणी डोळस कसा सापडत नाही? एकविसाव्या शतकात सादर होणारा जागतिक स्तरावर जाऊन पोहोचायचा प्रयत्न करणारा हा चित्रपट आहे का याचा विचार का होत नाही?

“बालगंधर्व” हे विसाव्या शतकाच्या प्रारंभकालातील एक मोठे व्यक्तिमत्व होते. मराठी रंगभूमीला पारशी रंगभूमीच्या भडक पगड्यातून काढून नवे भान, नवी रंगदृष्टी आणून देणारे कलावंत, काहिसा भाबडा परंतु रंगभूमीशी मोठ्या प्रमाणात प्रामाणिक राहणारा रंगकर्मी, आधुनिक भारतातील पहिला ट्रेण्ड सेटर, दोन पिढ्यांतील तरुणाईचा यूथ आयकॉन, समाजातील सर्व थरांना आपल्या कलाकृतींनी खेचून आणणारा गायक-अभिनेता, भारतीय संगीत रंगभूमीलाच नव्हे तर जागतिक संगीत रंगभूमीला एक नवीन जीवनदृष्टी देणारा एक संगीतज्ञ अशी बालगंधर्वांची ओळख होती. भव्यता, उदारता, प्रमाणिकपणा आणि मानवता ही मूल्ये जपणारं ते एक लिजंडरी व्यक्तिमत्व होतं. हे बहुपैलू व्यक्तिमत्व ह्या चित्रपटात अवतरले आहे की नाही, हे पाहणे सर्वात महत्वाचे आहे. आणि हे सारं काही आपल्याला “बालगंधर्व” या चित्रपटात दिसतं हे त्याचं उत्तर आहे.

नजिकच्या इतिहासात घडून गेलेल्या व्यक्तिमत्वावरील चित्रपट काढणं हे एक आव्हान असतं. सिनेमा हा कलाप्रकार फार अवघड आणि दिग्दर्शक, निर्माता, कलावंत, संगीतकार, कलादिग्दर्शक, छायाचित्रणकार, प्रकाशयोजनाकार अशा अनेकांच्या संयुक्त प्रयत्नांतून तो साकारला जातो. आपल्याला नुकत्याच घडून गेलेल्या इतिहासातील कोणत्या गोष्टी दाखवायच्या आहेत, प्रोजेक्ट करायच्या आहेत याविषयी या सार्‍यांचे दृष्टिकोन असतात. उदा. ‘गांधी’ या चित्रपटात रिचर्ड अॅटनबरोंना गांधी कसे दाखवायचे आहेत, बेन किंग्जले यांना ते कसे सादर करायचे आहेत त्याच पद्धतीने ते साकारले गेले. त्या चित्रपटात गांधींचा मुलगा हरीभाई कोठेही येत नाही. मग हा चित्रपट अधुरा आहे का? या सर्वांनी जे कलात्मक स्वातंत्र्य घ्यायला हवे त्याविषयी बाकींच्यांचा प्रश्न येतो कोठे? “बालगंधर्व” हा चित्रपट उत्तम स्मरणरंजन करणारा चित्रपट आहे यात वाद नाही.

या चित्रपटाचा हेतू काय? यथातथ्य “बालगंधर्व” दाखवणे आहे का? तर नाही. हे एवढे भव्य व्यक्तिमत्व दोन तास सतरा मिनिटांच्या चित्रपटात कसे बांधता येणार? (समीक्षकांनी या चित्रपटाची लांबी किती आहे हेही धड पाहिलेले नाही. कोणी या चित्रपटाला तीन तासाचा म्हणतो तर कोणी अडीच तासांचा) गंधर्वांवर अनेक विशेषांक निघाले, तरीही गंधर्व कांकणभर अधिक उरतात. हे अपुरेपण त्या विशेषांकांचं नाही तर, बालगंधर्वांच्या चौकटीत न सापडणार्‍या व्यक्तिमत्वाचं ते भव्यपण आहे. मग, आपण संपूर्ण “बालगंधर्व” या चित्रपटातून दिसावेत असा आग्रह का धरायचा?

या चित्रपटाला बंदिस्त अवकाश आहे असा एक आक्षेप आहे. नाटक ही रंगभूमीच्या मर्यादेत रंगणारी कला आहे. मग रंगभूमीवरील या कलेच्या सम्राटाच्या जगण्याचा पट उभारताना हा अवकाश बंदिस्तच राहील ना! जिथे जिथे संधी मिळते तिथे तिथे हा चित्रपट तो अवकाश भेदून जातो. अशा वेळी ती प्रत्येक फ्रेम भव्य होत जाते. दर्ग्यावरच्या कव्वालीत ती भव्यता आढळते. काहींना एक प्रश्न पडतो, की येथे सुफी कव्वाली का आली? संगीततकाराचं स्वातंत्र्य मानायचं की नाही? बालगंधर्वांना जी जी गाणी दिली गेली ती त्यांनी गायली होती. कधी ठुमरी (नाही मी बोलत नाथा), कधी गझल (कशी या त्यजू पदाला), कधी लावणी (वद जाऊ कुणाला शरण) त्यांनी गायली. मग त्यांच्यावरील चित्रपटात उत्कट दु:ख साकारायच्या वेळी कव्वाली आली तर कुठं बिघडलं? ‘परवरदिगार’चा तो प्रसंग अक्षरश: अंगावर येतो. गंधर्व ती कव्वाली गात नाहीत तर ती पार्श्वभूमीवर येते. इथं एक गोष्ट नमूद करायला हवी; ती म्हणजे गोहरबाईंना ते ‘गोहरबाबा’ म्हणत तर गोहरबाई त्यांना ‘परवरदिगार’ म्हणत. हा संदर्भ मनात आणला तर कव्वालीचा काही वेगळा आशय समजून येईल. या चित्रपटाच्या शेवटी नांदी का येते? हा एक मुद्दा समीक्षक मांडतात. सामान्य रसिकाला एक गोष्ट जाणवते, की “बालगंधर्व” संपत नाहीत कधी. त्यांनी त्यांच्या उत्तरा्युष्यात पुन्हा नव्याने जगण्यास सुरुवात केली, त्याचं हे सूचन आहे असं वाटत राहते. ही नांदी शेवटी गदिमा लिखित ‘असा बालगंधर्व आता न होणे’, या कवितेत विलीन होते, तेव्हा तो कल्पकतेचा परमावधी गाठला जातो, हे समीक्षक कसे विसरतात?

येथे आणखी एका आक्षेपाचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे या चित्रपटाची श्रेयनामावली शेवटी का येते? चित्रपटाच्या प्रारंभी ‘नितीन चंद्रकांत देसाईकृत बालगंधर्व’ असं का येतं? तो चित्रपटाचा नव्हे तर प्रॅाडक्शन हाऊसचा ब्लॉक आहे. तो देसाईंच्या सर्वच निर्मितींमध्ये आपणांस आढळतो. त्यात आक्षेपार्ह काही नाही. कारण चित्रपट बालगंधर्वांवर आहे, बाकी सर्व गोष्टी त्यांच्यापुढे दुय्यम ठरतात. त्यामुळे श्रेयनामावली शेवटीच यायला हवी असा निर्मात्याचा आग्रह असेल तर तो चुकीचा नसावा. मौजेची गोष्ट ही की हिंदी, इंग्रजी चित्रपटांची श्रेयनामावली सुरू झाली की निघून जाणारा रसिक प्रेक्षक, या चित्रपटाच्या शेवटी ही श्रेयनामावली संपेपर्यंत चित्रपटगृहात थांबून राहतो, याचं कारण तो भारून गेलेला असतो. हा रसिक सर्व वयोगटांचा असतो. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, उत्सुक प्रौढ, स्मरणरंजनात रंगून गेलेले वृद्ध. आज तरुणांच्या आयपॉडमध्ये “बालगंधर्व” चित्रपटाची गाणी, मराठी नाट्यसंगीत आलं, पुस्तकांच्या दुकानातली गंधर्वचरित्रे संपू लागली, फेसबुकवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला, पुन्हा एकदा मराठी मन शंभर वर्षांनी गंधर्ववेडानं नादावलं! एवढं सारं “बालगंधर्व” चित्रपटानं घडवलं, मराठी सिनेमा तंत्र, दिग्दर्शन, कथा, अभिनय, निर्मिती, संगीत, कला या सार्‍्या दृष्टिकोनांतून जागतिक स्तरावर पोचला. (फ्रांसमध्ये नितीन देसाईंना घेऊन जाणार्‍्या टॅक्सीवाल्याने “बालगंधर्व” चित्रपटाची ऑडिओ सीडी मागून घेतली ही गोष्ट लक्ष्यात घेतली पाहिजे). आता जर कोणाला काही आक्षेप घ्यायचे तर घेवोत बापडे. हे आक्षेप घेत बसणं हे समीक्षेचं नाही तर कोत्या मनाचं लक्षण आहे. अर्थात नव्या गोष्टी घडताना खडखडाट होतोच. खुद्द् बालगंधर्वांना हे सोसावं लागलं होतं, तर त्यांच्यावरच्या चित्रपटाला आणि त याच्या निर्मात्यांना- नितीन देसाईंना सोसावं लागलं तर बिघडलं कुठं? धन्यवाद नितीन देसाई, एका छान कलाकृतीबद्दल!!

– प्रा. नीतिन आरेकर, कर्जत

 

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..