भक्तजना दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥१॥
आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरी हरि ॠणी ॥२॥
रुसलिया त्यांचे करी समाधान । करविता आपण क्रिया करी ॥३॥
क्रिया करी तुम्हा न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥४॥
गोपिकांसी म्हणे वैकुंठीचा पति । तुम्ही माझ्या चित्ती सर्वभावे ॥५॥
भाव जैसा तुम्ही माझ्या ठायी धरा । तैसा चि मी खरा तुम्हा लागी ॥६॥
तुम्हा कळो द्या माझा साच भाव । तुमचा चि जीव तुम्हा ग्वाही ॥७॥
ग्वाही तुम्हा आम्हा असे नारायण। आपलीच आण वाहतसे ॥८॥
सत्य बोले देव भक्तिभाव जैसा। अनुभवे रसा आणूनिया ॥९॥
त्यांसी बुझावितो वेगळाल्या भावे । एकीचे हे ठावे नाही एकी ॥१०॥
एक क्रिया नाही अवघियांचा भाव । पृथक हा देव देतो तैसे ॥११॥
तैसे कळो नेदी जो मी कोठे नाही । अवघियांचे ठायी जैसा तैसा ॥१२॥
जैसा मनोरथ जये चित्ती काम । तैसा मेघश्याम पुरवितो ॥१३॥
पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥१४॥
गोकुळींच्या लोका लावियेला छंद । बैसला गोविंद त्यांचे चित्ती॥१५॥
चित्तें चोरूनियां घेतली सकळा । आवडी गोपाळांवरी तया ॥१६॥
तयासी आवडे वैकुंठनायक । गेली सकळिक विसरोनि ॥१७॥
निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाही या देहाची शुध्दि कोणा ॥१८॥
कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव म्हणुनि तया चुंबन देती ॥१९॥
देती टाकुनियां भ्रतारांसी घरी । लाज ते अंतरी आथीच ना ॥२०॥
नाही कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका म्हणे वाचा काया मने ॥२१॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply