जगाचा हा बाप दाखविलें मायें । माती खातां जाय मारावया ॥१॥
मारावया तिनें उगारिली काठी । भुवने त्या पोटी चौदा देखे ॥२॥
देखे भयानक झाकियेले डोळे । मागुता तो खेळे तिये पुढे ॥३॥
पुढे रिघोनिया घाली गळा कव । कळो नेदी माव मायावंता ॥४॥
मायावंत हरिरूप काय जाणे । माझे माझे म्हणे देवा बाळ ॥५॥
बाळपणी रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥६॥
गळा बांधुनिया उखळासी दावे । उन्मळी त्या भावे विमळार्जुन ॥७॥
न कळे जुनाट जगाचा जीवन । घातले मोहन गौळियांसी ॥८॥
सिंकी उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥९॥
तरी दूध डेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥१०॥
दुणी जाले त्याचा मानिती संतोष । दुभत्याची आस धरूनिया ॥११॥
आशाबध्दा देव असोनि जवळी । नेणती ते काळी स्वार्थामुळे ॥१२॥
मुळ यांचा देव न कळे तयांसी । चित्त आशापाशी गोवियेले ॥१३॥
लेकरू आमचे म्हणे दसवंती । नंदाचिये चित्ती तोचि भाव ॥१४॥
भाव दावावया चरित्र दाखवी। घुसळिता रवी डेरियात ॥१५॥
डेरियात लोणी खादले रिघोनि । पाहे तो गौळणी हाती लागे ॥१६॥
हाती धरूनिया काढिला बाहेरी। देखोनिया करी चोज त्यासी ॥१७॥
सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियात ॥१८॥
यासी पुत्रलोभे न कळे हा भाव । कळो नेदी माव देव त्यांसी ॥१९॥
त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देव आपणास कळो नेदी ॥२०॥
नेदी राहो भाव लोभिकांचे चित्ती। जाणता चि होती अंधळी ती ॥२१॥
अंधळी ती तुका म्हणे संवसारी । जिही नाही हरि ओळखिला ॥२२॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply