नेणतीयांसाठीं नेणता लहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥१॥
माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तया वरी ॥२॥
तया वरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥
घेउनिया एके ठायी अवतार । एकी केला थोर वाढवूनि ॥४॥
उणा पुरा यासी नाही कोणी ठाव । सारिखाचि देव अवघियांसी ॥५॥
यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥
वाढला तो सेवाभक्तिचिया गुणे । उपचार मिष्टान्ने करूनिया ॥७॥
करोनिया सायास मेळविले धन । ते ही कृष्णार्पण केले तीही ॥८॥
कृष्णासी सकळ गाई घोडे म्हैसी । समर्पिल्या दासी जीवे भाव ॥९॥
जीवे भावे त्याची करितील सेवा । न विसंबती नावा क्षणभरी ॥१०॥
क्षणभरी होता वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥
त्यांचे ध्यानी मनी सर्वभावे हरि । देह काम करी चित्त त्यापे ॥१२॥
त्याचेचि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाही कृष्ण ॥१३॥
कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटो कृष्णा ॥१४॥
कृष्ण गाता ओव्या दळणी कांडणी । कृष्ण हा भोजनी पाचारिती ॥१५॥
कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी । कृष्ण देखे स्वप्नी कृष्णरूप ॥१६॥
कृष्ण त्यांस दिसे आभास दुश्चिता । धन्य मातापिता तुका म्हणे ॥१७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply