तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासी खेळतां दिवस गमे ॥१॥
दिवस राती काही नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
याच्या मुखें नये डोळीयांसी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥३॥
तटस्थ राहिले सकळ शरीर । इंद्रिये व्यापार विसरली ॥४॥
विसरल्या तान भुक घर दार । नाही हा विचार असों कोठें ॥५॥
कोठे असो कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥
विसरल्या आम्ही कोणीये जातीच्या । वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥७॥
एक जाल्या तेव्हा कृष्णाचिया सुखे । निःशंक भातुकें खेळतील ॥८॥
खेळती भातुके कृष्णाच्या सहित । नाही आशंकित चित्त त्यांचे ॥९॥
चित्ती तो गोविंद लटिके दळण । करिती हे जन करी तैसे ॥१०॥
जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनिया ॥११॥
करूनीं आपला वघा गोविंद । जना साच छंद लटिका त्या ॥१२॥
त्यांनी केला हरि सासुरे माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥१३॥
भावना राहिली एकाचियां ठायी । तुका म्हणे पायी गोविंदाचे ॥१४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply