पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ||१||
काय ऐसें पाप होते आम्हांपासी । बोलती एकासी एक एका ||२||
एकांचिये डोळा आसूं बाह्यात्कारी । नाहि ती अंतरी जळतील ||३||
जळतील एके अंतर्बाह्यात्कारे । टाकिलीं लेकुरे कडियेहुनि ||४||
निवांतचि एके राहिली निश्चिंत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ||५||
त्यांचे जीवावरी आले त्या सकळा । एका त्या गोपाळा वांचुनिया ||६||
वांचणें तें आता खोटे संवसारी । नव्हे भेटी जरी हरिसवे ||७||
सवे घेउनिया चाललीं गोपाळा । अवघीच बाळा नर नारी ||८||
नर नारी नाहीं मनुष्याचे नांव । गोकुळ हे गांव सांडियेले ||९||
सांडियेली अन्ने संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनी जाती ||१०||
तिरी माना घालुनिया उभ्या गाई । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ||११||
यमुनेच्या तिरी झाडे वृक्ष वल्ली । दुःखे कोमाईलीं कृष्णाचिया ||१२||
यांचे त्यांचे दुःख एक झाले तिरी । मग शोक करी मायबाप ||१३||
मायबाप तुका म्हणे सहोदर । तोंवरीच तीर न पवतां ||१४||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply