चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥१॥
रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणे बरीं नाहीं म्हूण ॥२॥
न संपडे इंद्र चंद्र ब्रम्हादिकां । अभिमाने एका तिळमात्रे ॥३॥
तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥४॥
भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥५॥
दुष्ट अभक्त जे निष्ठुर मानसी । केली हे तयांसी यमपुरी ॥६॥
यमदूत त्यांसी करिती यातना । नाही नारायणा भजले जे ॥७॥
जे नाही भजले एका भावे हरि । तया दंड करी यमधर्म ॥८॥
यमधर्म म्हणे तया दोषियांसी । का रे केशवासी चुकलेती ॥९॥
चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुम्हा कान डोळे मुख ॥१०॥
कान डोळे मुख संतांची संगती । न धराच चित्ती सांगितले ॥११॥
सांगितले संती तुम्हा उगवूनि । गर्भासी येऊनि यमदंड ॥१२॥
दंडू आम्ही रागे म्हणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥१३॥
दुर्जनाचा येणे करूनि संहार । पूर्ण अवतार रामकृष्ण ॥१४॥
रामकृष्णनामे रंगले जे नर । तुका म्हणे घर वैकुंठी त्या ॥१५॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply