आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे.
मित्रांनो, आज तुम्हाला मी एका छोट्या दोस्तांची ओळख करून देतो, एका चांगल्या मुलाशी दोस्ती करणे तुम्हाला नक्कीच आवडेल.
या छोट्या दोस्ताचे नाव आहे , मोन्या, वयाने छोटी, तरी स्वारी फार हुशार आहे बरं का, म्हणतात ना ‘मूर्ती लहान – कीर्ती महान ‘,
असा हा मोन्या, गोरा गोरा पान , टप्पोरे डोळे, खळी पडणारे गोबरे गोबरे गाल, असा दिसणारा मोन्या टिपटॉप ड्रेस घालून समोर आला की अशा स्मार्ट मोन्याला पाहून सारे एकदम खुश होऊन जातात.
मोन्या माझ्या घराच्या समोरच रहातो, सायकलवरून कोलोनीत चकरा मारीत फिरणे त्याला भारी आवडते.
मी पहिल्यांदा त्याला भेटलो ,तो दिवस मला चांगला आठवतो,
नीट नेटका राहणारा, हसून गोड बोलणारा हा छोकरा मला प्रथमदर्शनीच आवडून गेला.
मी त्याला विचारले-
कोणत्या वर्गात शिकतोस रे बाळा ?,
पटकन त्याने उत्तर दिले-
काका, मी पाचवीच्या वर्गात शिकतोय,
हा एवढासा टिल्लूसा पोरगा पाचवीत आहे ‘, हे मला खरेच वाटेना, मग मी त्याला पाचवीच्या पुस्तकातील प्रश्न विचारून पाहिले,
मोन्याने लगेच, त्याला पाठ असलेल्या कविता म्हणून दाखवल्या, तेंव्हा मात्र विस्वास ठेवावा लागला.
सकाळी अगदी लवकर उठण्याची सवय मोन्याला आहे’ ,हे मी पाहिले, मग त्याची दिनचर्या मला कळाली-
सकाळी लवकर उठल्यावर, स्वछ तोंड धुणे, लगेच स्नान करणे आणि बाबांना पूजेसाठी लागणारी फुलं ,घराच्या अंगणात असलेल्या बागेतून तोडून आणून ठेवणे, हा रोजचा कार्यक्रम,
एका सकाळी मी मोन्याच्या घरी गेलो, तेंव्हा देवघरा समोर बसून मोन्या छान आवाजात
मनाचे श्लोक ” ,म्हणतो आहे हे पाहुन मला आश्चर्य वाटले, ते पाहून मोन्याचे आई – बाबा कौतुकाने सांगू लागले,
आमच्या मोन्याला गीतेचे अध्याय देखील पाठ आहेत बरं का, छान म्हणतो तो,
लगेच माझ्या कानावर मोन्याच्या आवाजात
गीतेच्या पंधराव्या अध्यातील श्लोक कानावर पडले,
मोन्याच्या या पाठांतर गुणांचे मला कौतुक वाटले.
नंतरच्या दिवसात तर माझी आणि मोन्याची
खूपच गट्टी जमली. माझ्या सारख्या मोठ्या माणसाला ” मोन्यासारखा छोटा दोस्त आहे”,
याचीच सर्वांना मोठी गम्मत वाटायची.
दुपारी शाळा असल्या मुळे मोन्याची सकाळ मोकळी असते,पण हा वेळ तो वाया घालवत नाही, तो बाहेरच्या ओट्यावर येऊन बसतो, आणि धड्यातले शब्दार्थ पाठ करणे, कविता पाठ करणे ‘ असा त्याचा अभ्यास चालू असतो.
समोरच माझे घर असल्यामुळे, मोन्याच्या मोठ्या आवाजात सुरु झालेला सगळा अभ्यास ऐकण्याची सवय आम्हाला झाली आहे.
सतत अभ्यास करण्याची सवय असल्या मुळे मोन्या परीक्षेत पहिल्या पाचात ” ही गोष्ट ठरले ली होती, असे असले तरी मोन्या म्हणजे
अभ्यासातील किडा ” , असे मात्र नाही बरे का !,
गोष्टीची पुस्तके म्हणजे त्याची आवडती, तहानभूक विसरून मोन्या खूप पुस्तके वाचीत असतो, माझ्याकडे नेहमीच खूप पुस्तके असतात हे मोन्याला माहिती झाल्यापासून,तो कधीही माझ्याकडे येतो,
त्यावेळी मी लेखन करण्यात मग्न असेल तर,तो गुपचूप माझ्या खुर्ची शेजारी उभा राहतो, एक शब्द बोलत नाही, मग ,
मी चष्म्यातून त्याच्याकडे पहातो,
दोन्ही हात चड्डीच्या खिशात, आणि टप्पोऱ्या डोळ्यातील बाहुल्या गरगर , घरभर फिरत असतात, पण लक्ष पुस्तकावर असते.
मी विचारतो- काय मोनू सेठ
चॉकलेट कि बिस्कीट हवे ?
तो म्हणतो- हे दोन्ही मला नकोत, त्याऐवजी एक पुस्तक द्या ना,
मी खुर्चीतून उठतो,मोन्याचा हात धरून,त्याला पुस्तकांच्या कपाट समोर उभा करतो, मग तो स्वतःच्या हाता ने एक- दोन पुस्तकं काढून घेऊन न थांबता घराकडे धूम पळतो,
त्याचे वाचनाचे वेड पाहून त्याचे बाबा सर्वांना सांगत असतात –
आमच्या मोन्याला वाचनामुळे खूप खूप माहिती असते बरे का “!
” केवळ अभ्यास करणारा नि खूप पुस्तकं वाचणारा “, हा मोन्या छान छान चित्रं पण काढतो “, ही गोष्ट आम्हाला अचानक कळाली,
त्याची काय गम्मत झाली की,
उन्हाळ्याच्या सुट्टीत पेपरच्या रविवार- पुरवणीत “, चित्र- रंगवा” हे सदर असते, त्यासाठी मोन्याने चित्र रंगवून पाठवणे सुरु केले, आणि काय, एका रविवारी मोन्याच्या चित्राला पहिले बक्षीस ” जाहीर झाले,ही बातमी होती.
त्यादिवशीच्या पेपरात मोन्याच्या बक्षीस पात्र चित्रास पाहून सर्व खुश झाले.मोन्याला बोलावून घेत मी त्याला म्हटले –
काय मोनू सेठ , हे तर आम्हाला माहितीच नव्हते”, घे, गोष्टीची ही नवी पुस्तके तुला बक्षिस”.
गोष्टीचे पुस्तक घेणारा मोन्या माझ्याकडे पाहून नुस्ता हसत होता, त्याच्या गुब्बू गालावर मस्त खळ्या उमटत होत्या,
त्याला म्हणालो- तू खूप हुशार आहेस माझ्या दोस्ता.
मित्रांनो, तुम्ही माझ्याकडे याल ना, त्यावेळी तुमची नि मोन्याची दोस्ती नक्की करून देईन.
—————————— ————————————————————
बालकुमार कथा- मोन्या
ले- अरुण वि.देशपांडे- पुणे.
9850177342
—————————— ———————————————————–
पूर्व-प्रकाशित – दै.सत्य-सत्याग्रही -सातारा , रविवार-पुरवणी -दि.०६-०१-२०१९ .
Leave a Reply