बालमन अत्यंत निरागस असतं, हे आपल्याकडून केवळ बोललं जातं; पण त्याचा अनेकदा आपल्या विचारांत आणि वर्तनांत उपयोग केल्याचं दिसून येत नाही. बालमन हे अनुकरणप्रिय असतं; निरपेक्ष, निरागस, नि:स्वार्थी आणि निरपराधी असतं. केवळ अनुकरणप्रिय पिंडानुसार ते सभोतली घडणाऱ्या घटना, घडामोडी याचं निरीक्षण करून त्याचं अनुकरण करत असतं. ह्या बालमनाला सकारात्मक वातारणात वाढवणे आवश्यक असतं. ज्यायोगे घडणाऱ्या घडामोडी ह्यादेखील सकारात्मकच असल्याची प्रचीती येत राहते.
जेव्हा आपण नातं आणि व्यवहार एका तराजूत तोलायला लागतो, तेव्हा परस्परांमधील संबंध काही अंशी बिघडायला ते कारणीभूत ठरतं. अशा प्रकारच्या नात्यांतील, प्रत्येकानं परस्परविरोधी, व्यावहारिक विचार सुरु केला की, आपापसात दूरी निर्माण होते आणि कालांतरानं त्याचं दरीत रुपांतर होतं. आणि मग अशी नाती संपुष्टात येतात. ह्या घडामोडींचा थेट परिणाम बालमनावर होत असतो. बालमन निष्पाप असतं, त्या मनाला खरं-खोटं, चांगलं-वाईट, आपलं-परकं, जवळचा-लांबचा ह्यांतील फरक समजण्याइतकं ते परिपक्व झालेलं नसतं. हे असं चित्र हल्ली अनेक कुटुंबात दिसू लागलं आहे. हा दुरावा निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे? यापेक्षा काय कारणीभूत आहे याचा विचारपूर्वक शोध घेणं जरुरीचं असतं.
निर्माण होणारी परिस्थिती ही केवळ मानसिक कारणांमुळेच अधिक असते. आपापल्या मनाच्या मर्यादा लक्षात न घेतल्याने अनेक प्रसंग निर्माण होतात. या प्रतिकूल परिस्थितीत कोण चुकत आहे? यावर भर दिला जातो आणि नेमकं कारण काय असू शकतं? की ज्यामुळे परिस्थितीतील अनुकुलता संपुष्टात आली, याची जाणीव होत नाही.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply