आपल्या प्रत्येकाच्याच लहानपणी आपण अनुभवलेले प्रत्येक दिवस आनंददायी ठरत असंत. लहानपणातलं आपलं निष्पाप बालमन त्यामुळेच सतत उत्साही असायचं. अगदी शाळेतले दिवस असतील, अभ्यास न केल्यामुळे घरच्यांचा खाल्लेला ओरडा असेल, अथवा मोठ्या भावंडाबरोबर झालेलं भांडण असेल; तरीही त्याचा कोणताही खोलवर परिणाम अंतर्मनावर फारसा होत नसे. भांडणे झाली तरीही काही वेळातच पुन्हा एकत्र येऊन खेळणे सुरु व्हायचं. पुन्हा आनंदी वातारवणात उरलेला दिवस मावळायचा. एकत्र असणं अथवा येणं हेच खरं तर त्या आनंद निर्मितीच्या मागचं कारण असायचं. हल्लीच्या व्हर्च्युअल जगात संवाद आणि सहवास दोन्हीही इतिहासजमा होत चाललं आहे. संवाद होतो म्हणा तसा, पण व्हर्च्युअल पद्धतीने, प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर बोलूनही नाही, तर व्हॉटस् अॅपद्वारे. त्यामुळे सहवासाचा तर प्रश्नच येत नाही.
मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपलं नातं इतकं संकुचित ठेवण्याची कदाचित अनेकविध करणेही असतील. ती कारणे प्रत्येकाची भिन्न देखील असतील. पण निर्माण होणाऱ्या दुराव्याला जबाबदार कोण? ह्याचा बालमनावर काय आणि किती खोलवर परिणाम होऊ शकतो हे आपण समजू शकणार का? आणि कधी? अर्थात प्राप्त परिस्थितीचा विचार करून ह्यावर योग्य मार्ग काढणं महत्वाचं आहे. सुयोग्य पर्याय निवडून बालमनाला सांभाळणे आवश्यक असतं.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply