नवीन लेखन...

बालमोहन विद्यामंदिर

दि.१९ मार्च , दादासाहेब रेगे या शिक्षण महर्षीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने एका हृद्य सोहळ्याचा आनंद, याची देही याची डोळा घेण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. १९ मार्च हा दिवस बालमोहन विद्यामंदिरचा विद्यार्थी जागतिक दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याच्या कल्पनेतून १०वी ड च्या १९७२ साली पासआऊट झालेल्या मित्र मैत्रीणीनी एकत्र येऊन आपल्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित केलेल्या एका अप्रतिम सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य, YouTube, fb page, zoom यावरून जगभरातल्या बालमोहनकरांना मिळालं. याच निमित्ताने, संग्रही जपून ठेवावी अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेमध्ये ज्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसंदर्भात लिहिलेले लेख, कविता यांचा अंतर्भाव करण्यात आला होता त्यांनाही या सोहळ्याला निमंत्रित करण्याचं आयोजकांनी ठरवलं, आणि माझाही लेख स्मरणिकेत असल्यामुळे सहाजिकच हे निमंत्रण मलाही मिळालं. घरी बसून हा सोहळा ऑनलाईन पहावा लागणार म्हणून मी बराचसा खट्टू झालो होतो. परंतु कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी हे निमंत्रण माझ्या हातात पडलं आणि शब्दशः माझा आनंद गगनात मावेनासा झाला. साठी पार केलेला मी ,लहान मुलासारखा ती पत्रिका घेऊन घरभर आनंदाने बागडत होतो. माझा लेक आणि पत्नी तर हतबुद्ध होऊन माझ्याकडे पहात होते. हा आनंद बालमोहनच्या एका सोहळ्याला उपस्थित राहायला मिळण्याचा होता. माझ्या लेखात मी म्हटलंय त्यानुसार दादामामा…. माझे चुलतभाऊ याच नावाने त्यांना संबोधित करायचे, कारण माझ्या सख्ख्या चुलत काकीचे ते सख्खे भाऊ , त्यामुळे मलाही तशीच सवय लागली. माझ्या आई वडिलांचा दादांच्या संपूर्ण कुटुंबाशी खूप चांगला परिचय होता. आम्ही अनेकदा दादांच्या घरी जात होतो. त्यांच्याबद्दलच्या स्मृती ज्या अगदी आजही मन:पटलांवरून पुसल्या गेलेल्या नाहीत. असो,

सकाळपासूनच माझी गडबड सुरू होती. पावणेपाच वाजताच मी वीर सावरकर स्मारक, दादर या कार्यक्रमस्थळी पोहोचलो. आत सारीकडे आपल्या अगदी घरातलं एखादं मंगल कार्य असावं, आणि “कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे, तरी आपण उपस्थित राहून कार्याची शोभा वाढवावी” असं नाही का निमंत्रण पत्रिकेत लिहिलेलं असतं, अगदी तस्संच वातावरण भरून राहिलेलं होतं. शाळेचे माजी बालमोहनकर ज्येष्ठ विद्यार्थी अगदी लग्नसोहळा असल्यासारखे सजून धजून येत होते. कार्यक्रमस्थळी अगदी प्रत्येक ठिकाणी कल्पकता दिसून येत होती. दादांच्या एका अगदी जिवंत पोर्ट्रेटसह एक सेल्फी पॉइंट सुद्धा उभा केलेला होता. अल्पोपहाराच्या मेन्यूतही इतर पदार्थांसहीत स्मृती जाग्या होऊन जिभा खवळतील , उदा.च्याउम्याऊ, बटाटावडा, आंबेडाळ असे पदार्थ होते. जोडीला थंडगार पन्हं.

कार्यक्रमाच्या मुख्य सभागृहात तर गप्पाटप्पा, भेटीगाठी, थट्टामस्करीला अगदी ऊत आला होता. नेहमी गाठीभेटी होणारे किंवा बऱ्याच काळानंतर भेटलेले अगदी प्रेमभराने एकमेकांची चौकशी करत होते, गतस्मृती जाग्या करत होते. मला मात्र या सगळ्या जिवंत सोहळ्याकडे थोडं अलिप्त राहून पहाण्याचा भरपूर आनंद मिळत होता. एकतर मी बालवर्गापासून सातवी पर्यंतच म्हणजे १९६४ ते १९७० या काळातच प्रत्यक्षात बालमोहनकर होतो. अर्थात मनाने कायमचाच होतो म्हणा. पुढे आम्ही ठाण्याला राहायला गेल्यामुळे हा दुरावा सोसणं भागच होतं. माझ्या बॅचचं तसं कुणी दिसत नव्हतं, आणि असलंच तरी मध्ये खूपच अंतर पडल्यामुळे ओळखणंही कठीण होतं. त्यामुळे मला या गोड वातावरणाचा आनंद अलिप्तपणे घेण्यात खूपच मज्जा येत होती. रंगमंचावर इतका अप्रतिम सेट उभा केला होता, की पडदा बाजूला होताच, मनाने मी शाळेच्या सभागृहात कधीच पोहोचलो होतो. कार्यक्रमाचा प्रारंभ शाळा भरताना होत असे, तशी घंटा वाजवून झाला, आणि अगदी मनापासून सांगतो, अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यांसमोर तो काळ जसाच्या तसा उभा राहिला. रंगमंचावरून ‘ अंतर ममं विकसित करी… प्रार्थना सुरू झाली आणि डोळे भरून आले. पद्मश्री पद्मजा फेणाणी हीचा स्वर आणि संवादिनीवर साथीला, वयाच्या शतक सोहळ्याकडे आलेले तरणेबांड जोशी सर.

सूत्रसंचालनापासून आभारप्रदर्शनापर्यंत आपलेपणा ओतप्रोत जाणवत होता. म्हणजे सूत्रसंचालन करताना एकमेकांना हळूच सूचना करत, समोर माईक आहे, आपण हळू बोललो तरी तो ते पकडणार आहे, किंवा आपल्या हातात दिलेला माईक आपल्या तोंडासमोर धरायचाय हेच विसरून सगळं चाललेलं होतं. म्हणजे शाळेच्या स्नेहसंमेलनात होणाऱ्या नाटकात नाही का, आपण आपल्या सहअभिनेत्याला त्याचे विसरलेले संवाद आपल्या दृष्टीने हळू आवाजात सांगायचो, आणि प्रेक्षकांना मात्र ते स्पष्ट ऐकू जायचे तसच काहीसं चाललेलं होतं. पण या सगळ्याचं कारण एकच होतं, आपलेपणा. समोर किंवा रंगमंचावर बसलेली मंडळी आपलीच आहेत, आणि ती आपल्याला निश्चित समजून घेतील हा भाव त्यामध्ये दिसत होता. आणि स्पृहानेही हा भाव नेमका पकडला.

रंगमंचावर आमंत्रित चौदा कीर्तिवंत माजी बालमोहनकर उपस्थित होते. स्पृहा त्यांना बोलतं करणार म्हटल्यावर, प्रश्नच नव्हता, आणि तीने आपल्या खुसखुशीत आणि मिश्किल शैलीत ते अगदी नेमकेपणाने पार पाडलं. तसं पाहिलं तर ही चौदा मंडळी म्हणजे फक्त एक झलक होती. भारतासह जगभरात बालमोहन विद्यामंदिरचं ऋण मान्य करणारी आणि अनेकविध क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर आपल्या कर्तबगारीने, प्रतिभेने विराजमान असूनही, आपला घडलेला पाया न विसरणारी व्यक्तिमत्त्व असंख्य आहेत. त्यातलेच चौदा दिग्गज, आपलं उच्च सामाजिक स्थान, आपल्या सुप्रसिद्धीचं वलय आणि त्या वलयासहित जुडणारी कवच कुंडलं बाहेरच उतरवून विद्यार्थांसारखीच रंगमंचावर विराजमान झाली होती. जयराज साळगावकर तर म्हणाले सुद्धा,

“तुमच्या लक्षात आलंय का कल्पना नाही, पण मी आज शाळेच्या गणवेशाच्या रंगाची शर्ट पँट घालून आलोय.” तुमच्या बालमोहनसोबतच्या आठवणी काय आहेत? हा प्रश्न प्रत्येकाला होता. यावर प्रत्येक कीर्तिवंताकडे खूप काही सांगण्यासारखं होतं, त्यांना सांगायचंही होतं. अर्थात वेळेचं भान ठेवणं भागच होतं. प्रत्येकाच्या गोड, सुखद, मनापासून आलेल्या स्मृतीनी मन भूतकाळात एक फेरी मारून येत होतं.

दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता.
अनेकदा वाद होतात,

“अरे, इतर शाळांसारखीच शाळा. मग तुम्ही बालमोहनकर इतकं काय भरून आल्यासारखं करता अगदी”?

खरंच काय आहे याचं उत्तर ?

माझ्या मते बालमोहन काय आहे , हे त्यामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यालाच कळू शकतं. बालमोहन एक वारसा आहे पुढच्या पिढीला देण्याचा, एक वसा आहे कधीही टाकून न देण्याचा आणि एक संस्कार वृक्ष आहे जिच्या अंकावर आलेल्या विद्यार्थ्याला सुसंस्कारीत आणि सुशिक्षित घडवणारा आणि एक विचारी नागरीक बनवणारा. अर्थात आपल्या शाळेचा अभिमान प्रत्येकालाच असतो आणि तो असायलाही हवा. हे सगळं खरं असलं तरी, बालमोहन हे नाव जगाच्या पाठीवर कुठेही घेतलं तर कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त कितीही, “मी बालमोहनकर” म्हणत, अगदी भरल्या मनाने पुढे येतील आणि कुणी आपल्या घरातलच भेटल्याच्या आनंदाने आपल्याशी संवाद साधतील.

ही किमया आहे, त्या पवित्र वास्तूची, त्या वस्तुमधल्या समर्पित भाव जपणाऱ्या गुरुजनांची, त्यांनी आत्मीयतेने घडवलेल्या विद्यार्थ्यांची आणि या सगळ्यांना माया, प्रेम आणि शिस्तीचं कोंदण देणाऱ्या दादासाहेब रेगे या थोर शिक्षण महर्षिची.

Reunion अनेक होतात, भेटणं होतं, थट्टा मस्करी गप्पा होतात, खाणं पिणं होतं आणि सारे पांगतात. परंतु काहीना यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं करून दाखवण्याची इर्षा असते.

अकरावी ड १९७२ च्या सगळ्या विद्यार्थ्यांचे खरंच मनापासून आभार, कारण खूप वर्षांनी एक सुंदर, सुनियोजित आणि सुखद अनुभव या हृद्य सोहळ्यातून आम्हाला दिला. हृद्य म्हणजे काय ? तर अगदी हृदयापासून आयोजित केलेला, अगदी खरा आणि

हृदया हृदय एक झाले,
ये हृदयीचे ते हृदयी घातले असा.

हा सोहळा तन मनात भरून आणि भारून, परतताना रस्त्यात कुणी मध्ये आलं, की म्हणावसं वाटत होतं,

“Side please मी बालमोहनकर येतोय.”

प्रासादिक म्हणे,

— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..