नवीन लेखन...

बंदा.

” बस क्या हूजूर ! बंदे को यतीम करके छोड जाते हो इतने दिन! तिन दिन जाली नहीं छोडा आपके
इंतजारमें “.
या वाक्यातील ” हुजूर ” मी, ” बंदा ” म्हणजे इब्राहिम शेख उर्फ काण्या इब्राहिम नावाचा आरोपी आणि जाली म्हणजे लॉकअपच्या ग्रिलचा सरकता दरवाजा.
एखाद्याच्या व्यंगावर कधी बोट ठेऊ नये असं म्हणतात. ते रास्तही आहे. परंतु दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार मधे मोहम्मदअली रोडच्या पश्चिम बाजूच्या फुटपाथ वर अवघे आयुष्य काढलेल्या काण्या इब्राहिमला फक्त इब्राहिम नावाने दहा हाका मारल्या असत्या तरी त्याने डोकं वर उचलून पाहिलही नसतं. इतकं त्याच्या नावाला “काण्या ” हे बिरूद घट्ट चिकटलं होतं.
सन १९८५ मधे Detection Of Crime Branch CID च्या युनिट तीन मधे माझी नेमणूक होती. आमच्या युनिट कडे सर्वसाधारणपणे मध्य मुंबईचे क्षेत्र होते. त्याच वर्षी मध्य मुंबईत टॅक्सी चालकांना लुटण्याचे प्रकार अचानक वाढले. सिनेमा थिएटर मधील रात्रीचा शेवटचा खेळ संपला की चार इसम तेथून सायन, माटुंगा , शिवडी किंवा ताडदेव अशा ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी करत असत. एखाद्या आड गल्लीतून जात असताना लघुशंकेच्या निमित्ताने ते टॅक्सी थांबवत. एकजण टॅक्सी ड्रायव्हरच्या बाजूला बाहेरून जाऊन उभा राही. बाकीचे तिघे वस्तऱ्याचा धाक दाखवून टॅक्सी ड्रायव्हरला लुटत. त्याच्या अंगावरचे पैसे, घड्याळ, अंगावर सोन्याची चेन किंवा अंगठी वगैरे असल्यास काढून घेऊन त्याला टॅक्सीतून जबरदस्तीने उतरवून, टॅक्सी घेऊन निघून जात. अपरात्री, निर्जन स्थळी आपल्याला जीवघेणा हल्ला न करता लुटले यात त्यातल्या त्यात समाधान मानत टॅक्सी ड्रायव्हर दुसऱ्या दिशेला पळत सुटे आणि जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देत असे. लुटलेली टॅक्सी दुसऱ्या दिवशी भेंडीबाजार पासून साधारण दीड दोन किलमीटर्स च्या त्रिज्येत सोडून दिलेली मिळत असे.
तक्रारदार टॅक्सी ड्रायव्हर्स कडे विचारपूस केल्यानंतर एक गोष्ट कळली होती की ड्रायव्हरच्या बाजूला बाहेर उभं राहणारा इसमच लुटीनंतर टॅक्सी चालवीत असे.
टॅक्सीत बसल्यावर त्यांचा संवाद कोणत्या तऱ्हेचा असे हे चौकशीअंती कळल्यावर एक अनुमान काढता आले की आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखणारे होते. लुटीनंतर टॅक्सी जिथे सोडून दिली जात होती तिथपासून घरापर्यंतचे अंतर चालत जाण्याइतपत किंवा तेथून दुसरी टॅक्सी केली तरी कमीत कमी मीटर रिडिंग होईल इतक्या अंतरावर आरोपींची निवास स्थाने असावीत असाही आमचा होरा होता. इतकेच नव्हे तर टॅक्सी घेऊन जात असताना जो टॅक्सी चालवत असे त्याच्या गाडी चालविण्याच्या पद्धतीवरून तो सराईत किंवा व्यावसायिक ड्रायव्हर असणार हेही आम्ही ताडले होते. आरोपी भेंडी बाजार परिसरा भोवतीचे असणार ही आमची अटकळ होतीच.
नागपाडा आणि डोंगरी पोलिस ठाण्यात पूर्वी नेमणुकीस असलेले आणि त्यामुळे तेथील परिसराची उत्तम माहिती असलेले आमचे निकम हवालदार कामाला लागले. भेंडी बाजार मधील फूटपाथ वासी टॅक्सी ड्रायव्हर ” काण्या इब्राहिम आजकल किसीके भी गाडीपे जाता नही. लेकिन दिनभर मस्त गोली मारके ठुस् सोयेला पडा रेहेता है l ” अशी खबर त्यांना मिळाली.
काण्या इब्राहिमला उचललं आणि त्याच दिवशी रात्री पर्यंत उरलेले आणखी तिघे, मोहम्मद अयुब निस्सार अहमद , शेख इनायत अली आणि मुस्तफा कुरेशी क्राइम ब्रँच लॉक अप मधे ” जमा ” झाले.
काण्या इब्राहिम सोडून बाकीचे तिघेही खाटीक व्यवसायाशी संबंधित आणि एकमेकांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांना एकत्र आणणारा दुवा म्हणजे चौघांनाही चरस ओढण्याचे जबरदस्त व्यसन . चौघेही वयाने पंचविशीच्या आतबाहेर .
साग्रसंगीत चौकशीमधे या चौकडीने केलेले एकूण ३१ टॅक्सी रॉबरी चे गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात रिपोर्ट झाल्याचे निष्पन्न झाले. सगळ्या केसेस क्राईम ब्रांच कडे तपासा साठी घेण्यात आल्या. लुटीतील पैसे सोडले तर दागिने , घड्याळे वगैरेचा पुरावा जप्त करण्याची मुख्य आणि मोठी कामगिरी पार पडणे अजून बाकी होते.
हे चौघेही शाळांतील ड्रॉप आऊटस् होते. मुस्तफा आठवी पर्यंत तरी पोचला होता. बाकीच्यांनी फारतर तिसरी चौथी पर्यंत मजल मारली होती.
चौकशी दरम्यान इतर आरोपी प्रथम कबुली देत नव्हते. केलेली कृत्ये , लुटीच्या वस्तूंची विल्हेवाट याबाबतचे आरोप ते अपेक्षेप्रमाणे एकमेकाच्या अंगावर ढकलत होते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे ठेऊन विचारपूस चालली होती.
Detection of Crime Branch चे तेव्हाचे आणि आताचे ऑफिस यात जमीन अस्मानाचा फरक आहे. वरिष्ठ पोलिस निरक्षकाना स्वतंत्र केबीन्स असल्या तरी आम्हा सब इन्स्पेक्टरस् साठी एका मोठ्या हॉलमधे भिंतीच्या कडेने गोदरेजची टेबल्स आणि खुर्च्या असत. आरोपीची चौकशी करताना त्याच्या हाताला बेडीची एक कडी आणि दुसरी टेबलाच्या पायाला अडकवून त्याला टेबलाजवळ बसवून त्याचे जबाब वगैरे नोंदविले जात.
काण्या इब्राहिमच्या चौकशीच्या पहिल्याच दिवशी त्याचा मला पहिला प्रश्न आला. ” साब , आज गाडी नहीं लाया? “
मी खरंच त्या दिवशी माझी बुलेट नेली नव्हती.
” नही लाया , क्यूँ ? ” मी विचारले.
” अभी मुझे लाया लॉकअप से तब देखा ना मैने l डबल सिक्स डबल नाईन दिखी नहीं “
डोळे तिरळे असले तरी ” टिपणारे ” आहेत हे माझ्या लक्षात आले.
जेमतेम पाच फूट उंचीच्या या इसमाने धुम्रपानाच्या व्यसनामुळे छातीचा खोका करून घेतला होता. बोलता बोलता मधेच खळाळून हसण्याची त्याला सवय होती. हसला की हलणाऱ्या खांद्याच्या तालावर छातीचा खुळखुळा वाजत असे. केस बारीक कापलेले, चालताना उजवा खांदा किंचित खाली झुकलेला आणि दोन्ही हात हलवत चालणाऱ्या अशक्त काण्या इब्राहिमची मूर्ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे.
गुन्ह्याची कबुली देताना आरोपीकडून होणाऱ्या लपवाछपवी वगैरेसारख्या नेहेमीच्या अनुभवांचा याच्या बाबतीत प्रश्न नव्हता. त्याचं अख्खं आयुष्यच उघडं पुस्तक होतं.
” इतना ३०/३५ केसेस किया तुम लोगोने …..” अशी माझी सुरुवात मधेच तोडून,
” ज्यादा होना चाहिए साब l रमजान के टाईम तो चालू हूए थे ये कारनामे ” असं सहजपणे स्वतःच सांगून टाकलं.
बऱ्याच केसेसमधे असं झालं होतं की लुटल्या गेलेल्या टॅक्सी ड्रायव्हर्स पैकी ज्यांचे फक्त घड्याळ आणि तुटपुंजी रक्कम इतकेच लुटले गेले होते असे बरेचसे जण पोलिसात अगोदर दिलेल्या तक्रारीचा पाठपुरावा किंवा तपासात सहकार्य करण्यास तयार नव्हते. चारपाचशे रुपयांच्या लुटीसाठी कशाला पुन्हा पोलिस आणि कोर्टाची चक्कर ही मानसिकता. आरोपींनी गुन्हयाची जागा दाखवल्यावर ती जागा ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असेल , तिथे दाखल झालेल्या गुन्ह्याच्या कागदपत्रांवरून तक्रारदार ड्रायव्हरचा पत्ता मिळाला की त्याला बोलावून ओळख परेड, परत मिळवलेल्या चीज वस्तूंची ओळख आणि त्या अनुषंगाने करण्यात येणारे पंचनामे इत्यादी कामात आम्ही व्यग्र होतो. असाच एक टॅक्सी ड्रायव्हर बिलकुल सहकार्य करायला तयार नव्हता. आपल्याला लुटणारे या पकडलेल्या वर्णनाचे गुन्हेगार नव्हेच असं वारंवार सांगत होता. कायदेशीर सोपस्कारांची अंमल बजावणी करून घेण्यात येणारी ओळख परेड अजून बाकी असल्याने आरोपी त्याच्यासमोर आणता येत नव्हते. मात्र त्यानंतर त्याच केस बाबत आमची चर्चा चालू असताना काण्या स्वतःच मला म्हणाला
” साब, फाय गार्डन के केसवाला ड्रायव्हर ना? टॅक्सी से उसको उतारा तो वडाला स्टेशन की तरफ इतना जोरसे भागा ! भागते समय उसके हातसे बीडी नीचे गिर गयी l वो रुका l एक कदम पीछे आया , बीडी उठाया और वापस भागा l लेकिन बिडी नहीं छोडी l “
हे सांगत असताना त्याचं खुळखुळा वाजवत हसणं चालू होतं. हा किस्सा त्या ड्रायव्हरला ऐकवला तेव्हा मात्र त्याने मान खाली घालून ” होय तो मीच ” असं मान्य केलं.
इतक्या केसेस मधील घटनाक्रम आणि अचूक बारकावे तो इतक्या सहजतेने सांगत असे की त्याच्या स्मरणशक्तीची कमाल वाटावी.
आयुष्यात चैन, मौजमजा या गोष्टींशी कधीही संबंध न आलेल्या त्याला त्या गोष्टींची आसक्तीही नव्हती.
” काण्या , चरस क्यू पिते हो ? छोड दो l” असं म्हणालो तर हसत विचारायचा ” तो क्या होगा? “
” अरे जलदी नही मरोगे l”
” जी के भी क्या करू साब ? और किसने देखा है कल क्या होगा ? साब , ये टॅक्सी लाईन मे ऐसी भली भली हस्ती मरते देखी है , के आप सोच नाही सकते l ये सिग्नलपे ऐशमें अपनी गाडीमें बैठेला अगले सिग्नलपे देखा तो लाश l अपनी तो पैदाईशही फुटपाथ की l अखिर भी वहीच l अकेला तो हूं l अपने पीछे रोनेवाला भी कोई नहीं l सिर्फ आखिरमें बडी गाडी हैं अपने लिये l मुन्सीपालटी की l ” असं म्हणून खो खो हसत बराच वेळ छातीचा खुळखुळा वाजवत बसला.
” फूटपाथ पे क्यों रहते हो? थोडा पैसा जमा करके कही जगह क्यूँ नहीं लिया?”
या माझ्या बाळबोध प्रश्नावर तो असाच खो खो हसला होता.
” जमा करके रखू कहां ? जहाँ नहाता हूं वहांसे साबून की टिक्की तक नहीं बचती चोरोंसे , तो पैसा क्या रहेगा? दिनमें अपना दो वक्त बूर्जीपाव छूटता है, बस हो गया l सोने के लिये बोहरी के दुकानकी फली पहेलेसे अपनी l वो बुढा भी भला है l बारिश में टॅक्सी नही चली तो पाच दस रुपया टिकाता है पेट के लिये l मुकद्दरमें है उतनाही मिलेगा l उसके आगे फुटी कवडी भी नहीं मिलती किसिको l “
इतर आरोपींबरोबर तो
कसा काय जोडला गेला याबद्दल त्याची चौकशी चालू होती.
” साब , कसमसे पहले टाइम अय्युब मुझे फसाके लेके गया. रमझानमें एक दिन बोला ‘ चल पिक्चर चलते हैं l’ गया उसके साथ शिरीन टॉकीज में l ऊस रातमें पहला काम बजाया इन लोगोने और वहांसे भागते टाईम मुझे बोला गाडी चलाने l पहले मुस्तफा चलाता था लेकीन उसके पास बॅज नहीं है l दुसरे दिन मुझे सौ रुपये दिये l उसके बाद चालू हो गया और आया आपका मेहमान बनके भत्ता खाने l ( भत्ता म्हणजे आरोपी कस्टडीत असताना त्यांना देण्यात येत असलेले जेवणखाण) वर पुन्हा ते खों खो हसणं.
केसशी संबंधित चौकशी झाल्यावरही कस्टडीतील आरोपींना लॉकअप बाहेर काढून त्यांच्याशी संवाद ठेवण्याने पोलिस कामामधे उपयोगी पडेल अशी फार चांगली माहिती मिळण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने काण्या इब्राहिमला मी लॉकअप बाहेर काढून त्याच्याशी बोलत असे. मी आलो की लॉकअप बाहेरची मोकळी हवा , माझ्याकडून मधेच कटिंग चहा आणि चौकशी बाहेरील संवाद कानावर पडत असल्याने , तो माझी वाट पहात असावा. मधेच दोन तिन दिवस मी फिरकू शकलो नाही म्हणून कासावीस झालेल्या त्याने , मी दिसताच मला “हुजूर ” आणि स्वतःला ” बंदा” करून टाकले होते.
काण्या इब्राहिमची पार्श्वभूमी जाणून घेण्याची त्या वेळी मला उत्सुकता लागली होती . जुजबी चौकशीत असे कळले की याची आई भेंडी बाजारात घरकामे करायची. तिला कोणी नव्हते. जिथे काम करायची अशाच एका घरात ती वसति करत असे. त्या घरातील पुरुषापासून तिला दिवस गेले. हे उघड झाले तेंव्हा तिचा निवारा गेला. ती उघड्यावर आली . या इब्राहिमचा जन्म जे जे इस्पितळात झाला. आई इमारतीच्या जिन्याखाली राहून आणि मिळेल ते काम करून दोघांचे पोट भरत असे. त्याला भाउ बहीण कोणी नव्हते . इब्राहिम जन्मतःच डोळ्याने तिरळा होता. लहापणापासूनच त्याला सर्व जण ” काण्या इब्राहिम” म्हणून हाक मारत असत. तो १२ वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. दोन तीन इयत्ता शिकलेल्या इब्राहिमने फूटपाथवर राहून रात्री टॅक्सी धुण्याचे काम करता करता ड्रायव्हिंग शिकून घेतले आणि तो टॅक्सी ड्रायव्हर झाला. दररोज टॅक्सी मालकाकडून बारा तासांसाठी गाडी घेऊन दिवसाच्या शेवटी ठराविक पैसे त्याला द्यायचे आणि बाकीचे स्वतः ठेवायचे , अशा अनेक दशकांपासून रूढ असलेल्या पद्धती प्रमाणे तो टॅक्सी चालवत असे. ड्रायव्हिंग मधे मात्र तो अत्यंत निष्णात होता. ” सेकडो गाडीया चलायी है मैने साब ,लेकीन आजतक एक खरोंचा नहीं लाया किसी गाडीपे l” एकदा मला तो अभिमानानं बोलला होता.
काण्या इब्राहीम चे लग्नही झाले होते . मदनपुऱ्यातील एका मुलीने त्याला पसंत केले. तिच्या घरात तो घरजावई झाला. परंतु बायको पाच सहा महिन्यातच त्याला सोडून कुणाचा तरी हात धरून पळून गेली. सासूने याला घराबाहेर काढलं. मूळचा फूटपाथवासी पुनः उघड्यावर आला.
या अशा बेभरवशाच्या आयुष्याने त्याला पक्का वास्तववादी करून टाकलं होतं. इतर आरोपींना तो हसत हसत सांगत असे,
“अरे ए भिडू , बोल दो बिना छिपा के सबकुछ l मैने तो पूरी इश्टोरी बतायी हैं साबको l अब तुम ट्रेलरको चिपकके रहनेसे कोई फायदा नही “.
पश्चात्ताप, उपरती, लपवाछपवी करून, खोटं बोलून काही पदरात पाडून घेणे , खाण्या पिण्याची किंवा सुखाची आस… अशी मनुष्य स्वभावात आढळणारी कुठलीही कडा त्याच्यात कधी मला दिसली नव्हती. आला तो दिवस परवडेल ते खाऊन हसत ढकलायचा इतकच माहीत असलेला “काण्या इब्राहीम” इतरांसह तिन वर्ष सजेवर गेला.
काही वर्षांनी निकम हवालदार भेटले. गप्पांमध्ये त्या काळातील केसेसचा विषय निघाला. त्यांच्याकडून कळले की आयुष्यभर परिस्थितीने आपला बंदा करून ठेवलेला “काण्या इब्राहिम ” जेल मधून सजा संपवून सुटून आल्या नंतर काही महिन्यातच , त्याने स्वतःच भाकीत केल्या प्रमाणे , फूटपाथवरच दुकानाच्या फळीवर बेवारस स्थितीत निधन पावला.
त्याच्या मनात होते त्या प्रमाणे म्युनिसीपालीटीच्या मोठ्या गाडीतूनच त्याची शेवटची यात्रा निघाली असेल .
त्या ” भल्या ” बोहरी दुकानदारानेच त्याच्या दुकानाचे शटर उघडण्यास आड येणारी डेड बॉडी हलविण्यासाठी १०० नंबर फिरवला असेल.
त्याच्या जाण्याची दखल घ्यायला कोणी नव्हतेच.
असं म्हणतात , सर्वसामान्यांची नावे चौथ्या पिढीच्या मन:पटलावरून पुसली गेलेली असतात.
इथे तर “काण्या इब्राहिमची ” आठवण काढायला त्याच्या मागच्या पुढच्या कोणत्याच पिढीचा पत्ता नव्हता.
–अजित देशमुख.
(नि) अप्पर पोलिस उपायुक्त,
9892944007 
ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..