“अहो पण! लोक काय म्हणतील? पहिल्या बाळंतपणाला लेकीने आईकडे यायचं तर आईच लेकीकडे जाऊन राह्यली. आता सगळयांना हे सांगत फिरायचं का की माझ्या लेकीलाच इकडे यायचं नाही?” काल तिला आर्याने तसं सांगितल्यापासून सुलभाची चिडचिड सुरु झाली होती. आर्या सुलभाची मुलगी पहिल्यांदा प्रेग्नन्ट होती. सातवा लागला म्हणून सुलभाने माहेरी आणायचा विषय काढला तर तिने, तुच इकडे ये म्हणून सुलभाला सकंटात टाकलं होतं.
“पण मग ती येणार नसेल आणि तू जाणार नसशील तरी सांगावंच लागेल ना लोकांना? आणि तुला राहावेल का?” श्रीने, सुलभाच्या नवऱ्याने लगेच आपला युक्तीवाद मांडला. “तुम्ही ना नेहमी दुसऱ्याचाच विचार करा.” सुलभा वैतागली. आतातरी तिच्याकडे दुसरं काही उत्तर नव्हतं.
हे सगळं सुलभाला माहित का नव्हतं? पण इथल्या अडचणीही नजरेआड करून चालणारं नव्हतं. श्रीला हल्ली बरं नसतं. स्वतःहुन काही सांगणाऱ्यातला तो नाही. शिवाय इथलं सगळं कसं एकमेकांनी ठरवून घेतलेलं आहे.
ती आणि श्री दोघे सकाळी आठला घर सोडतात. सौरभ तिचा मुलगा, बारा वाजता जातो. त्याचा यायचा काही टाइम नाही. तोच जातांना लारूला, तिच्या नातीला शाळेत सोडतो. प्राची तिची सून, दोन वाजता जाते. स्वतः सुलभा तीन वाजेपर्यंत येते आणि येतांना नातीला शाळेतून आणते. मग ती आणि लारू. मम्मी रात्री कधी येते हे लारुला कळत सुध्दा नाही.
सुलभाला वाटलं, आर्याला हे सगळं कळत कसं नाही? फक्त नवऱ्याचाच विचार करायचा? लारू आता मोठी होतेय. तिला नोकरांवर सोडून कसं चालेल?
“हे बघ, तू आता फार विचार नको करत बसूस. उद्या रविवार आहे ना? तू आर्याकडे जा. अमितही असेल उद्या घरी. तो नक्की काढेलच काहीतरी मार्ग यातून. आर्याही ऐकेल त्याचं.”… सुलभा काहीच बोलत नाही बघून श्रीला थोडं वाईटही वाटलं. शेवटी काही झालं तरी ती जशी आई आहे, तशी बायको आणि आजीसुध्दा आहे, हे त्याला कळत होतं.
आता सुलभाला जरा बरं वाटलं. तिला ते पटलं. अमित तिचा जावई, खरंच खूप समजूतदार होता. श्रीचं बोलणं काही चुकीचं नव्हतं. तिला हायसं वाटलं.
आर्याकडे जायला आता सुलभा ट्रेनमध्ये बसली होती खरी, पण अगदी बसल्यापासून तिच्या डोक्यात, आता ते सगळं आर्याला कसं काय समजवायचं हेच सुरु होतं. आज रविवार होता म्हणून फर्स्टक्लास खाली होता. मोजून पाच जणी होत्या. दोघी डोळे मिटून बसल्या होत्या आणि उरलेल्या तीघी त्यांच्या मोबाईलमध्ये बीझी होत्या. सुलभाला वाटलं…. ह्यांना जगात काय चाललयं ह्याची जी एव्हढी उत्सुकता आहे, त्याच्या कणभर तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात काय चाललंय ह्याची असती तर किती बरं झालं असतं? पूर्वी कसं , ट्रेनमध्ये असलेली अनोळखी माणसं सुध्दा अगदी ओळखीचं वागायची…
खार स्टेशन आलं तशी सुलभा सवयीने उठली आणि दारात जाऊन उभी राहिली. चढणारं, उतरणारं कोणी नव्हतं. आता पुन्हा सुलभाचं विचारचक्र सुरु झालं…
रोज दोन स्टेशनं आधीपासनूच अशी उतरायची तयारी सुरु होते. आणि मग चढता-उतरतांनाची मारामारी. आपल्या माणसांसाठी काय काय करतो आपण? सगळं आयुष्य कसं बांधून घेऊन जगलो. आपला विचारच केला नाही कधी. हे सगळं माहित असूनही ही आर्या अशी कशी हट्टी झाली कोण जाणे? संसार म्हणजे एक अँडजेस्टमेन्ट असते हे कसं आणि कधी कळायचं हिला?…
विचार झटकून टाकून सुलभा आता मजेत मधल्या खांबाला लपेटून उभी राहिली. इतक्यात तिला एक तरुण मुलगी तिच्याच डब्याच्या दिशेने धावत येतांना दिसली. तिला चढणं सोयीचं व्हावं म्हणून सुलभा थोडी मागे झाली.
अगदी गाडी आता सुरु होणारच इतक्यात जवळजवळ उडी मारूनच ती मुलगी गाडीत चढली. ती चढत असतांना सुलभाचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिने चक्क गॉगल लावला होता…संध्याकाळचे सात वाजलेत, बाहेर चांगलाच काळोख पडलाय आणि ही गॉगल लावून कशी बाहेर पडली? ….थोडं विचित्र वाटल्याने सुलभा तिला न्याहाळू लागली….
ती मुलगी आता दाराच्या आतल्या बाजुला टेकून उभी राहिली होती. सुलभा अशी तिच्याकडे पहात होती पण तरीही तिने गॉगल काढला नव्हता..काय बरं कारण असावं गॉगल लावण्याचं काही लक्षात येत नव्हतं…
अशी फर्स्टक्लासमधून चाललीय म्हणजे नक्की नोकरी करणारी असेलच. रोज जाणारेच पास काढतात गर्दिसाठी. मुद्याम तिकिट काढून तरुण मुलीने जावं एवढी गर्दी सुट्टीच्या दिवशी तरी कधीच नसते. हिला आता काहीतरी इर्मजन्सी असेल का? कपडे सुध्दा कसे कपाटातून हाताला मिळेल ते ओढून घातलेले दिसताहेत. केसांचा कट इतका सुंदर आहे पण तो सुध्दा तसाच कसातरी घाईत एका क्लीपमधे गुंडाळलाय. गॉगलचं तर काही कारणच कळत नव्हतं…
आता तिच्याकडे बघता बघता आर्याला विसरुन सुलभा नकळत तिचाच विचार करायला लागली होती. पण लगेच थोड्या वेळाने, आपलं असं उगाच तिच्याकडे बघणं चांगलं दिसत नाही असं वाटून सुलभा बाहेर पाहू लागली.
अचानक त्या मुलीचा मोबाईल वाजला आणि सुलभाच्या कानावर शब्द पडले, ” मम्मी, आज खूप मोडतोड झाली. संपलंय गं आता सगळं! मी तुझ्याकडेच येतेय आता. कायमची.” एवढं बोलून ती एकदम गप्प झाली. सुलभाने एकदम चमकूनच तिच्याकडे पाहिलं. क्षणभर आपण काय ऐकलं हे सुलभाला कळलचं नाही..
आता त मुलगी तोंडावर रुमाल धरून रडत होती. सुलभाला तिच्याशी काहीतरी बोलावसं वाटत होतं पण ते आजकालच्या मुलींच्या दृष्टीने…सभ्यतेला धरून नसतं…हे सुलभाला माहित होतं. नाईलाजाने सुलभा तिच्याकडे फक्त बघत राहिली.
ती मुलगी आता जरा सावरलेली दिसली. सुलभाने तिचं बोलणं ऐकलं होतं हे समजल्यामुळे असेल, तिने गॉगल काढला आणि रुमालाने डोळे पुसले, डोळे रडून रडून सुजलेले दिसत होते…म्हणूनच ती गॉगल लावून आली होती…
पुन्हा गॉगल लावून ती मुलगी आता सुलभाच्या मागे उभी राहिली… बहुतेक ती आता उतरणार असावी… का माहित नाही पण ती आपल्या सोबत उतरते आहे याचं सुलभाला जरा बरं वाटलं.
बांद्रा स्टेशन आलं तेव्हा एक जरा मोठा ग्रुप चढणारा होता…नटलेल्या होत्या. बहुतेक त्या सगळ्या एखाद्या लग्नाहून परतलेल्या असाव्यात…त्यामुळे त्याचा गोंधळ होऊन, उतरतांना सुलभा थोडी मागे राहिली.
उतरल्यावर सुलभाने ती मुलगी कुठे दिसतेय का पाहिलं. पुढे चालणाऱ्या माणसांमधे ती दिसली नाही. म्हणून सुलभाने आजूबाजूला पाहिलं. तर ती तिथेच समोरच्या बेंचवर बसलेली दिसली. सुलभाला ते जरा वेगळं वाटलं…ही इथे का बसली? आईकडे काही प्रॉब्लेम असेल का? काहीबाही भलतंसलत तर नसेल ना हिच्या मनात? माझ्या आर्याच्याच वयाची आहे. तशी या वयात खरी समज कमी आणि हट्टच फार असतो. त्यात आता मनातून तुटलेली आहे. मन थाऱ्यावर नसेल तिचं…नात्याची वीण अशी उसवायला लागली की आतड्याला घट्ट पीळ पडत जातो आणि मग कोणीच आपलं वाटत नाही. सगळे परके होतात. सगळं जगणंच निरर्थक वाटायला लागतं…
तिला तसंच एकटं सोडून जावं असं सुलभाला वाटेना…काय करावं?…काहीही न ठरवता सुलभा सरळ तिच्या शेजारीच जाऊन बसली. त्या मुलीला मात्र ते कळलंही नाही. ती तिच्यातच अगदी थिजून गेल्यासारखी बसली होती.
सुलभा शेजारी बसली खरी, पण काय करायचं हे समजत नव्हतं. तिच्या लक्षात येऊ नये म्हणून सुलभा उगाचच एका दिशेने बघत राहिली. तोच तिला एक तरुण घाईघाईने तिच्याच दिशेने बघत बघत येतांना दिसला. थोडा जवळ आल्यावर कळलं तो त्या मुलीकडे पहातच येत होता.. तो तिचा नवरा असेल का?.. असं सुलभाच्या मनात येतंय न येतंय तोपर्यंत तो येऊन सरळ त्या मुलीच्या शेजारी बसला देखील.
शेजारी बसल्याबरोबर एकदम झटकन त्याने तिला जवळ घेतलं आणि “सॉरी तनु” एवढं बोलला मात्र, ती मुलगी लगेच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून गदगदून रडायलाच लागली. सुलभाने ओळखलं… आता सगळं ठीक होईल, जायला हरकत नाही… सुलभा उठली.
चालता चालता सुलभा विचार करत होती…विवाहाच्या बंधनाला कायद्याची चौकट असते खरी पण ते तोडतांना, ते टिकवायचे कोणतेही कायदेशीर नियम नसतातच कधी. ते मनाने मानलेलं बंधन असतं आणि मनाने टिकवून ठेवलं तरच राहतं. म्हणूनच संसारात खरंतर हा बॉण्डच जास्त महत्वाचा…
जिना चढताचढता सुलभाने मागे वळून त्या बेंचच्या दिशेने पाहिलं. ती दोघं आता अगदी हातात हात धरून बोरीवलीकडे जाणाऱ्या ट्रेनसाठी उभी होती. घरी जाण्यासाठीच असणार, हे सांगायची गरजच नव्हती.
सुलभाला आता खूप छान वाटत होतं. आज नकळत ती दोन मनांच्या अतूट बधंनाची एकमेव साक्षीदार झाली होती. आर्याच्या हट्टाचा आता ती वेगळया दृष्टीने विचार करु पहात होती. आर्याची वाटचालही अश्याच एका बॉन्डिंगकडे होतांना तिला पहायचं होतं. आर्याचा हट्ट वावगा नव्हता या विचारांसरशी सुलभा उत्साहाने भरभर चालू लागली.
………समाप्त .
— …..मी मानसी
Leave a Reply