चिव चिव करीत, एक चिमणी आली ।
दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली ।।
बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती ।
वाटूं लागले या चिमणीला, आंत अडकली ती ।।
उत्सुकता नि तगमग दिसे, चेहऱ्यावरी ।
चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी ।।
औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही ।
कशी करूं तिची बंधन मुक्ती, काळजी लागून राही ।।
चोंच मारीते आवाज करिते, यत्न्य केले सारे ।
श्रम होवूनी थकूनी गेली, हातीं न कांहीं उरे ।।
चिंता लागली चिंता बघूनी, या चिमणीला ।
चलबिचल ही जेवढी होती, तसेंच दिसे हिला ।।
स्वबांधवांना मदत करणे, त्यांच्या संकटी ।
पशू पक्षांतही दिसून येते, तत्वें ही मोठी ।।
चालले होते प्रयत्न निष्फळ, या चिमणीचे ।
परि जिद्द ठेवतां भान नव्हते, आपल्या देहाचे ।।
कांच पडली फूटून खालती, तडा त्यास जावूनी ।
एक आवाज तेथे घुमला, घाबरली चिमणी ।।
जरी देह झाला रक्तबंबाळ, यश चमकले तेथें ।
समजत होती चिमणी बिचारी, बंधन तोडले ते ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply