|| हरी ॐ ||
बांधकाम क्षेत्रातील काळापैसा मुद्रांक शुल्कात कपात करून रोखता येणार नाही ! तर…
माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बांधकाम क्षेत्रात येणारा काळापैसा रोखण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करणे गरजेचे आहे असे दोन दिवसापूर्वी विधान केले होते. परंतु मुद्रांक शुल्कात कपात केल्याने काळापैसा रोखता येईल म्हणणे धाडसाचे होणार तर नाहीच पण हा पर्यायही होऊ शकत नाही. मुळात काळा पैसा कसा निर्माण होतो ह्याच्या मुळाशी जाऊन त्यावर नियंत्रण व निर्बंध घालण्यासाठी काही उपाय योजना कठोरपणे अमलात आणल्या तरच काळ्या पैशाला रोखता येईल अन्यथा हे स्वप्नवत भासेल.
काळा पैसा निर्माण होण्यासाठी पुढील मुद्दे जास्त जबाबदार/महत्वाचे आहेत. १) अमर्यादित लोकसंख्या २) भ्रष्टाचार ३) सुख-समाधान ४) श्रद्धा-सबुरीचा अभाव ५) अमर्यादित गरजा, हव्यास ६) तृप्तीचा अभाव. अश्या एक ना अनेक मुद्यांचा काळा पैसा निर्माण होण्यास कसा हातभार लागतो हे वरील मुद्यांच्या आधारे क्रमश: बघणार आहोत.
१) अमर्यादित लोकसंख्या : देशातील लोकसंख्या अमर्यादित असल्याने त्यांच्या पायाभूत गरजा भागविणे सरकारला व नागरिकांना जड जात आहे. स्पर्धात्मक यूग मानवाला नकोनको ती प्रलोभने दाखवीत आहे आणि मानव त्याला बळी पडत आहे. त्यात दारिद्र, शिक्षणाचा अभाव, व अतृप्ती मानवास वेगळ्या वाट शोधण्यास भाग पाडत आहे. यातून भ्रष्टाचार व व्यभिचार बोकाळला आहे. अमर्याद लोकसंख्येमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे व त्याची दरी दिवसागणिक वाढत आहे. दुसर्याच्या पुढे जाण्यासाठी एकतर वेळ कमी आहे व थांबायला सबुरी नाही हे खरेच आहे. कारण प्रत्यक क्षण हा “कॅश” करणे क्रमप्राप्त आहे नाहीतर फायदा नाही. मग वेगवेगळे मार्ग सुचत जातात आणि भ्रष्टाचाराची शृंखला निर्माण होते आणि काळा पैसा तयार होतो.
२) भ्रष्टाचार : बांधकाम क्षेत्रात काळापैसा कसा येतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करुया. एखादी इमारत बांधायची असेल तर त्याला सतराशेसाठ परवाने लागतात व ते शासन व पालिकेतून मिळतात हे बहुश्रुत आहे. पण त्यासाठी किती डोकेदुखी व खस्ता खाव्या लागतात. पण ज्याला हे माहित आहे की खस्ता व डोकेदुखी करून घ्यायची नसेल तर काय करायचे. तर सध्या सरकार दरबारी व न्यायालयात गाजत असलेले “आदर्श” इमारतीचे उदाहरण पुरेसे आहे. काहींनी स्वतंत्र इमारत बांधताना अनुभव घेतला असेल. असो. इमारत बांधण्याचा आराखडा व इतर परवाने बांधकाम सुरु करताना मिळविण्यासाठी होणारा भ्रष्टाचारच याचे मूळ कारण आहे. यासाठी जो टेबलाखालील व्यवहार होतो तो रोख्यात पैसे देऊन होतो किंवा त्या मोबदल्यात काही वस्तू किंवा इमारतीत जागा, सोन्या-चांदीचे दाग-दागिने, मोटार किंवा आणखी काहीही…..!!! दिले जाते. यासाठी विकासकाने किंवा बिल्डरने दिलेले पैसे कोणाकडून वसूल केले जातात तर जागा घेणार्याकडून. ग्राहकाला सांगताना सांगायचे सर्व मोकळ्या जागा, लिफ्ट, गार्डन यासाठी जी जागा लागली ती बिल्ट-अप्, सुपर-बिल्ट-अप्, सुपर-सुपर-बिल्ट-अप् असे मोजमाप आहे. ग्राहक सदनिकांचे मुद्रांक शुल्क भरताना ग्राहकाला दस्तावेजातील कार्पेट एरियावरच मुद्रांक शुल्क भरावे लागते. पण याने कोठे काळा पैसा रोखता येतो हे कळले नाही ? बिल्डर दोन भाव सांगतात हे कोणाला सांगायला नको. (सफेद व काळा). मुद्रांक शुल्क हे सरकारने/शासनाने ठरवून दिलेल्या भावाने भरायचे असते. जरी बिल्डरचा जागेचा भाव काही असला तरीही. मग येथे काळ्या पैशाचा प्रश्नच कोठे आहे ?
३) सुख-समाधान : माणसागणिक सुख-समाधानाची व्याख्या निरनिराळी आहे. ज्याला कितीही मिळाले तरी सुखी व समाधानी नाही तो जास्तीत जास्त काळा पैसा जमा करण्यात स्वत:ला धन्य व मोठा समजतो व त्यापाई नाकोत्या गोष्टी करून बसतो याचे उत्तम उदहरण “२जीस्पेक्ट्रम” घोटाळा आहे. सुख कशात/कशाला मानायचे हेच कळत नाही आणि सुखाच्या शोधातभ्रष्टाचार केला जातो व काळा पैसा जमा होतो. थोड्याशाही सुखात समाधान मनात येते पण आमची व्याख्या वेगळी असते. आम्हाला लायकी पेक्षा जास्त मिळाल्याने त्याचे महत्व कळत नाही आणि त्याला आम्ही आमचा हक्क समजतो.
४) श्रद्धा व सबुरीचा अभाव : काळा पैसा जमविणार्यांची श्रद्धा फक्त पैशावरच असते. त्यात तो बेधुन्द झालेला असतो, देवाला पैशापुरता मनात असतो. आणि अशा लोकांकडे सबुरी अभावानेच असते. स्पर्धात्मक यूग असल्याने काही माणसे आपले काम कसे लवकर होईल हे बघत असतात व त्यामुळे एनकेन प्रकारेण काळा पैसा देऊन काम साध्य करतात आणि काळा पैसा तयार करण्यास हातभार लावतात. याला अर्थात सध्याची जीवन पद्धती व अमर्याद लोकसंख्या जबाबदार आहे.
५) अमर्याद गरजा आणि हव्यास : अमर्याद गरजा आणि हव्यास हे दुष्टचक्रा सारखे आहे. बाजारात पैसे मोजले की सगळ्या गोष्टी मिळतात हे माहित असल्याने गरजा ही अमर्याद झाल्या आहेत कारण काळा पैसा हातात आल्याने गरजा वाढतात आणि भ्रष्टाचाराला आमंत्रण देतात. हव्यास माणसाला हैवान बनविते. जेथे समाधान व तृप्ती नाही त्याची जागा हव्यास घेते. हव्यास हा स्पर्धेतून निर्माण होतो आणि नकोनको त्या गोष्टी करण्यास भाग पडतो. स्वत:च्या व बायको-मुलांच्या गरजा भागविण्यासाठी भ्रष्टाचार करावा लागतो मग हातात दोन पैसे येतात आणि त्यातून वाढलेल्या किंवा वाढविलेल्या गरजा भागविल्या जातात.
६) तृप्तीचा अभाव : सत्य, प्रेम व आनंद ज्याला कळले नाही, समाजले नाही, समजून घेण्याचा प्रयास केला नाही त्याला तृप्ती कधीच मिळू शकणार नाही. कारण गैर मार्गाने पैसा मिळविण्याच्या नादात कधीच सत्य बोललो नाही, कृती केली नाही आणि आचरणात तर कधीच आणली नाही. कधी कोणावर निर्व्याज प्रेम केले नाही, दिले नाही व अनुभवले नाही. ज्याच्या मुळे सर्व व्यवहार सुरळीत चालले आहेत त्या परमात्म्याला समजलो नाही तर त्याचे अकारण कारुण्य व प्रेम काय समजणार/जाणणार ? प्रेम तर अजून वेगळी व लांबची गोष्ट आहे. आमच्या तर आनंदाच्या व्याख्या वेगळ्याच असतात ज्यात मला सर्व सुख मिळाले, कीर्ती मिळाली, सर्व भोग उपभोगता आले, सगळे मित्र, नातलग, शेजारी याच्या पेक्षा श्रीमंत झालो की मला आनंद होतो. काही मनात इच्छा न धरता कोणासाठी किती उपयोगी पडलो, अनाथ, अपंगांची सेवा केली, त्यांचे दुख: समजून ते कमी करण्यास मदत केली, खरोखरच्या अनाथासाठी दान केले यात जो आनंद आहे तो कुठेही मिळणार नाही. ईश्वराच्या भक्ती व सेवेत महिन्याचे काही तास मिनिटे व्यथित केली त्या आनंदासारखे दुसरे सुख व समाधान नाही. असो.
मुद्दा हा आहे की बांधकाम क्षेत्रात काळा पैसा कसा रोखता येईल? मुख्य म्हणजे सदनिकेच्या विक्रीचे सर्व व्यवहार १००% चेक पेमेंटमध्ये होणे गरजेचे आहे. कधीकधी सदनिक हस्तांतरण समयी बिल्डर/विकासक ग्राहकाला नडतात आणि काही व्यवहार रोखीत करतात त्या शिवाय सदनिकेची चावी देत नाहीत. ते कटाकक्षाने रोखता आले पाहिजेत कारण येथेच काळ्या पैशाला जन्म मिळतो.
वरील मुद्यांचा साधक बाधक विचार करून योग्य तो निर्णय माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग घेतील अशी आशा आहे. कारण त्यांना या गोष्टी माहित नाहीत अशातील भाग नाही परंतु इच्छा शक्तीचा अभाव, चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्य, समन्वयाचा अभाव, मंत्री व सहकार्यांवर फाजील विश्वास आणि वरील विषयासंबंधित अपूरा अभ्यास असावा असे वाटते. जसे, एखादा झोपला असेल तर उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला उठवणे महा कठीण आहे !
जगदीश पटवर्धन, वझीर, बोरिवली (प.)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply