अशा आजीबाई आणि आजोबा आज बऱ्याच घरात बंदिस्त आहेत. पूर्णवेळ नोकर मिळत नाहीत, ठेवता येत नाहीत, परवडत नाहीत, मग अशा वृद्धांना घरात ठेवून, कुलूप लावून घराबाहेर पडणारे महाभाग खूप आहेत.
जिने उतरताना दुसऱ्या मजल्यावर माझे पाय थबकतात. क्षणभर थांबून मी पुढच्या पायऱ्या भरभर उतरुन रस्त्यावरील गर्दीत मिसळून जातो. त्या दुसऱ्या मजल्यापासून दूर पळून जातो. थांबल्यावर कुठेतरी एक कळ सबंध मस्तक भणभणून जाते. तर दुसऱ्या मजल्यावर काय आहे, शेजारी कोण राहतो-काय करतो याची माहिती आपल्याला नसते, तर शंभर सदस्य असलेल्या सोसायटीतील या मजल्यावर राहणारे तर माझ्या कुठे परिचयाचे आहेत. पण तरीही दुसरा मजला उतरताना वाईट वाटतच. तस रोज दुसरा मजला उतरण्याची वेळ येत नाही. लिफ्ट थांबल्यावरच लक्षात येत, आपण तळमल्यावर पोचलो. पण जिना उतरताना मात्र दुसरा मजला लागतो. त्यामुळे जिना उतरायला नको वाटतो.
असाच एकदा जिना उतरत असताना दुसऱ्या मजल्यावर आलो. कोपऱ्यात गर्दी दिसली. शेजारी- पाजारी काय झाल म्हणून विचारल. कुणीतरी किल्लीवाल्याला बोलवायला गेल होत, तर बाकी ते बाहेरच भलं मोठै कुलूप फोडायचा प्रयत्न करत होते. बाहेरच सिक्युरिटी दार उघडल होत. आत आवाजही काही येत नव्हता. बर तिथे राहणार कुटुंब लहानच. नवरा-बायको, दोन शाळेत जाणारी मुल. पण त्यांच्यापैकी तर कुणीच दिसत नव्हतं. मग हे लोक दार कशसाठी आणि कुणाला विचारुन उघडताहेत. काहीच कळायला मार्ग नव्हता. दरवाजा कसा उघडता येईल याच्याच खटपटीत सगळे होते. त्यामुळे कुणाला काही विचारायचा प्रश्नच नव्हता. आतल्या दारालाही भलं मोठ कुलूप होतं. किल्लीवाला येण्यापूर्वीच शेजाऱ्यानी दरवाजा फोडला. किल्लीवाला आला नाही, पण कॉलनीतील डॉक्टर यायला आणि दरवाजा फोडायला एकच गाठ पडली. सगळेच आत शिरले.
दरवाजाला लागूनच एक वृध्द बाई बेशुध्द अवस्थेत पडली हाती. घरातील मुलांची सत्तर वर्ष वयाची आजी असावी. गर्दी हटवली. पोरासोरांना बाहेर काढल. डॉक्टारानी तपासल आणि तत्काळ हॉस्पिटलला फोनकरुन कळवल. आणि त्या वृध्देला इस्पितळात दाखल करण्यात आल. तिला लहानसा हृदयविकाराचा झटका आलेला. वेळेवर उपचार झाले म्हणून ती वाचली.
आश्चर्य वाटल. त्या आजीबाई आत असताना बाहेर कडया-कुलप लावून घरातील मंडळी गेली कशी? कोण उत्तर देणार?
त्यांच्या शेजारचा गृहस्थ म्हणाला, पोर शाळेतत जातात. नवरा-बायको कामावर जातात. आजीबाई घरी एकटया असतात. त्यांना बरोबर दिसत नाही, ऐकू येत नाही. दाराची बेल वाजली तर दरवाजा, लॅच की वगैरे बरोबर उघडता येत नाही. बरं कोण केव्हा बेल मारुन घरात येईल याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे घरातील मंडळी कडी-कुलूप लावून जातात.
नवऱ्याचा लहानसा वर्कशॉप आहे. बायको कुठेतरी पीआरओ-जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करते. दोघंही सकाहळी बाहेर पडतात. रात्री ९ ते १० पर्यत परत येतात. पोर सकाळी शाळेत जातात, तिथूनच क्लासला, नंतर संगीत-कराटे करुन सातपर्यंत परत येतात. किल्लीने दरवाजा उघडतात, आत जातात. त्यावेळी आजीबाईंच्या जिवात जीव येतो. तोपर्यंत घरात बंदिस्त.
एकाएकी घरातून दरवाजा ठोकल्याचा आवाज पोस्टमनला आला. त्याने आजूबाजूच्या लोकांना जाग केल. दरवाजा फोडला म्हणून आजीबाई वाचल्या.
अशा आजीबाई आणि आजोबा आज बऱ्याच घरात बंदिस्त आहेत. पूर्णवेळ नोकर मिळत नाहीत, ठेवता येत नाहीत, परवडत नाही. मग अशा वृध्दांना घरात ठेवून, कुलूप लावून घराबाहेर पडणारे महाभाग खूप आहेत.
आता आतला दरवाजा उघडा असतो. जिना उतरताना जाळीतून त्या आजीबाईंची हालचाल दिसते. कधी त्या जाळीत नुसत्या बाहेर शून्यात टक लावून बघत असतात. ती नजर चुकवून मी सरळ खाली उतरुन गर्दीत मिसळून जातो. आजीबाईंची नजर दिवसाच अस्वस्थपणा देऊन जाते.
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : १४ जुलै १९९४
Leave a Reply