संकल्पनेतून प्रत्यक्षाकडे!
सर्वांच्या आग्रहामुळे मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या बांगलादेश सायकल स्वारीच्या आठवणी बाहेर काढल्या. जशा जमेल तशा त्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत. माझ्यासाठी या आठवणी खूप महत्त्वाच्या, आनंदाच्या आहेत. सर्वांनाच त्या आठवणी एवढ्या रोचक वाटतील असं नाही, त्यामुळे कंटाळवाण्या वाटत असेल सोडून द्या.
संघ शिक्षावर्गातून उगम
१९७१ मध्ये नागपूरला संघ शिक्षा वर्ग प्रथम वर्षाला मी (अनिल रामचंद्र सांबरे) गेलो. तिथे आमच्या गणात आणि राहण्याच्या खोलीत मनमोहनजी वैद्य, मेजर जनरल अच्युत देव, धनागरे महाराज अशी मंडळी होती. विश्वास इंदूरकर पण होता. त्यात महिनाभर धमाल झाली. सतरा वर्षाचे वय, डोळ्यात नवीन नवीन स्वप्न, मनात आकांक्षा, असा हा काळ होता. याच काळात विश्वासशी गट्टी जमली. वेगवेगळे बौद्धिक आणि चर्चा करता करता, स्वाभाविकपणे आधीपासून मनात असलेल्या एका विचाराने जोर पकडला. अखंड भारत यासाठी काहीतरी केले पाहिजे. किमान आपण ‘पाहिला पाहिजे’, हा तो विचार.
पूर्वानुभव
वर्ग संपला. पण मनातले विचार काही पिच्छा सोडेना, त्यातूनच आम्हाला एकमेकांच्या भेटीशिवाय चैन पडेना. विश्वासचे घर गांधीनगरला, माझं कॉलेज धरमपेठ सायन्स… त्याच वर्षी सुरू झाले. त्यामुळे जवळजवळ रोजच आमच्या भेटी व्हायच्या आणि रोजच्या भेटीमध्ये काय करायचं? कुठे जायचं? काहीतरी करायचं, आपला देश पाहायचा, असे सगळे विचार, चर्चा सतत चालत होत्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून आम्ही नागपूर-माहूर-नागपूर सायकलने जायचे ठरवले. तेव्हा माझा एक मित्र यशपाल रामावत, विश्वास आणि मी असे आम्ही तिघे जण नागपूरहून माहूरला जाऊन आलो. यशपालला इतक्या सायकलिंगचा आणि अशा प्रवासाचा काहीच अनुभव नव्हता. मी त्याला खूप उत्साह भरल्यामुळे तो आमच्यासोबत आला तर खरा, पण परतताना मात्र आम्ही त्याची अवस्था पाहून त्याला बसमध्ये चढवून दिले, त्याची सायकल बसच्या टपावर चढवली. तो नागपूरला पोहचला. इथे आल्यानंतर माहूरपर्यंत सायकलने जाऊ शकतो यावर त्याचे मित्र-नातेवाईक यापैकी कोणीही विश्वास ठेवत नव्हते.
याच्या आधी पण, मी शाखेच्या सहली सायकलने केल्या होत्या. माहूरच्या आधीचा मोठा प्रवास म्हणजे आत्ताचे पेंच धरण आहे तिथे आमची आठवी नववीत असताना सहल गेली होती. तेव्हा आम्ही ५६ जण होतो. सायकलने नागपूर हून नवेगाव आणि परत. पेंच चे काम सुरु व्हायचे होते. फक्त तिथे एक मोठं टिनाचं शेड उभारलं होतं. याशिवाय थंडीच्या दिवसात रात्री नऊ वाजता घरून निघून बाराला रामटेकच्या गडावर पोहोचणे, त्रिपुरारी पौर्णिमा करून परत सकाळी घरच्यांना कळायच्या आत परत येणे, असे पराक्रम पण करत होतोच.
अखेर बांगलादेशला जायचे ठरले
या अनुभवाच्या आधारे आम्ही ठरवलं की कुठलीतरी मोठी दूरवरची सायकल यात्रा करायची. फक्त सायकलच शक्य होती. कारण बिन पैशाचे काम. कुठे जायचं? कुठे जायचं? असं करता करता त्या सुमारासच बंगला देश प्रश्न सुरू झाला. आणि आम्ही ठरवलं की आपण बांगलादेश (पूर्व पाकिस्तान) पाहिला जायचे. साहसी सायकल यात्रा पण होईल आणि अखंड भारताचा काही भाग असलेला पूर्वीचा पूर्व बंगाल आणि नंतरचा पूर्व पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश पण पाहणं होईल. झालं… ठरलं! आम्ही बांगलादेशला जायचं ठरवलं! त्या कल्पनेने रोमांचित झालो. तेव्हापासून काही सुचेनासे झाले.
स्वाभाविक पणे मित्रांना तो विचार सांगणं सुरू झालं. पहिले अनेकांनी आमची थट्टा केली. अशक्य असं सांगितले. जाऊन दाखवाच, असंही म्हटलं! असे सगळे प्रकार झाल्यानंतरही आम्ही आमच्या विचारांवर ठाम राहिलो. तेव्हा आम्हाला वेड्यात काढणार्यांच्या, असं लक्षात आले की, हे गप्प बसणारे आणि थांबणारे नाहीत. त्याकाळात अनेकजण अतिशय रोमांचक असा हा विचार पाहून भारावले. खूप लोकांना आमचा हेवा वाटला. कितीतरी जणांनी सांगितलं की, मी पण तुमच्या सोबत येणार आणि असं करता करता किमान आठ-नऊ मित्र आम्ही येणार म्हणून पक्के तयार झाले. काही दिवसांनी पहिली भावनांची लाट ओसरल्यानंतर, आणि वास्तवाची जाणीव झाल्यानंतर त्यापैकी अनेक जण गळले. कोणाची आई नाही म्हणत होती तर कोणाचे वडील. कोणाचं काही कारणं होते पण परिणाम एकच गळणे. यादरम्यान पुन्हा अनेकांनी सोबत येतो सांगितले. अशा पार्श्वभूमीवर मला आमच्या दोघांच्याही आई-वडिलांचा मोठा अभिमान वाटतो की त्यांनी एका शब्दानेही जाऊ नकोस म्हटलं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. मुलांना काळजी आणि प्रेमापोटी मागे घेणारे तर खूप आई वडील असतात. पण त्यांची हिंमत वाढवणारे, त्यांना त्यांच्या इच्छा आणि स्वप्नांसोबत जाण्यासाठी आपल्या भावना बाजूला सारून त्यांच्यासोबत राहणारे आई-वडील कमी असतात. म्हणून मला माझ्या आई-वडिलांचा या बाबतीत विशेष अभिमान आहे.
प्रवासाची तयारी
26 मार्च पासून सुरू झालेले छुपे युद्ध काही दिवसांनी प्रत्यक्षात १६ डिसेंबरला संपले. २६ मार्च १९७१ ला बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांनी बांगलादेश स्वातंत्र्याची घोषणा केली, म्हणून हा दिवसच बांगलादेशचा स्थापना दिवस समजला जातो. गंतव्याची अनिश्चितता संपल्यामुळे आम्ही शक्य तितक्या लवकर, म्हणजे परीक्षा संपल्यानंतर लगेच जायचं ठरविल. डोक्यात याशिवाय दुसरं काही सुचत नव्हते. प्रत्यक्ष प्रवासाची तयारी करायला सुरुवात केली. काहीही माहिती नाही, नकाशाही नाही. तेव्हा पेट्रोल कंपन्यांजवळ सविस्तर नकाशे असतात, हे कळलं. ते नकाशे प्रयत्नपूर्वक मिळवले. नागपूर ते कलकत्ता या मार्गाचे नकाशे आमच्याजवळ आले. आम्हाला हायसे वाटले. मार्ग नक्की झाला नागपूर-भंडारा-रायपूर-संबलपूर करत कलकत्त्याला जायचं. तिथून पुढे कसं जायचं ते ठरवायचं, असं ही ठरविलं.
ओळखपत्र म्हणून आम्ही नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू, नागपूर पोलीस आयुक्त, नागपूर महापौर, सर्वत्र काँग्रेस असल्यामुळे काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांचे पत्र, नागपूर संघ पदाधिकारी यांचे पत्र अशी सगळी पत्रं आमच्यासोबत घेतली. घरी मोठ्या बहिणीची लेडीज सायकल होती. तिची अवस्था माझ्या सायकल पेक्षा चांगली होती. म्हणून तीच घ्यायची ठरवलं. घरून फक्त शंभर रुपये घेतले. या शंभर रुपयातून ७५ रुपयाचा एक कॅमेरा मूनलाईट मधून विकत घेतला. नागपूर ते ढाका सायकल यात्रा असे दोन बोर्ड पण रंगवून घेतले. रस्त्यात खायला मिळेल की नाही, माहिती नाही म्हणून स्वयंपाकाची तयारी पण सोबत ठेवली. डाळ-तांदूळ, छोटा स्टोव्ह, ताटवाटी, पेला, ३-४ भांडी सोबत घेतली. सायकल दुरुस्त करावी लागेल म्हणून पंक्चरचे व दुरुस्तीचे साहित्य पण घेतलं. सायकल तयार करून नवीन टायर ट्यूब बसवल्या. ज्यादा ट्यूब पण सोबत घेतल्या.
२४ एप्रिलला माझी परीक्षा संपत असल्यामुळे २५ एप्रिलला सकाळी निघायचे ठरले. फक्त आणि फक्त सायकल यात्रा डोक्यात असल्यामुळे त्याचा निकालावर जो परिणाम व्हायचा तो शेवटी झालाच.
प्रवासाचा दिवस उगवला
प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडेपर्यंत एकेक करत बाकीचे पण गळाले, आणि आम्ही दोघंच उरलो. सर्वांना तो आश्चर्याचा मोठा धक्का होता, की दोघंच मुलं जाणार. २४ ला रात्री मी विश्वास कडे गेलो आणि त्याला सांगितलं उद्या तू नाही आलास, तर मी एकटा जाईन. आणि मी नाही आलो तर तू एकटेच जायचं, पण जायचं हे मात्र नक्की, अशी मनाची तयारी करून त्याचा निरोप घेतला. आणि 25 ला सकाळी आठ वाजता झाशी राणी चौकात जिथे साल्पेकर पेट्रोल पंप आहे तिथे जमायचं, असं ठरवलं.
वेळ आली होती की, जातो जातो म्हणतात, पण प्रत्यक्षात जातात की नाही? कारण बोलणं सोपं असतं आणि प्रत्यक्ष करणं कठीण असतं. लोकांना असं वाटणं हे स्वाभाविक होतं. आम्ही तर जाणारच, असं ठासून सांगितल्यामुळे एक प्रकारे तो आमच्या इज्जतीचाही प्रश्न तयार झाला होता. काही लोक मात्र हे दोघे जातीलच, हे समजून त्यांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यातून आमच्याबद्दलचा विश्वास, प्रेम आणि कौतुक आम्हाला दिसत होते. अखेर जाण्याचा दिवस २५ एप्रिल हा उजाडला. सकाळी ८ वाजता झाशी राणी चौकात पेट्रोल पंप जवळ विश्वास गांधीनगर हून अन् मी रामदासपेठेतून पोहोचलो. शाखेचे मित्र, कॉलेजचे मित्र, नातेवाईक, घरची मंडळी असे सगळे लोक आम्हाला तिथे निरोप द्यायला जमले. ठरल्याप्रमाणे तेव्हाचे जनसंघाचे नेते आणि नगरसेवक नानाजी शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला निरोप देत सर्वांनी कौतुक केले आणि प्रदीर्घ साहसी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आमच्या सोबत दहा-बारा जिवाभावाचे मित्र भंडारा रोड, पारडी पर्यंत म्हणजे नागपूरच्या वेशीपर्यंत पर्यंत आम्हाला सोडायला आले. निरोप घेतांना सर्वांचेच डोळे पाणावले. पण तसे न दाखविता आम्ही त्यांचा उत्साहाने निरोप घेतला. इतके दिवस डोक्यात असलेला प्रवासाचा विचार प्रत्यक्षात सुरू होण्याची वेळ आली. आणि तिथून पुढे आमचा दोघांचाच प्रवास सुरू झाला. नागपूरकडे पाठ करून ढाक्याच्या दिशेने आम्ही निघालो. स्वप्नांचा हायवेकरून प्रत्यक्षात उतरून प्रवास सुरू झाला…
–अनिल सांबरे
9225210130
क्रमशः
Leave a Reply