MENU
नवीन लेखन...

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ५

भारतीय दूतावासाचा कटू अनुभव

ढाक्याला पोहचल्यावर राहायचं कुठे हा पहिला प्रश्नच होता. ढाक्याचे मुख्य पोलीस स्टेशन म्हणजे रमणा पोलिस स्टेशन. त्याच्या प्रमुखांची आमची भेट/दोस्ती झाली. त्याचा खूप आग्रह, की तुम्ही इकडे तिकडे न राहता माझ्याच घरी राहा. नाही तर पोलीस स्टेशनमध्ये पण आमची राहायची वेगळी व्यवस्था असते, तिथे तुम्ही राहा. आम्हाला असं वाटत होतं की इथे भारतीय दूतावास आहे, भारतीयांची जबाबदारी भारतीय दूतावासाने घेऊन त्यांची व्यवस्था केली पाहिजे. ती नाकारून आम्ही दुसरी व्यवस्था करणे म्हणजे भारतीय दूतावासाचा अपमान आहे. आम्ही त्याला इथे आमचा भारतीय दूतावास आहे, ते आमची काळजी करेल, तुम्ही चिंता करू नका, असं त्याला जोशात सांगितले. भारतीय दूतावासाला कुलूप होते म्हणून मग रमणा पोलिस स्टेशनमध्येच मुक्काम केला. दुसर्या दिवशी पुन्हा भारतीय दूतावासाच्या अधिकार्यांकडे गेलो. त्या अधिकार्यांची प्रतिक्रिया एकदम थंड होती. ते आमच्यासाठी काहीच करायला तयार नव्हते आणि आम्ही अडून बसलो होतो की त्यांनी आमची व्यवस्था करावी. मोठ्या मुश्किलीने त्यांनी त्यांचे बंद असलेलं एक कार्यालय होतं तिथे तुम्ही राहू शकता, असे सांगितलं. आम्ही तिथे गेलो तर तेथे एकच रूम होती आतमध्ये इतके ठासून भंगार फर्निचर भरलं होतं की त्या खोलीचा दरवाजाही पूर्ण उघडत नव्हता. झोपणे तर शक्यच नव्हतं, तिथे फक्त बॅग आम्ही त्या बेंचवर ठेवू शकलो. तिथे रात्री एक जीप मुक्कामाला यायची. आम्ही ढाक्यात नऊ दिवस होतो तर त्यापैकी काही दिवस ढाक्यामध्ये त्या जीपमध्ये झोपून आम्ही काढले. बाकी काही दिवस रमणा पोलिस स्टेशनमध्ये. जीपमध्ये कधी विश्वास समोरच्या सीटवर झोपायचा व मी मागे झोपायचं, तर कधी विश्वास मागे व मी समोर झोपायचं. खरं म्हणजे आम्ही सहज दुसरीकडे आरामात राहू शकलो असतो, पण देशाच्या इज्जतीसाठी आम्ही तो त्रास सहन केला. अर्थात दूतावासाच्या लोकांना त्याचं काही सोयर सुतक नव्हतं. मोदी काळाच्या आधी सर्वांनाच भारतीय दूतावासाचा असा अनुभव यायचा, असं नंतर वाचून कळलं. आमचा पहिलाच अनुभव होता आणि त्याचा मोठा मानसिक धक्का आम्हाला बसला.

रमणा पोलिस स्टेशनची मदत

ढाक्यामध्ये आम्ही ढाकेश्वरीचे मंदिर पहिलं, दर्शन घेतलं. राजधानीचे शहर असल्यामुळे मोठं शहर आणि बांगलादेश मध्ये सर्वात मोठं शहर ढाका. एक दिवस सकाळी आम्ही कुठेतरी जात असताना एका चौकात विश्वासच्या सायकलची दुसर्या सायकल वाल्याची टक्कर झाली आणि त्याची सायकल मोडली. पाहता पाहता खूप लोक जमा झाले. तो आमचा हात धरून बसला, की माझी सायकल मला भरून द्या! तुम्हाला मी तसा जाऊ देणार नाही. मला रमणा पोलिस स्टेशनच्या प्रमुखाची मला आठवण झाली. वातावरण पाहून विश्वासला म्हटलं तू इथे थांब मी लगेच रमणा पोलीस स्टेशन मध्ये गेलो, त्याला सगळी स्टोरी सांगितली. त्यांनी लगेच आपल्या पोलिसांना सांगितलं गाडी काढा. स्टेनगन घेतलेले पोलिस उभे झाले. गाडीत मी सोबत होतो आणि आम्ही चौकामध्ये पोहोचलो. आत्तापर्यंत खूप टरटर बाजी करणारे होते त्यांच्यावर पोलिसांनी आपल्या स्टेनगन रोखल्या. तेव्हा तो माणूस निघून गेला व आमची त्या प्रसंगातून सुटका झाली. मग तिथून त्याच्यासोबत त्यादिवशी आम्ही त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो.

पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान भेट

ढाक्यात आल्यावर सर्वात जास्त उत्सुकता होती ती बांगलादेशाचे नवीन पंतप्रधान आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा जिंकला गेला ते शेख मुजीबुर रहमान यांना भेटण्याची. बंगबंधू म्हणून ते प्रसिद्ध होते. गणभुवन हे पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान होते. धनमंडी हा ढाक्यातील सर्वात पॉश एरिया. सर्व महत्त्वाची माणसं तिथेच राहायचे. मुजीबुर रहमान यांचे घर पण ३२, धनमंडी या पत्त्यावर होतं आणि ‘आमार सोनार बांगला’ हे राष्ट्रगीत ज्यांनी लिहिलं ते महान कवी काझी नजरूल इस्लाम यांचे पण घर धनमंडीतच होतं. १५ ऑगस्ट ७५ ला त्यांची कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. सर्व महत्त्वाचे अॅक्टर्स, श्रीमंत लोक तेथेच राहायचे. एका वेडावाकड्या तलावाच्या भोवताल हा सुरेख भाग होता.

आम्हाला मुजीबुर रहमान यांचे पहिले दर्शन झालं ते एका कुठल्यातरी कार्यक्रमात! ते व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला कोणी जवळ जाऊ नये म्हणून बॉडीगार्ड होते. संबंधिताशी आम्ही बोललो. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी भेटायला वेळ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घरी ३२ धनमंडी या पत्त्यावर गेलो. तो दोन मजली बंगला होता. सकाळी त्यांच्यासोबत चहा घेतला. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. अतिशय प्रसन्न सहृदय आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. इतका साधा प्रेमळ माणूस अशा लढ्याचे नेतृत्व करू शकतो? यावर विश्वास बसत नव्हता. पण ते सत्य होतं.

काझी नजरूल इस्लाम यांच्या पण घरी आम्ही जाऊन त्यांचे दर्शन घेतलं. अर्थात त्यांच्याशी फार चर्चा करावी, असे आमचे वय नव्हते आणि स्वभावही नव्हता. एकच गोष्ट झाली की त्या या दोघांसोबत आमचा कुठलाही फोटो आम्ही काढू शकलो नाही, याची हळहळ कायम वाटत राहिली. या अनुभवापासून शहाणे होऊन तेव्हाचे परराष्ट्रमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बंगल्यावर त्यांनी आम्हाला जेव्हा भेटायला बोलावलं. तेव्हा तिथे मात्र त्यांच्यासोबत आमचा फोटो निघाला आहे. त्यांच्या बंगल्याच्या पार्श्वभूमीवर अन्नमंत्री फणीभूषंण मुजुमदार, अर्थमंत्री ताजुद्दीन अहमद आदि विविध मंत्र्यांच्या आमच्या भेटी झाल्या.

राष्ट्रपतींचे ग्रिटींग कार्ड

बांगलादेशचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष यांना भेटायला राष्ट्रपती भवनात गेलो पण त्या वेळेला ते तिथे नव्हते, त्यामुळे त्यांची आमची भेट नाही झाली. आणि आम्ही तिथे रजिस्टरमध्ये आमचं नाव, गाव लिहून ठेवले आश्चर्याची गोष्ट म्हणजे नंतर नागपूरच्या पत्त्यावर त्यांचे आम्हाला एक ग्रीटिंग कार्ड आले. आम्ही नागपूरला आल्यावर आम्हाला ते मिळालं ते अजूनही जपून ठेवलेले आहे.

भारतातून येणारे प्रवासी किंवा पर्यटक हे साधारण जेस्सारला येऊन परत जायचे. जास्तीत जास्त कोणी ढाक्याला यायचे. आणि एक-दोन औपचारिक भेटी करून निघून जायचे! आम्ही दोघे पर्यटक मात्र असे होतो की जे बांगलादेशच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आले. प्रत्येक क्षेत्रात सहभाग घेतला. बांगलादेशात सर्व महत्त्वाच्या रेडिओ स्टेशन वरून भाषण केलं. कॉलेज विद्यार्थ्यांची निवडणुकीच्या रॅली होत, त्याच्यात आम्ही सहभागी झालो. तिथे असे कुठलेही क्षेत्र आम्ही ठेवलं नाही की जे आम्ही जवळून पाहिले नाही. सेक्रेटरीएट व ढाका विश्वविद्यालयाला पण आम्ही भेट दिली. ढाका विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघाची निवडणूक तेव्हा सुरू होती. त्याच्या दोन रॅलींमध्ये पण आम्ही सहभागी झालो.

बांगलादेशी धमेंद्र अभिनेता

असाच एक अनुभव ढाका रेडिओ स्टेशन वर आम्ही गेलो. तेथे दोघे दिसले त्यापैकी एकाचा चेहरा ओळखीचा वाटला. ‘जीवन मृत्यु’ या सिनेमामधील हिरोच्या चेहर्या सारखा होता. त्यात त्यांनी धर्मेंद्रचे काम केलं होतं. आम्ही त्यांच्याशी परिचय करून घेतला आणि तो कार्यक्रमाच्या गडबडीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला कार्ड दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बंगल्यावर भेटायला बोलवले. सकाळी आम्ही त्या पत्त्यावर त्याच्या बंगल्यावर भेटायला गेलो आणि मग त्याच्यासोबत एक अजून एक संगीतकार आणि एक कलाकार हे दोघे जण तिथे सोप्यावर झोपलेले होते आम्ही गेल्यावर ते उठले आणि त्यांच्यासोबत गप्पा, चहा नाश्ता असे करून बाहेर पडलो. ढाक्यातील भेटीगाठी आटोपून आम्ही आता पुढे चितगावला जायचे ठरवले.

चितगाव

चितगाव येथे मोठे सीपोर्ट आहे. ते आम्ही पाहिले. प्रमुख राजकीय पक्ष असणार्या अवामी लीगच्या राष्ट्रीय नेत्यांचे पत्र आमच्या जवळ होतं. ते पत्र आणि त्याकाळी काही माणसांची नावेही दिली होती. चितगावमध्ये आवामी नेता हन्नान याने प्रसिद्ध हॉटेल सफिनामध्ये आमची व्यवस्था केली. आणि हॉटेल मालकाला सांगितलं की त्याने आमच्याकडे बिलकुल पैसे मागायचे नाही? त्याने एक-दोन दिवस चांगली सर्विस दिली नंतर त्याला वाटलं फुकटच या लोकांना काय सर्विस द्यायची? म्हणून मग तो जरा कचकच करायला लागला. आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही जो अवामी लीगचा नेता होता त्याला सांगितलं की, तुम्ही व्यवस्था केली पण हा माणूस असा करतोय. लगेच तो हॉटेलमध्ये आला. त्यांने मालकाला खूप धमकावलं, “तुला इथे हॉटेल चालवायचे की नाही? चालवायचं असेल तर नीट राहा आणि यांना काही त्रास देऊ नको. त्यानंतर हॉटेल वाला एकदम सरळ झाला. आम्ही असेपर्यंत तो एक वेटर आमच्या खोलीच्या बाहेरच उभा ठेवायचा. काही लागलं तर ते लगेच आणून द्यायचा. जवळच रंगामाटी जिल्ह्यात ४० मैल लांब वेडावाकडा पसरलेला कप्ताई लेक हा बांगलादेशामधील सर्वात मोठा तलाव आहे, तोही आम्ही पाहिला.

हॉटेलमध्ये चिकन/मटण सोबत फोडणीचे वरण पण त्याच्यासोबत आणून द्यायची तिकडे पद्धत होती. आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्याला म्हटलं तू फक्त फोडणीचं वरण आणि गरम गरम भात आण. कारण मासांहार खाऊन आम्ही इतके कंटाळलो होतो. चितगाव रेडिओ स्टेशन वरही आमचं अनुभव कथन झालं. चितगाव आटोपून आम्ही अजून खालच्या दिशेने म्हणजे जो बांगलादेशचा चिंचोळा भाग आहे, जो ब्रह्मदेश कडे समुद्राला जाऊन मिळतो. ते एक टोक त्याला म्हणतात कॉक्स बाजार, तिकडे जायचं ठरवलं. कॉक्स बाजाराचे वैशिष्ट्य असं की जवळजवळ ९० किलोमीटरचा सगळ्यात लांब सुरेख समुद्रकिनारा आहे, संपूर्ण बंगालच खूप खूप पाहण्यासारखा आहे. तितक्या दूर तिथे पण एक हिंदू मारवाडी माणूस व्यवसाय करीत होता. त्या मारवाडी माणसाने आमचे स्वागत केलं. गंमत म्हणजे त्याच्या खोलीत पंधरा फूट लांब मच्छरदाणी होती. इतकी लांब मच्छरदाणी आम्ही पहिल्यांदाच पाहिली.

ब्रह्मदेशातही प्रवेश

टेकनाफ हे बांगलादेशचे ब्रह्मदेश बाजूचे शेवटचे टोक. तिथपर्यंत आम्ही आलो. कॉक्स बाजार च्या पुढे एक नदी समुद्राला मिळते. नदी पार केली की ब्रम्हदेश (मॅनमार) आहे. आम्ही आमच्या सायकली तिथेच ठेवल्या आणि एका छोट्या होडीतून ती नदी पार करुन ब्रह्मदेशात गेलो. ब्रह्मदेशाच्या काठावरचे छोटंसं खेडं होतं. त्या खेड्यांमध्ये ब्रह्मदेशाच्या भूमीला पाय लावले. तिथे आम्ही चहा घेतला. ब्रह्मदेशात येऊन गेलो, हे समाधान घेऊन तिथून आम्ही १/२ तास थांबून परत आलो आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो.

टंगाईलची सुप्रसिद्ध बंगाली मिठाई

या प्रवासात संपूर्ण बंगलादेशात बंगाली मिठाईसाठी प्रसिद्ध असलेले टंगाईल गाव. कोमिल्ला मार्गे आम्ही टंगाईलला येऊन पोहचलो. या जिल्ह्यात दोन मोठ्या व्यक्तींची आमची भेट झाली होती. त्यातील एक होता मुस्लिम लीगचा नेता मौलाना भाशानी. आम्ही बंगाल पाहात पाहात टंगाईल जिल्ह्यात आलो. या गावाच वैशिष्ट्य असं की बंगलादेशमध्ये बंगालच्या सुप्रसिद्ध मिठाईसाठी हे गाव प्रसिद्ध. मोठं मार्केट आहे. नागपूरला आनंद भंडारामध्ये मिठाई खायचो तेव्हा खिशात पैसे किती आहे? त्या पैशात कोणती मिठाई येऊ शकते याचा विचार करून सर्वात स्वस्त मिठाई आपण खाणार. आम्ही दोन दिवस त्याठिकाणी मुक्कामाला होतो. मुक्ती वाहिनी चा अधिकारी होता त्याचं नाव होतं मन्नान! तो या मार्केटमध्ये आम्हाला घेऊन गेला आणि सगळ्या मार्केटच्या दुकानदारांना त्यांने सांगितलं की आपला बांगलादेश पाहायला इतक्या दुरून ही दोन मुलं सायकलने आली आहेत. त्यामुळे हे जेवढी मिठाई खातील तेवढी यांना खाऊ द्या. कोणीही यांना एक पैसाही मागायचा नाही. त्यामुळे आम्हाला मोकळं रान मिळालं. महागातील महाग मिठाई पाहिजे तेवढी आम्ही सकाळ-संध्याकाळ पोटभर खाण्याचा आनंद लुटला.

मौलाना भाशानी भेट

टंगाईल पासून काहीच किलोमीटर अंतरावर एका खेड्यांमध्ये हा मुस्लिम लीगचा नेता मौलाना भाशानी रहायचा. तो फाळणीच्या वेळेला सक्रीय होता. आम्ही त्याला भेटायला गेलो. त्यांच्या शेतामध्ये आम्ही त्याच्या घरी भेटलो. त्याने फणस गर बंगाली भाषेत कठहल देऊन आमचे स्वागत केले. तसा तो नेता आता नवीन बांगलादेशमध्ये कमी महत्त्वाचा झाला होता पण आधीच्या काळामध्ये त्याचा जास्त मोठा रोल होता म्हणून आम्ही ठरवलं होतं की याची पण भेट घ्यायची. आमच्याशी तो अर्थातच खूप चांगला वागला. फाळणी/मुस्लिम लीग अशा प्रतिमा आमच्या मनात होत्याच.

— अनिल सांबरे

9225210130

(क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..