नवीन लेखन...

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ६

मुक्ता वाहिनी नेता बाघा सिद्दिकी भेट

बांगलादेश स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं त्यापूर्वीच एक मुक्ती वाहिनी स्थापन करण्यात आली होती. मुक्ती सेना आणि भारतीय सैन्याने या मुक्ती वाहिनीच्या सगळ्या सैनिकांना प्रशिक्षित केलं. आपले नागपूरचे कर्नल अभय पटवर्धन यांनी पण त्यावेळेला त्यांना प्रशिक्षण दिले होते मुक्ती वाहिनी आणि त्याला भारतीय सैनिक सैन्याची साथ या दोघांनी मिळून स्वतंत्र बांगला देश दृष्टिपथात आणलं. अर्थात तो एक मोठा स्वतंत्र विषय आहे. कर्नल अभय पटवर्धन यांनी त्याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक पण लिहिले आहे आणि नचिकेत प्रकाशनाने नंतर प्रसिद्ध केलं आहे. अशा मुक्ती बाहिनी (वाहिनी) प्रसिद्ध नेता बागा सिद्दिकी किंवा टायगर सिद्दिकी अब्दुल कादीर सिद्दीकी म्हणून तो प्रसिद्ध होता. (श्रीलंकेचा तामिळ नेता प्रभाकरनप्रमाणे) तो फक्त २७ वर्षांचा तरुण होता. इतिहास शिकतानाच मुक्ती बाहिनीचा नेता बनला. त्यावेळच्या बांगलादेशामध्ये त्याची जबरदस्त क्रेझ व पावर होती. तेव्हा त्याच्या हाताखाली सतरा हजार तरूणांची सेना होती. शासनामध्ये कुठल्या पदावर नव्हता. पण प्रचंड दबदबा होता. सगळं शासन त्याच्यासाठी खुलं होतं. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचे दरवाजे त्याच्यासाठी कायम खुले होते. १६ डिसेंबरला भारतीय सैन्यासोबत त्याच्या नेतृत्त्वाखाली मुक्त वाहिनीन ढाक्यात प्रवेश केला होता. बंगवीर म्हणून तो प्रसिद्ध होता. मुजिबुर रहमान यांच्या कैवारी असल्यामुळे त्यांच्या हत्येनंतर अनेक वर्षे भूमिगत होता. मग पुन्हा बांगलादेशात परतला. खासदार पण झाला. त्याला मोठा बंगला दिला होता, खर्चाला भरपूर पैसे दिले होते आणि त्या बंगल्यामध्ये त्याच्यासोबत जे काही मोजके सहकारी राहायचे. त्याच बंगल्यात आम्ही त्याच्यासोबत तिथे तीन-चार दिवस होतो. टीव्ही मी पहिल्यांदा तिथेच पहिला. भारताचे आधी पाकिस्तानमध्ये टीव्ही आले होते आणि हे लुटलेले टीव्ही पण त्यांच्याजवळ होते. हा दिसायला खूप नाजूक होता, कुरळे केस आणि लहानशी दाढी रंगाने गोरा. आमच्या खूप अनौपचारिक गप्पा व्हायच्या. आम्ही सोबतच जेवायचे. सिनेमात दाखवतात, तसे सगळे गोरिला वॉरियर्स आजुबाजूला असायचे. खुल्या जीपमध्ये रायफल/स्टेनगनधारी मन्नान व आम्ही त्यांच्यासोबत गावभर हिंडायचो. कोणत्याही चौकातून आम्ही गेलो की पोलीस सॅल्युट मारायचे.

कोणतेही शस्त्र माझ्याकडून भेट घ्या!

एक दिवस टायगर सिद्दीकी म्हणाला, आज तुम्हाला मी शस्त्रे दाखवतो आणि त्यांने एक अलमारी उघडली. अलमारी मध्ये सगळी शस्त्रे ठासून भरलेली होती. रायफल/स्टेनगन/रिवाल्व्हर तेथे होते. तो म्हणाला, “यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते शस्त्र उचला आणि सोबत घेऊन जा, माझी भेट म्हणून.” आमच्यासाठी तो मोठा धक्का होता त्याला आता काय उत्तर द्यायचं? आणि भारतात नेऊन तरी काय करणार? असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये येऊन गेले. आपण काय म्हटलं की काय प्रतिक्रिया उमटेल? हाही दुसरा प्रश्न होता, थोडा विचार करून आम्ही त्याला म्हटलं की, “आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही शस्त्र घेऊन काय करू? आम्हाला काहीच उपयोग नाही, त्यामुळे शस्त्र तुमच्याजवळच राहू द्या. आम्हाला तुमची दोस्ती हीच खूप महत्वाची वाटते.” आमच्या या उत्तरावर तो अजूनच खूश झाला आणि त्यांनी आम्हाला एक प्रकारे शाब्बासकी दिली. तो म्हणाला की तुमच्या सारखे भारतीय पर्यटक मला भेटले नाही, तुम्ही जसे बंगालमध्ये आत पर्यंत सर्वदूर फिरले आहेत, तसे कोणीही प्रवासी किंवा पर्यटक मी आतापर्यंत पाहिलेले नाही.

साधारणपणे मोठे मुसलमान किंवा अधिकारी माणसांनाही टायगर सिद्धीकी आपल्या घरी जेवण करायला घरी बोलवत नसे. ऑफीसमध्येच सगळे भेटत. पण तो आमच्यावर इतका खुश होता की, तो म्हणाला, “माझ्या घरी जेवायला चला.” त्याचं घर वेगळे होतं. राहायचा इथे बंगला होता, सरकारने दिलेले भरपूर पैसे होते अमर्याद सत्ता होती. आम्ही त्याच्यासोबत त्याच्या घरी जेवायला गेलो. त्यांच्या आईने स्वयंपाक केला. बहिणीने आम्हाला वाढले. त्याच्या घरात खाली बसून आम्ही तिघे जेवलो. इतके आमचे त्यांचे अंतरंग संबंध तयार झालेले होते, हे सांगितलं तर कोणाला खोटं वाटेल पण मुक्ती वाहिनीच्या सर्वोच्च नेत्यांच्या घरी जेवलेले कदाचित देशभरातले आम्ही दोघेच असू. नंतरच्या पन्नास वर्षांमध्ये कोणत्याही बंगाली माणसांची ओळख झाल्यानंतर, त्याचं गाव त्यांनी पूर्व बंगालचे जर सांगितले तर माझ्या असे लक्षात आले की बंगालमध्ये जेवढे आत मध्ये गेलेले, फिरलेलं आमच्या शिवाय दुसरे कोणी पण नाही. त्यांना त्यांच्या जन्मजिल्ह्यात जाऊन आल्याचे सांगितल्यावर या बंगाली माणसांना आमच्याबद्दल वेगळेच प्रेम वाटायचे. अप्रूप वाटायचे.

सिनेमा जीवावर बेतला!

मुक्कामात, एक दिवस संध्याकाळचा सिनेमा पाहण्यासाठी आम्ही विश्वास आणि मी गेलो. तिकीटाचा काही प्रश्न नव्हता. आम्ही बाल्कनीमध्ये बसलो होतो. इंटरव्हलमध्ये आळस देण्यासाठी विश्वासने हात वरती करताच वरच्या पंख्याला हात लागला, थोडा कापला. आपल्याला लोखंड लागलेय, पुन्हा त्याचे काही होऊ नये म्हणून डॉक्टरकडे जाऊन त्याने इंजेक्शन घेतले. या वेळेला पाऊस सुरू झाला होता. एटीएसच्या इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन येते की नाही? हे विश्वासला माहीत नव्हते आणि मलाही माहित नव्हते. आणि कपाऊंडरनेसुद्धा रिअ‍ॅक्शन साठी छोटा डोस देऊन वाट पाहणं असं न करता पूर्ण इंजेक्शन देऊन टाकले. आम्ही घरी आलो, तोपर्यंत पाऊस मुसळधार सुरू झाला होता. घरी येत नाही तोच विश्वासला त्याची रिअ‍ॅक्शन सुरू झाली. पाहाता पाहाता अंगावर पित्त उमटले आणि प्रचंड खाज सुरू झाली. करता करता त्याचे प्रमाण प्रचंड वाढत गेले विश्वासचे सर्व अंग सुजले, चेहरा सुजला आणि त्याला दिसेनासं झालं. त्याने अंगावरचे सर्व कपडे काढून टाकले इतकी प्रचंड खाज होती. तोपर्यंत या धावपळीत ही सगळी मंडळी धावून आली. त्यांना काय झाले हे कसे सांगायचे? काय उपचार करायचा? हा प्रश्नच होता. अखेर भर पावसात आम्ही त्याला रिक्षामध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेले.

विश्वास रडायला लागला!

रस्त्यात विश्वास रडायला लागला. तो आईला माई म्हणायचा. माई माई मला दिसत नाही असे ओरडायला लागला. तो घाबरून गेला. त्याला दिसेनासे झाल्यामुळे मी पण घाबरलो. त्यांनी हॉस्पिटलमध्ये प्रायॉरिटी/स्पेशल केस म्हणून, एक जर्मन कंपनीचे औषध होते ते इंजेक्शन देऊन तिथेच त्याला ऍडमिट केले. एका दिवसांनी त्याला दिसायला लागलं आणि आमचा जीव भांड्यात पडला. दोन दिवस राहिल्यानंतर मग डॉक्टरने तुम्ही आता घरी जाऊ शकता सांगितले. पण ते म्हणाले की, ‘हे समूळ नष्ट झालेलं नाही’ या नंतर त्याचा त्रास काही महिने भोगावा लागला. इतक्या दूर, जवळ कोणी नाही, जीवावर बेतलं होतं टायगर सिद्धीकीची माणसं नसती तर कदाचित जर्मन ट्रीटमेंट त्याला मिळाली नसती, आणि काय झालं असतं? कल्पना आजही करवत नाही.

धडकबाज मुक्ती सैनिक

या सगळ्या मुक्ती सैनिकांची अजून एक गंमत. ते सगळेजण अत्यंत पक्के होते. डोक्यानी भिंतीला धडक द्यायचे. शत्रूंनी पकडून कितीही छळ केला, तरी काही होणार नाही, असे ते कठोर आणि पक्के होते. तर एक दिवस त्यापैकी एक मला म्हणाला, “चला आपण डोक्याची टक्कर करू. तू मला टक्कर मार, मी तुला मारेन.” त्याच्या सोबत आपण काय टक्कर घेणार? मग मी विचार केला नाही म्हणणे तेव्हा चांगले दिसणार नाही. त्याला म्हटले डोके नाही आपण छातीवर मारणे करू. तू माझ्या छातीवर मार मी तुझ्या छातीवर मारेन. त्याला तयार झाला आणि प्रसंग निभावला. अशाप्रकारे मी डोके वापरले. असे खूप छान दिवस गेले ते. असो त्याचा निरोप घेऊन तिथून आम्ही पुढे निघालो.

जगन्नाथ बाडी जीर्णोद्धार

तिथे जगन्नाथाचे मंदिर होते त्याची पडझड झाली होती. सरकारने जीर्णोद्धार केला होता म्हणून ते मंदिर पाहायला आम्ही तिथे गेलो. मंदिराचा जीर्णोद्धार व्यवस्थित होता. त्यावेळी अशा काही मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. बांगलादेशमध्ये एक मोठं सरोवर आहे जे खूप वेडेवाकडं पसरलयं. ते पाहण्यासाठी पण आम्ही मुद्दामच गेलो. बहुतेक ते सिल्लोड जिल्ह्यामधील माधवपूर लेक आहे. संपूर्ण जगात ज्यूट प्रोडक्शन पैकी ८० टक्के ज्युट भारत-बांगलादेश मिळून होतं. त्यापैकी मोठ्या प्रमाणात बांगलादेशात होते आणि त्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूला लागूनच पूर्ण हिरवळ असं बंगालचे चित्र असतं. बंगालची जमीन सुपीक आहे. निसर्गरम्य वातावरण सर्वत्र असतं. सभोवताल हिरवे गार वातावरण, प्रसन्न हवा.

असेच एकदा आम्ही जात असताना जोराचा वारा सुरू झाला आणि तरी आम्ही आपली सायकल रेटत होतो. पण शेवटी वारा असा जोरात आला की, सायकलचे समोरचे चाक वार्याच्या झोताने आडवे केले तेव्हा मात्र आम्ही सायकलवरून उतरलो आणि थोडावेळ थांबलो.

राजशाही

राजशाही येथील विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेज पाहिले. तिथले आंबे फार प्रसिद्ध आहेत. इथे एक हॉल आहे. तिथे पाकिस्तानी सैन्याने खूप लोकांना कोंडून प्रचंड अत्याचार केले. प्रत्येक घरी कोणी तरी गेला वा जखमी झाला. राजशाही येथेच एक तरूण आमचा चांगला मित्र झाला. आम्हाला एकमेकांबद्दल इतकी दोस्ती वाटली की आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन आमच्या तिघांचा फोटो काढून घेतला. आयुष्यात पुन्हा नक्की भेटू, असा शब्द पण एकमेकांना दिला.

–अनिल सांबरे

9225210130

(क्रमशः)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..