सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.
गाभार्यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.
मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.
या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.
जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.
सौ. मीनल कुलकर्णी
7249822096
Leave a Reply