मूळचे अमरावतीचे असलेले बापू लिमये यांनी गेली सहा दशके मराठी हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर रंगकर्मी, नेपथ्य आरेखन, रचना करण्याचे काम केले. कारकिर्दीच्या सुरूवातीला त्यांनी मध्य रेल्वेत महसूल विभागात हिंदी अधीक्षक म्हणून नोकरी केली. नोकरी निमित्तच ते अमरावतीहून मुंबईला आले. त्यानंतर ते कल्याणमध्ये स्थायिक झाले.
साधे सुती कपडे आणि खांद्याला झोळी अशा अवतारातले बापू जिथे नाटक असेल तिथे जात आणि चाललेल्या गोष्टींचे बारीक अवलोकन करत. ते फार बोलत नसत, परंतु सर्वत्र असत. नव्या रंगकर्मींची राज्य नाट्य स्पर्धेतली नाटके न चुकता बघत. त्यांना सूचना करत. त्यांनी नाटकाच्या दिग्दर्शनापासून अभिनय आणि नेपथ्य-प्रकाश योजनादी तंत्रांच्या हाताळणी पर्यंत सर्व घटकांत रस घेतला. पण नेपथ्यरचनेत ते विशेष रमले. १९६० ते १९७५ ह्या काळात त्यांनी रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून आपला ठसा उमटवला. हा काळ मराठीतील राज्य नाट्य स्पर्धांचा बहराचा काळ होता. याच काळात हौशी रंगभूमीवर अनेकानेक प्रयोग झाले आणि प्रायोगिक रंगभूमीने बाळसे घेतले.
जेव्हा डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक दिग्दर्शित करत होते. त्यांनी बापूंकडे या नाटकाच्या नेपथ्याची धुरा सोपवली. ‘गिधाडे’ हे तसे उग्र प्रकृतीचे नाटक. तेंडुलकरांनी त्यात माणसांमधल्या गिधाडांचे दर्शन घडवले होते. बापू लिमयेंनी नाटकातील हिंसक प्रवृत्तीच्या माणसांच्या घरालाच गिधाडांच्या ढोलीचा आकार दिला. घरातील फर्निचर हे ओबड धोबड, वृक्षांच्या कापलेल्या ओंडक्यांप्रमाणे होते. नेपथ्यातला रासवटपणा नाटकाची प्रकृती अधोरेखित करील हे त्यांनी पाहिले. त्यांचे हे अतिवास्तववादी नेपथ्य त्याकाळात खूप गाजले. ‘गिधाडे’ या नाटकाने त्यांना नेपथ्यकार म्हणून ओळखले जावू लागले. त्यांनी ‘चक्रावर्त’, ‘गार्बो’, ‘आर्य चाणक्य’ या नाटकांना केलेले नेपथ्य असेच वेगळे ठरले. त्यांनी बाळ कोल्हटकरांच्याही नाटकांचे नेपथ्य केले. ‘सविता दामोदर परांजपे’ ह्या व्यावसायिक नाटकाचे नेपथ्य त्यांनी केले. ‘सं कट्यार काळजात घुसली’ या नाटकाची त्यांनी दोन अंकी रंगावृत्ती तयार केली होती.
ते जिथे नोकरी करत त्या मध्य रेल्वेतील कलाकारांसाठी कल्चरल अकादमीची त्यांनी स्थापना केली. नाटककार विजय तेंडूलकर यांच्या नाटकाच्या आवडीबरोबरच त्यांनी लिखाणमध्येही आपली छाप सोडली आहे. त्यांच्या डोक्यात कायम रंगभूमीचा विचार असायचा आणि कृतीत अखंड प्रयोगशीलतेचा ध्यास असायचा. ते हाडाचे नेपथ्यकार होते आणि त्यांनी ‘नेपथ्याची बखर’ नावाचे पुस्तकच लिहिले होते, ज्यात मराठी रंगभूमीवरील गेल्या १५० वर्षांतील नेपथ्याच्या वाटचालीचा इत्थंभूत इतिहास होता. बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले.
अनेक नाट्यप्रशिक्षण कार्यशाळांमधून त्यांनी ह्या तंत्रमंत्राचे धडे दिले. आणि शिवचरित्रकार डॉ. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातील निवडक विषयांवर समीक्षा लेखन केले. या बरोबरच बापू लिमये उवाच, हा निबंध संग्रह, समीक्षा, लेख संग्रह त्यांनी लिहिले. विद्यार्थ्यांसाठी ‘विचारसूत्र’ लिहिली. ते मध्य रेल्वेच्या कल्चरल अकादमीचे संस्थापक होते. हौशी रंगमंच संघटनेचे ते माजी अध्यक्ष, रंगमंच कलाकार संघटनेचे ते माजी अध्यक्ष, कार्यकर्ते होते. त्यांनी ९७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढवली होती. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply