बापू,
आजही तु दिलेल्या टोपीच्या,
झाकणाखालून सडलेल्या मेंदूतले,
नासके विचार वाहू लागतात ना
तव्हा मलं तुह्या अहिंसेतुन जन्मलेल्या
मुक्त स्वातंत्र्याची किंमत कळते….!!!
बापु,
तुलं ते एकदा न कदा मारू शकतात रे,
पण जव्हाबी तेह्यनं तुलं,
मारायचा प्रयत्न केला नं,
तव्हा तव्हा तु रक्तबीजासारखा
पुनर्जिवीत झालास…!!!
वांझुट्या विचारांच्या आडुन त्यांनी तुलं,
मारायचा खुप प्रयत्न केला,
टोप्यांना वेगवेगळे रंगही दिले,
तरी पण त्या जहाल विखारांतुन तु,
चकाकुनच निघालास….!!!
बापु
आजही तुह्या सत्य,अहिंसेच्या विचारावरच
हि पृथ्वी तगुन आहे….!!!
जव्हा तेह्यनं तुव्हा बापच काढला नं,
तव्हा तं मव्हबी डोकं भनकु लागलं,
पण तुह्याच विचारानं,
मह्या डोक्यातीलं आग शांत केली…!!!
बापु भलेही तेह्यनं तुही हत्या,
बंदुकिच्या गोळीनं केली असेल
पण तुह्या विचारांची हत्या,
ते कोणत्या बंदुकीनं करतीलं…?
बापु,
तेह्यनं धर्माची अफु लोकांना चारली,
तुह्या सत्याच्या प्रयोगावरही टिका केली,
तुव्ह लंगोट काढुन वस्त्रहरण करू पाह्यलं,
तुव्हा बापबी काढला अन विचारांचा,
विखारी सापबी तुह्यावरं सोडला,
तरी तु टस का मस झाला नाहीस,
भलेही तेह्यनं कपटानं तुह्या शरीरावर
गोळ्या झाडल्या असतीलं रे,
अन तुही “हे राम!” म्हणत,
धारातीर्थी पडला असशीलं…
पण तुह्या विचारांतला “राम”
ते कव्हाच मारू शकणार नाहीतं…..!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply