नवीन लेखन...

बारक्या

“आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !! … त्यानीही जीभ चावत .. “हो हो ..गडबडीत लक्षात नाही आलं !!” असं म्हणत आपल्या लेकाला उजवीकडच्या बाजूला आत बसवलं ..

प्रवास सुरू झाला… रिक्षा पुढे पुढे जात होती पण “बारक्या” हे नाव ऐकून याच्या मनातल्या विचारांनी मात्र “”रीव्हर्स गियर”” टाकला .. ५ वी आणि ६ वी ही दोन वर्ष तो शाळेत रिक्षेनी जायचा त्याची आठवण झाली .. हे आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे तेव्हा रिक्षावाले काका याला नेहमी “बारक्या” म्हणायचे .. .. दोनच वर्षांचा सहवास असला तरीही त्या रिक्षावाल्या काकांना याचा एकदम लळा.. मुलांना सुद्धा ते आवडायचे .. विहीर खोदताना बराच वेळ खणता खणता अचानक एखाद्या हलक्याश्या घावानी विहिरीला पाणी लागावं आणि काही मिनिटात तो खड्डा जलमय व्हावा तशी अवस्था झाली होती त्याच्या मनाची ; “बारक्या” .. हा एक शब्द ऐकून !!.. सकाळी किर्रर्र -किर्रर्र हॉर्न वाजवत ऊन-पाऊस-थंडी काहीही असलं तरी अगदी वेळेत येणाऱ्या त्या काकांच्या आठवणी , त्या दोन वर्षातल्या सगळ्या घडामोडी, किस्से , गमती सगळं सगळं तरळू लागलं .. .. त्याची एकदम तंद्रीच लागली विचारात .. मुलगा काहीतरी सांगत होता तेही समजत नव्हतं .. ते बघून रिक्षाचालक सुद्धा आरशातून अधून मधून आश्चर्याने पहात होते.. पण हा मात्र वेगळ्याच विश्वात रमला होता .. २५-३० वर्षांपूर्वीच्या दुनियेत.. याच्या मनातल्या विहीरीचं पाणी बहुदा डोळ्यापर्यंत आलंच होतं sss इतक्यात त्यांचं घर आलं.. शेवटी मुलानेच योग्य ठिकाणी थांबवायला सांगितलं .. रिक्षाचालकांनी ब्रेक मारला…. आणि तेव्हा कुठे हा काहीसा भानावर आला ..

त्याच विचारात तो उतरला आणि पाकीटातून पैसे काढून देऊ लागला .. त्याचं लक्ष पाकिटात असतानाच रिक्षाचालकांनी विचारलं .. “काय रे “बारक्या” ?? कसा आहेस ?? सुट्टे पैसे चाचपडत हा आपल्या मुलाला म्हणाला .. “ बेटा , काय विचारतायत आजोबा ?? “ “बाबा sss .. ते मला नाही sss .. तुला विचारतायत !! “.. मुलाचं निरागस प्रत्युत्तर..

त्यानी लगेच नजर वर फिरवली आणि त्या रिक्षावाल्या आजोबांकडे बघितलं .. आपल्या डोळ्यांनी त्यांचा चेहरा स्कॅन करत “मनाच्या फॉटोशॉप” मध्ये एडिट करायला टाकला .. त्यातली खुरटी अर्धपांढरी दाढी उडवली , मिशी दाट आणि काळी केली , शरीरयष्टी जाडजूड आणि चेहरा थोडा रांगडा केला , टक्कल कमी केलं , डोक्याला टिळा लावला .. मनातलं एडिटिंग पूर्ण होताच मनानी मेंदूला संदेश दिला आणि तो जवळजवळ किंचाळलाच .. “” काकाssss , आमचे रिक्षावाले काका ?? तुम्ही ????? “ “”अहो इतका वेळ रिक्षेत मी माझे शाळेतलेच दिवस आठवत होतो .. सकाळी आम्हाला उठायला उशीर झाला तरी तुमचं मात्र वेळेत हजर असणं , एकदा पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून तुम्ही कसं आम्हाला एकेकाला व्यवस्थित नेलं होतंत , तुम्ही असल्यावर घरचे कसे एकदम निश्चिंत असायचे , आम्हाला उगाच त्रास देणाऱ्या त्या मोठ्या टपोरी मुलांना तुम्ही कसा दम दिला होतात .. ,आठवतंय ??.. माझ्या होमी भाभा परीक्षेच्या क्लासमुळे तुम्हाला शाळेत उशिरापर्यंत थांबायला लागलं होतं आणि त्याच दिवशी तुमच्या मुलाचा वाढदिवस , माझ्यामुळे तुम्ही घरी उशिरा गेला होतात , अजून वाईट वाटतं मला .. .. कधी कसली तक्रार नाही तुमची .. एकदा लांबचं भाडं मिळालं आणि आमची शाळा सुटायची वेळ झाली म्हणून तुम्ही न जेवताच आम्हाला घ्यायला आलात .. सकाळी सकाळी निरोप कसा देणार म्हणून एकदा तापात सुद्धा शाळेत सोडायला आला होतात !!””..

याच्या मनातल्या विहिरीला लागलेलं पाणी आता पंप लावल्यासारखं जोरात वाहत होतं.. शब्दांचा धबधबा .. “अरे होss होss रं बारक्या .. किती बोलू असं होतंय बघ तुला .. मला पण तुला बघून आठीवलं सगळं .. तू गाडी टाकायला आलता किनई sss .. तेव्हाच हेरलं व्हतं तुला .. पण नजर पहिल्यासारखी नाही राहिली बघ .. म्हणून उगाच शंका .. दिली २ भाडी सोडून अन् थांबलो की तू येईपर्यंत .. तू काय म्हाताऱ्याला लगेच नाही ओळखलं बघ .!!” “अहो काका .. किती बारीक झालाय तुम्ही . केस पांढरे झाले की ..खूप बदल झालाय तुमच्यात .. पटकन ओळखलं नसलं तरी विसरलो नाही बरं का अजून .. आणि कधी विसरणार पण नाही ..

“बारक्या .. आजारी होतो रे काही वर्ष !!.. गावाकडं गेलतो …. आता मागल्या वर्षी आलो परत .. इकडं बी खोली ठेवली हाय अजुन .. म्हंटलं हात पाय चालतायत .. तर चालवू की रिक्षा .. पण बरं वाटलं भेटलास ते .. ते जुनं घर सोडलं काय रे बारक्या आता ??”.. घरी कशे आहे सगळे ??” “हो !!.. झाली आता इकडे पण १२-१५ वर्ष .. मला तर कमाल वाटतंय काका .. इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटून !.. चला घरी , चहा पिऊया झक्कास .. आई आहे आणि माझ्या बायकोची पण ओळख करून देतो.”. “नको रे !! .. उशीर होईल .. जायचंय जरा बाहेर .. हाय की इकडच आता .. भेटूss की नंतर .. आईला सांग .. रिक्षावाले काका भेटले होते” .. “बरं बरं !! .. पण नक्की या एकदा .. आईला पण आनंद होईल !!” ..

लॅंडलाइनच्या काळातले काका आता मोबाईलच्या युगात भेटले .. साहजिकच नंबर देवाण घेवाण झाली .. आणि ते निघणार एवढ्यात … “काका .. एक सेकंद बाहेर या ना जरा !!” असं म्हणून त्यानी सोसायटीच्या गेट बाहेरच, रस्त्यावर काकांना खाली वाकून व्यवस्थित नमस्कार केला .. आणि आपल्या मुलालाही करायला सांगितला. “हाय का आता बारक्या ? .. लहान राहिला व्हय तू आता …साहेब झालाय पार .. बालबच्चे वाला हो गया हई तू अभी ss .. .. अजून खूप खूप मोठ्ठा हो !!! “.. “चल रे बारक्या .. येतो आता .. आणि हा आमच्या “बारक्या sss चा बारक्या” .. हाहा ss “ .. मुलाचा गालगुच्चा घेत काका म्हणाले .. “पुढच्या वेळेस हा आजोबा नक्की चॉकलेट आणेल बरका !!”

घरी गेल्यावर मुलाने आईला बाबाची सगळी गंमत सांगितली .. थोड्यावेळानी सगळे आपापल्या कामाला लागले .. रात्री जेवण वगैरे झाल्यावर गप्पा मारता मारता कशावरून तरी रिक्षावाल्या काकांचा विषय निघाला .. बायको सुद्धा म्हणाली “ घरी बोलव की एकदा त्यांना !! “ हो , बोलावू की .. कसं आहे न् बायको ss .. आपण लहानाचे मोठे होतो .. आपल्या क्षेत्रात पुढे जातो .. मी तर काहीच नाही , माझ्याबरोबरचे कित्येक जण अनेक मोठ्या पदांवर , हुद्यांवर आहेत , अनेक जण तर सेलेब्रिटी सुद्धा झाले आहेत .. पण नेहमी आपल्या प्रगतीचा लेखाजोखा मांडतो तेव्हा आपल्या या प्रवासात ज्यांचं भरीव योगदान असतं असे आपले आई-वडील , शिक्षक-गुरु , जवळचे नातेवाईक , मित्रमंडळी वगैरे अशांचाच उल्लेख होतो .. आणि अर्थात तो सार्थ आणि योग्यच आहे….यात दुमत अजिबात नाही .. पण या व्यतिरिक्त आपल्या उत्कर्षात या “रिक्षावाल्या काकांसारखे असे अनेक जण” आपल्या सोबत असतात ..आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सगळ्यांनाच कुणी ना कुणी भेटत असतात .. ज्यांचा वाटा सिंहाचा नसेल , कदाचित खारीचा सुद्धा नसेल , आपल्या उत्कर्षात प्रत्यक्ष सहभाग सुद्धा नसेल .. पण आपलं अस्तित्व त्या सगळ्यांच्या अस्तित्वाशिवाय पूर्ण होतंच नाही ना !! .. ते “ जिगसॉ पझल” असतं न् मुलांचं .. त्यात काही तुकडे असे असतात जे कोपऱ्यात असतात किंवा मध्ये कुठे असले तरी मूळ गाभा सोडून एखाद्या प्लेन रंगाचे वगैरे असतात .. म्हणजे ज्या तुकड्याशिवाय सुद्धा त्या चित्रात , डिझाईनमध्ये काहीच फरक पडत नाही .. पण तरीही तो तुकडा जोवर लावत नाही तोपर्यंत ते “चित्र अपूर्णच” राहतं .. तस्सच !!.. ७ वी पासून मी रिक्षा सोडली आणि सायकलवर जायला लागलो .. मग मोठेपणी स्कूटर नंतर बाईक , कार आणि आता ह्या एसयूव्ही पर्यंत पोचलोय .. पण आज मी जो काही आहे त्यात त्या रिक्षेतल्या दोन वर्षांचं , या रिक्षावाल्या काकांचं काहीतरी अप्रत्यक्ष योगदान आहे हे नाकारूच शकत नाही .. !!! उद्यापासून आपण सगळे आपल्या व्यापात , ते काकाही त्यांच्या दिनचर्येत .. त्यामुळे पुन्हा त्यांची कधी भेट होईल न् होईल ते माहिती नाही .. पण हे “काका आणि त्यांच्यासारखे सगळेच” ; ज्यांची नावं कदाचित कुठल्या श्रेयनामावलीत कधीच येणार नाहीत पण माणूस म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यातल्या त्यांच्या योगदानाची जाणीव असणं महत्वाचं आहे .. प्रत्येकानीच ती ठेवायला हवी ..आपल्या “असण्यात” त्यांच्या “असण्याचाही” हातभार आहे याची जाणीव ..

एका अर्थी माझ्यासोबत आपले चिरंजीव होते हे बरंच झालं .. कारण अशी कृतज्ञता असणं , योग्य वेळेस ती व्यक्त करणं , या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा जाणीव ठेवणं हे सगळं पुढच्या पिढीला सुद्धा समजायला हवं .. .. आणि त्यांना मात्र याची जाणीव आपणच करून द्यायला हवी ना ??
“एकदम परफेक्ट बोललास बघ !! अगदी मनातलं !! .. ईस बात पे मस्त कॉफी पिऊया आता .. थांब आलेच .. आणि त्या मोबाईलला चिकटलेल्या “आपल्या बारक्या”ला पण बोलाव आता .. हाहा ss !!”.. “ए बारक्या ss .. चल आता झोपायला !!

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..