९ मार्च १९५९ हा बार्बीचा जन्मदिन!
आज बार्बी डॉल अठ्ठावन्न वर्षाची झाली.
लहान माझी बाहुली, मोठी तिची साऊली
घारे डोळे फिरवीते, लुकूलुकू ही पाहाते
नकटे नाक उडवीते, गुबरे गाल फुगवीते
कविवर्य दत्तांची ही कविता वाचताना त्यांनी बार्बीला पाहिले होते का, असा प्रश्न पडतो. त्यांनी बार्बीला पाहिले असण्याची शक्यता नाही. बार्बीला ज्यांनी जन्माला घातले त्यांनी दत्तांची ही कविता वाचली असण्याची शक्यताही नाही. अठ्ठावन्न वर्षांची झाली, तरी बार्बी अजून पहिल्यासारखीच दिसते, बदलली आहे ती वेषभूषा! बार्बी डॉल लाँच केली आणि तेव्हापासून तिचा प्रवास ‘ती आली, तिनं पाह्यलं आणि तिनं जिंकलं’ असाच झाला आहे. ‘अटकर बांधा, गोरा गोरा खांदा’ अशी बार्बी जगभरातील मुलींच्या दृष्टीने केवळ एक बाहुली नाही तर मैत्रीण आहे. मार्गदर्शक आहे. त्यांच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी आहे. टीन एजर्सच्या मनातल्या स्वप्नांचं, आकांक्षाचं ती मूर्त स्वरूप आहे. एवढंच नाही तर पन्नाशीत बहुतेकींच्या ‘चवळीच्या शेंगे’सारख्या बांध्याची जेव्हा ‘ऐशी की तैशी’ झालेली असते, त्या वयात बार्बीच्या शरीरावर मात्र वाढत्या वयाच्या खुणा नाहीत, त्यामुळे आज जुन्या पिढीचंही ती स्वप्न झाली आहे.
बार्बी डॉलने फॅशन आयकॉन आणि पॉप संस्कृतीतील राजकन्या म्हणून पाच हून अधिक दशके गाजवली. बार्बीच्या जन्मदात्रीचे नाव रुथ हँडलर. रुथ यांची कन्या बार्बारा एक दिवस कागदाची बाहुली बनवत असताना त्यांनी पाहिले. त्यांच्या मनाने घेतले, की आपण बच्चे कंपनीसाठी एक सुरेखशी बाहुलीच का बनवू नये? १९५६ मध्ये युरोपच्या दौऱ्यावर असताना रुथ आणि त्यांचे पती एलियट यांनी ‘बिल्ड लिली’ ही जर्मन बाहुली पाहिली. त्यांच्यासमवेत चिरंजीव केनेथ आणि कन्या बार्बारा हेही होते. मुलांना बाहुली आवडताच रुथ यांनी तीन बाहुल्या विकत घेतल्या. बिल्ड लिली ही बाहुली म्हणजे त्या वेळी ‘दि बिल्ड झायटुंग’ या जर्मन वृत्तपत्रात रेनहार्ड ब्यूथिन या चित्रकाराने रेखाटलेल्या ‘कार्टून स्ट्रिप’मधली एक व्यक्तिरेखा! लिली जर्मनीत १९५५ मध्ये पहिल्यांदा विकली गेली. अमेरिकेला परतून रुथ आणि एलियट यांनी या बाहुलीसारखी बाहुली बनवायचा ध्यास घेतला. एलियट हँडलर यांचा खेळण्यातल्या छोटय़ा फर्निचरचा व्यवसाय होता. हँडलर यांच्या भागीदाराचे नाव होते हॅरॉल्ड मॅटसन. त्याच्या नावातले ‘मॅट’ आणि स्वत:च्या एलियट या नावातले ‘एल’ असे शब्द जुळवून त्यांनी कंपनी निर्माण केली- ‘मॅटेल’. रुथ यांच्या सांगण्यावरून या कंपनीतून बार्बीच्या निर्मितीला सुरुवात झाली . यंत्रसामग्री, साचे यांचा प्रश्न असल्याने पहिली बार्बी जपानमध्ये घरगुती पद्धतीने निर्माण झाली. ज्या काळात अगदी मोजक्याच खेळण्यांच्या वाटयाला टी व्ही जाहिरातीचे भाग्य येत असे, त्यात बार्बीचा समावेश होता. टी. व्ही.वरच्या या जाहिरातीचा बार्बीच्या यशात खूप मोठा वाटा आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे लाँच केलेल्या वर्षांतच साडेतीन लाखांचा विक्रमी खप या फॅशन डॉलच्या नावावर जमा झाला. आज १५० हून अधिक देशांतला बार्बी डॉल्सचा खप बिलियनच्या घरात आहे. लाँच केलेल्या वर्षांतच बार्बीनं खपचा विक्रम केला तेव्हाच या बाहुलीचं यश निश्चित झालं होतं. त्यामुळे मॅटेल टॉय कंपनीनं बिल्ड लिलीचे सर्व हक्क विकत घेतले आणि त्यानंतर बिल्ड लिली इतिहासजमा झाली. बार्बीच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहावा, यासाठी मॅटेल कंपनी बार्बीच्या बाबतीत सतत प्रयोगशील राहिली. बार्बी हे ‘टीन एजर्स मॉडेल’ असल्याने बार्बीच्या माध्यमातून मुलींना सतत वेगवेगळे संदेश दिले गेले. मुली कोणत्याही क्षेत्रात पुढं जाऊ शकतात, त्यांचं ‘बाईपण’ त्यांच्या करियरच्या, प्रगतीच्या आड येत नाही हे दाखवण्यासाठी बार्बीला डॉक्टर, अॅंस्ट्रोनॉट, अमेरिकन आयडॉल, अॅलथलेट, प्रेसिडेन्शियल कँडीडेट, शेफ अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखांमधून पेश केलं गेलं. बार्बी, तिची रूपं, तिच्याबरोबर मिळणाऱ्या अॅाक्सेसरीज सतत बदलत्या ठेवल्या. त्यानिमित्तानं नवनवीन स्वप्नं, वेगवेगळ्या दिशा मुलींसमोर ठेवल्या जाऊ लागल्या. बार्बीने समोर ठेवलेले पर्याय मुलीही स्वीकारू लागल्या. बार्बी हा जगातील एकमेव ब्रँड आहे की जो जगभरातील तरुण मुलींना हाऊस वाईफपासून राष्ट्राध्यक्षांपर्यंत कोणत्याही रूपात स्वत:ला पाहण्याची संधी देतो. बार्बीने मुलींच्या मनातील मैत्रिणीची जागा घेतली. मैत्री, कुटुंब, शौर्य, प्रामाणिकपणा अशी मूल्यं जपण्यासाठी बार्बीनं कायम पुढाकार घेतला. यासाठी तिने ‘बार्बी अॅ ण्ड दी डायमंड कॅसल’ या चित्रपटाचा माध्यम म्हणून उपयोग केला. बार्बी गर्ल्स डॉट कॉम ही सर्वात वेगाने वाढणारी वेबसाइट ठरली. या वेबसाइटच्या ५० दशलक्षाहून अधिक मैत्रिणी झाल्या. बार्बी ही हजारो यू टय़ूबच्या चॅनेल्सवर झळकली. बार्बी ही मुलींसाठी कायमच ट्रेन्डसेटर ठरली आहे. अगदी साठच्या दशकापासून ते नव्वदच्या दशकापर्यंत तिची फॅशन जगभरात प्रसिद्ध होती. फ्लॉवर पॉवर, फन इन द सन, निळ्या सनग्लासेस, मोठा बेल्ट, लेगीज, स्टायलिश स्क्रूनशिज, पिवळा बीच टॉवेल अशा विविध फॅशन्स आणि ट्रेन्डस् बार्बीने आणले आणि सेट केले. बार्बीच्या डायरेक्ट टू डीव्हीडीच्या चित्रपटांच्या माध्यमांतून होम व्हिडियो विभागातही बार्बीनं धुमाकूळ घातला. १४ टायटल्सच्या माध्यमातून बार्बीने लोकप्रियतेचे नवीन उच्चांक गाठले. प्रत्येक चित्रपटात एका वेगळ्याच रूपात दिसणाऱ्या आणि यशस्वी ठरणाऱ्या बार्बीने मुलींच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे बार्बी तरुण मुलींच्या गळ्यातली ताईतच बनली.
आपला एखादा ‘बॉयफ्रेंड’ असावा, हे या वयातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्नं. ते लक्षात घेऊन मॅटेलनं केनला आणलं ते बार्बीचा ‘बॉयफ्रेंड’ म्हणून. बार्बी हे नाव रुथनं बार्बारा या तिच्या मुलीच्या नावावरून ठेवलं होतं तर केन हे केनेथवरून ठेवण्यात आलं. बार्बी आणि केनच्या रोमान्सच्या चविष्ट आणि चटपटीत बातम्यांनी मॅटेलनं बार्बीला चांगलंच प्रकाशझोतात ठेवलं. प्रेमप्रकरण म्हटल्यानंतर भांडणं, रुसवेफुगवे, रुठना-मनाना, हे सगळं अपरिहार्यपणे आलंच. या सगळ्या रेडिमेड मालमसाल्याचा फायदा उठवण्यात मॅटेलनं काही कसूर सोडली नाही. ‘दुनियाकी कोई ताकद हमें जुदा नही कर सकती’ अशा आणाभाका घेणाऱ्या बार्बी-केनला एकमेकांना निरोप द्यायला लावला. त्यांच्या प्रेमप्रकरणात गुंतलेल्यांनी (मॅटेलला हवा तेवढा) गदारोळ माजवला. आपल्याकडच्या मालिकांमध्ये एखादं लोकप्रिय कॅरॅक्टर अचानक फोटोत जाऊन बसतं आणि त्यावर आवश्यक तो हल्लागुल्ला झाल्यावर अलगद फोटोतून बाहेर येऊन माणसात मिसळतं, ही ट्रीक बहुधा बार्बी-केन प्रकरणावरूनच ढापलेली असावी. कारण २००४ मध्ये बार्बी-केननं ‘तुझ्या-माझ्या वाटा आता वेगळ्या झाल्या’ असं ठरवल्यानंतर पुढं दोन र्वष हा गोंधळ मॅटेलनं चालू ठेवला आणि २००६ मध्ये त्यांचे पुनर्मीलन घडवून आणलं.
बार्बीच्या आयुष्यात केनला विशेष स्थान असलं तरी टेरेसा, मिज, ख्रिस्ती आणि तिचा बॉयफ्रेंड स्टीव्हन, स्कीपर, टॉड, टट्री, स्टासी, केली, क्रीसी, फ्रॅन्सी, जॅझी असा बार्बीचा मित्र आणि भांवडं परिवार मोठा आहे. याशिवाय बार्बी पेटप्रेमी आहे. तिच्याकडे ४० पेटस् आहेत. गाडय़ांचीही ती चाहती आहे. त्यामुळे तिच्या गाडय़ांचा ताफाही मोठा आहे.
अशी ही बार्बी भारतात आली ती साडी लेऊन, नववधूचा साजशृंगार घेऊन. साडीतल्या बार्बीला भारतीय तरुणींनीही पटकन् स्वीकारलं. बार्बीच्या आधी ठकीनं अशीच जनमानसावर भुरळ घातली होती. आजच्या पिढीला ठकी माहितीही नसेल. पण आज पन्नाशीतल्या पिढीचं बालपण ठकीच्या सहवासात गेलेलं आहे. बार्बीचा आखीव रेखीवपणा, नाजूकपणा ठकीत नसेल, पण तरीही जुन्या पिढीच्या भावविश्वात ठकीचं स्थान अढळ आहे. बार्बीला तिची जागा कधीच घेता आली नाही. तिनं आजच्या तरुण पिढीच्या मनात ते स्थान मिळवलं आहे.
बार्बी फेमस आहे. मुलींची आवडती आहे. बार्बी डॉल आपल्याकडे असण्याचं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. बार्बीचा सेल तडाखेबंद आहे.. वगैरे वगैरे गोष्टी बार्बीबाबत वर्षांनुर्वष ऐकवल्या जात आहेत. पण त्याचबरोबर बार्बी अनेक वेळा टीकेचं लक्ष्यही झाली आहे. याची सुरुवात झाली ती बार्बी लाँच केली गेली तेव्हाच. कारण एकंदरीतच बार्बीच्या (अती)उभार बस्ट लाईवरून पालकांनी गदारोळ उठवलाच. त्यात तिचे कमी कपडेही पालकांच्या डोळ्याला खुपत होतेच. अशीच ‘अल्पवस्त्रांकिता’ बार्बी घरातल्या मुलींसाठी का त्यांच्या वडिलांसाठी, असा ( खवचट) प्रश्न विचारला जाऊ लागला. बार्बीच्या ‘चवळीच्या शेंगे’सारख्या बांध्यामुळे मुलींच्या मनातली ‘झिरो फिगर’ची स्वप्नं बळावत असून त्या ‘अॅळनोरेक्झिया’ची शिकार बनत आहेत, याबद्दलही अनेक पालकांनी तक्रार केली. तेव्हा १९९७ मध्ये बार्बीचा बॉडी मोल्ड बदलण्यात आला. सौदी अरेबियात तर बार्बीवर बंदीच घालण्यात आली. बाईचं नखही दिसू नये, अशी अपेक्षा करणाऱ्या मुस्लिम धर्माला बार्बी ‘कुछ रास नाहीं आयी’. त्यामुळं त्यांनी बार्बीवर बंदी आणली, पण बार्बीच्याच धर्तीवर ‘फुला’ नावाची बाहुली लाँच केली. फुला ही नखशिखांत कपडे घातलेली बाहुली आहे. ती बार्बीला पर्याय म्हणून विकली जात असली तरी ती मॅटेल कंपनीनं तयार केलेली नाही. सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल टाकून इराणनं ‘सारा आणि दारा’ या बाहुल्या बाजारात आणल्या. एकूण काय, बार्बीच्या यशानंतर बार्बीचे अनेक आविष्कार बाजारात आले.
बार्बीच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी अॅाक्वा नावाच्या एका डॅनिश नॉर्वेजियन ग्रुपनं ‘बार्बी गर्ल’ नावाचं गाणं केलं. त्यात ‘यू कॅन ब्रश माय हेअर, अनड्रेस मी एव्हरी व्हेअर’ यासारखे शब्द होते. या गाण्याबरोबर त्यांनी ग्राफिक वापरलं होतं, ते पिंक बार्बीशी साधम्र्य दर्शवणारं होतं. निस्सानने तयार केलेल्या जाहिरातीलाही मॅटेल कंपनीनं विरोध दर्शवत खटला भरला होता. ‘टीन टॉकी बार्बी’ ही बोलणारी बाहुलीही मॅटेलनं १९९२ मध्ये लाँच केली. ‘वान्ना हॅव अ पिझ्झा पार्टी?’ ‘आय लव शॉपिंग’ अशी वेगवेगळी वाक्यं ही बाहुली बोलत असे. एकूण २७० वाक्यांपैकी प्रत्येकी बाहुली चार वाक्यं बोलत असे. यातलंच एक वाक्य म्हणजे ‘Math class is tough’ पण या वाक्यामुळे बोलणारी बार्बी टीकेचं लक्ष्य झाली. अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी विमेन’ यांनी या वाक्याला विरोध केला. तेव्हा मॅटेलनं हे वाक्यच काढून टाकलं. एवढंच नाही तर ज्यांच्याकडे हे वाक्य बोलणाऱ्या बार्बी होत्या, त्यांना दुसऱ्या बाहुल्या दिल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट /शुभदा रानडे
Leave a Reply