नवीन लेखन...

वानप्रस्थाश्रमातील मूलभूत विचार

आतापर्यंत आपण पैसा, पैसा आणि पैसा हाच आपला सखा, मित्र, गणगोत समजत होतो. त्याऐवजी सखा भगवंत झाल्याने उद्वेग, चिंता, काळजी नष्ट होऊन त्याऐवजी आता मानसिक समाधानाची प्राप्ती आपल्याला होते आहे. त्यामुळे सर्व प्रापंचिक, भौतिक वस्तुंवरील आपली आसक्ती सहजपणे कमी होते आहे. हे आत्मपरीक्षण, त्यातून प्राप्त झालेली अनुभूती हीच आपल्याला जीवनाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे कृतकृत्यतेकडे घेऊन जाईल.


जगातील सर्व संस्कृतींमध्ये भारतीय संस्कृती ही प्राचीनतम संस्कृती आहे हे सत्य आता संपूर्ण जगाने एकमुखाने मान्य केले आहे. भारतीय संस्कृतीची विचारधारा, तत्त्वज्ञानाचे उगम स्थान वेद, उपनिषद, दर्शनशास्त्रे, पुराणवाङ्मय, रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये आहेत. त्यातून शाश्वत जीवनमूल्याधिष्ठित भारतीय जीवन पद्धती आकाराला आली आहे. सहस्रावधी वर्षांच्या अंतर्गत आणि बाह्य आक्रमणांना पचवून आजही तिचा प्रवास अक्षुण्णपणे, अप्रतिहत गतीने चालूच आहे. जगातील इतर संस्कृतींपेक्षा भारतीय संस्कृतीचे वेगळेपण लक्षात येण्यासाठी संस्कृती म्हणजे काय? हे समजून घेणे आवश्यक आहे.

संस्कृती म्हणजे सजीव उत्क्रांती

लुईस मफ्फर्ड हा सुप्रसिद्ध अमेरिकन विचारवंत, समाज शास्त्रज्ञ त्याने जगातल्या विविध संस्कृतींचा सखोल व तुलानात्मक अभ्यास केला आहे. त्यावर ‘द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅन’ या नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे. तो म्हणतो, ’मानवी संस्कृती ही मानवाची निर्मिती आहे. असे जरी आपण म्हणत असलो तरी ती स्वत:च्या स्वयंगतीने (सेल्फ डायनॅमिक)’ वस्तू आहे. जड नाही. संस्कृती म्हणजे समाजाची जगण्याची रीत व शैली (अ वे ऑफ लिव्हिंग) असते. या शैलीचा प्रवास भूतकाळातून वर्तमानकाळ आणि त्यातून भविष्यकाळ या प्रकारचा होत असतो. यालाच आपण संस्कृती सातत्य असे म्हणतो. विज्ञानाच्या भाषेत यालाच ‘ऑरगॅनिक इव्होल्युशन’ असे म्हटले जाते. उत्क्रांतीचे हे तत्त्व सातत्याने निसर्गाशी जुळणी करीत विकसित होतच असते. पण याला छेद देणारा एक महत्त्वाचा सिद्धांत सांगताना मफ्फर्ड म्हणतात, ‘नैसर्गिक क्रमाने उत्क्रांत होत असलेल्या या गतिमानतेला योग्य त्या दिशेने वळण व आकार देण्याचे महत्त्वाचे कार्य मात्र मानवच करू शकतो.’

भारतीय तत्त्वज्ञानात यालाच ‘कर्म स्वातंत्र्य’ म्हटले आहे आणि या ‘ऑर्ग्यानिक गतिमानतेला योग्य दिशेने नेण्यासाठी प्रस्थापित केलेल्या प्रणालीला ‘संस्कार प्रक्रिया’ असे म्हटले जाते. त्याचा प्रारंभ भारतीय संस्कृतीत दृढमूल झालेल्या ‘षोडश संस्कारां’पासून होतो. हे वैशिष्ट्य फक्त याच संस्कृतीत आढळते. ‘संस्कारात् द्विजं उच्यते’ हे वैज्ञानिक सूत्र आहे. कारण त्यात लुईस मम्फर्ड म्हणतात त्याप्रमाणे ‘योग्य दिशेने जाणारा ‘क्रमविकास’ म्हणजे ‘उत्क्रांतिपट’ आहे. भारतीय जीवन धारणेत ‘वानराचा नर’ आणि ‘नराचा नारायण’ करण्याचा ध्येयवाद आहे. त्याच्या पूर्तततेसाठीच अनेक शास्त्रे निर्माण करण्यात आलीत. वेदकाळापासून ‘क्रमविकासावर’ आधारीत जीवन पद्धती जिला आपण चतुर्विध पुरुषार्थ संपन्न जीवन पद्धती म्हणजे ‘धर्म, अर्थ, काम, मोक्ष’ यांनी संपन्न, परिपूर्ण जीवन पद्धती. ती निर्माण करण्यात भारतीय संस्कृतीला यश मिळाले आहे. भारतीय जीवन पद्धतीत मानवाच्या परिपूर्ण विकासासाठी चार पुरुषार्थ वर निर्देशित केलेले, त्याची योग्य ती कार्यवाही होण्याच्या दृष्टीने मानवी जीवनाची शंभर वर्षांची आयुमर्यादा लक्षात घेऊन ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांची आखणी करण्यात आली आहे. जितकी त्या काळात उपयुक्त होती, तितकीच आजही. कारण ती निसर्गसिद्ध वयोमान, त्या वयोमानाप्रमाणे असणारे मानसशास्त्र, कौटुंबिक, सामाजिक वातावरण यावर आधारित आहे.

अभ्युदय आणि नि:श्रेयस

अभ्युदय आणि नि:श्रेयस हे मानवी जीवनाचे दोन प्रमुख आयाम आहेत. लौकिक भाषेत यालाच आपण ’प्रपंच आणि परमार्थ’ असे म्हणतो. वैभवसंपन्न, सर्वांग परिपूर्णतेने व्याप्त, क्रियाशीलतेने परिपूर्ण, उद्यमशील, आनंदाने भरलेले पूर्ण जीवन जगण्याची आकांक्षा ‘हे अभ्युदयाचे तत्त्वज्ञान आहे. हा अभ्युदय सिद्ध करण्यासाठी तरुण वयात म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमात्. गृहस्थाश्रमात प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, आळस करू नये, अचूकपणे प्रयत्न करून, विविध प्रकारचे धक्के चपेटे सोसून प्रगती साधावी. कारण श्री समर्थ म्हणतात, ‘आधी कष्ट मग फळ। कष्टचि नाही ते निर्फळ॥’, ‘यत्नाचा लोक भाग्याचा। यत्नेवीण दरिद्रता॥’, ‘येथे जेणे आळस केला। तो सर्वस्वे बुडाला’ त्यासाठी ‘केल्याने होत आहेरे, आधी केलेचि पाहिजे’ या आत्मविश्वासाने जीवनात अखंडपणे कामाची लगबग, खटपट करणारेच जीवनात यशस्वी आणि सुखी होतात. त्यानेच प्रपंच म्हणजे गृहस्थाश्रम साध्य होतो.

भारतीय जीवन पद्धतीतील चार आश्रमांची व्यवस्थाही त्या त्या वयोगटाला साजेशा भावनिक, शारीरिक, मानसिक क्षमतांचा, आवश्यकतांचा विचार करूनच निर्माण झाली आहे. त्यात मानवच जो केंद्रस्थानी आहे – त्याचा समग्रपणे, सम्यकतेने विचार झाला आहे. त्याचे मूळ स्वरूप जे आहे त्याला अनुसरून त्या त्या आश्रमाला अनुसरून नीतिमूल्ये, शाश्वत जीवनमूल्ये यांची संस्कारांची रचना, व्यवस्था, अनुशासन निर्माण केले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांची जीवन सरिता चार आश्रमांचे प्रमुख टप्पे, महत्त्वाच्या वळणावरून अप्रतिहत गतीने प्रवाहित राहिली. या जीवन यात्रेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ’वानप्रस्थाश्रम आहे.

वानप्रस्थाश्रम – प्रवृत्तीतून निवृत्तीकडे

मानवी जीवनातील चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे. अनादिकाळापासून भारतीय जीवन पद्धतीचे अविभाज्य अंग आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी ऋषिमुनींनी जीवनाची दूरदृष्टीने आखणी चार आश्रमात केली. वरील अर्थ आणि काम पुरुषार्थाची उपासना धर्म मर्यादा सांभाळून ब्रह्मचर्याश्रम आणि गृहस्थाश्रमात करायची म्हणजे अर्थ आणि काम यांची तृप्ती करून अभ्युदय साध्य करायचा. पण लौकिक जीवनातच अडकून पडले तर मानवी जीवनाचे अंतिम लक्ष्य उद्दिष्ट मोक्ष ते दृष्टिआड होऊ नये यासाठी कासव ज्याप्रमाणे आपली सर्व इंद्रिये हळूहळू आणि सहजपणे आत ओढून घेते, त्याप्रमाणे लौकिक जीवनात इंद्रियजन्य उपभोगात गुंतलेले मन हळूहळू काढून ईश्वराची उपासना, भक्ती, सद्ग्रंथाचे वाचन, सत्संग, समाजाची सेवा करणे, गोरगरीब, पीडित लोकांची शिवभावाने जीवसेवा करणे अशा सात्विक भावात कसे तद्रूप करणे. याचाच अर्थ प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाण्याचा प्रयत्न करणे. या निवृत्त धर्माची उपासना करण्याचा कालखंड वा प्रयोगशाळा म्हणजे वानप्रस्थाश्रम होय. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणे. प्रपंचामधून परमार्थाकडे वळणे, भोगाकडून त्यागाकडे वळणे हाच वानप्रस्थाश्रमाचा मूलभूत विचार आहे.

वानप्रस्थाश्रमातून पूर्णपणे वैराग्यवृत्तीवर आधारित असलेल्या संन्यासाश्रमात आपल्याला पदार्पण करायचे असते. त्याची तयारी करण्याचा हा कालखंड आहे. त्यादृष्टीने त्याचा विनियोग करावा. त्यासाठी संतांनी काही मार्गदर्शक सूत्रे सांगितली आहेत. आजच्या आधुनिक काळाच्या संदर्भात त्यानुसार आपली दिनचर्या (डेली-रुटिन) ठेवण्याचा प्रयत्न करावा.

नरदेहाचे माहात्म्य लक्षात घ्यावे
बहुत जन्माचा शेवट। नरदेह सापडे अवचित।

येथे वर्तावे चोखट। नीतिन्याये॥

आहे तितुके देवाचे। ऐसे वर्तणे निश्चयाचे।

मूळ तुटे उद्वेगाचे। येणे रीती॥

प्रात:काळी उठावे। काही पाठांतर करावे।

यथानुशक्ती आठवावे। सर्वोत्तमासी॥

स्मरण देवाचे करावे। अखंड नाम जपत जावे।

नामस्मरणे पावावे। समाधान॥

नित्यनेम प्रात:काळी। माध्यान्हकाळी सायंकाळी।

नामस्मरण सर्व काळी। करीता जावे॥

सखा मानावा भगवंत। मातापिता गणगोत।

विद्या लक्ष्मी धन वित्त। सकळही परमात्मा॥

वरील काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूत्रांचे अखंड चिंतन, मनन केले तर आपल्या सहजपणे हे लक्षात येईल की, आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू हा बदलतो आहे. आपले मन भौतिकवादाकडून परमार्थाकडे वळते आहे. आतापर्यंत भौतिक समृद्धतेच्या, संपत्तीच्या हव्यासापोटी इतस्तत: धावणार्‍या मनाची तृष्णा, हाव ही मंदावते आहे. आजच्या परिभाषेत बोलायचे झाले तर संपूर्ण जगाला वेडेपिसे करून धावायला भाग पाडणार्‍या रॅट रेसमधून आपण बाद होतो आहे. आपल्या मनावरील डॉलर किंग आणि सेक्स क्विनचे प्रभुत्व नाहीसे होते आहे त्याजागी उपासनेमुळे शिव-शक्तिचे चिंतन होऊ लागले आहे. आतापर्यंत आपण पैसा पैसा आणि पैसा हाच आपला सखा, मित्र, गणगोत समजत होतो. त्याऐवजी सखा भगवंत झाल्याने उद्वेग, चिंता, काळजी नष्ट होऊन त्याऐवजी आता मानसिक समाधानाची प्राप्ती आपल्याला होते आहे. त्यामुळे सर्व प्रापंचिक, भौतिक वस्तुंवरील आपली आसक्ती सहजपणे कमी होते आहे. हे आत्मपरीक्षण, त्यातून प्राप्त झालेली अनुभूती हीच आपल्याला जीवनाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे कृतकृत्यतेकडे घेऊन जाईल. शेवटचा दिस गोड व्हावा याचा अर्थ म्हणजे जीवनातील प्राप्त झालेली कृतार्थता! याच कृतार्थतेला वंदन करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मरणशय्येवर असतानाही धन्योऽहं धन्योऽहचे कृतार्थ उद्गार काढून मृत्यूचे बोट धरून आपली जीवन यात्रा संपविली.

या कृतार्थतेची मशागत, चिंतन, वानप्रस्थाश्रमातच नीटपणे करता येते. हे वानप्रस्थाश्रमाचे मूलभूत सामर्थ्य आहे. जर, त्या दृष्टीने त्याचे चिंतन केले, मनन केले व त्यासाठी त्याचा विनियोग केला तर त्यासाठी प्रत्यक्ष वनातच जाण्याची गरज नाही. कारण वानप्रस्थाश्रम ही एक मानसिकता आहे. त्या मानसिकतेचा प्रवास प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे होतो. आहे की नाही प्रपंचाकडून परमार्थाकडे. आपले मन, बुद्धी वळते आहे की नाही? याचा आपणच आपला अखंडपणे मागोवा घेण्याचा, शोध घेण्याचा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. मानवी जीवनाचे चिंतन करणार्‍या एका पाश्चात्य विचारवंताने What is the defination of a meaningful life हे सांगताना म्हटले आहे की,

‘In positive psychology a meaningful life is a construct having to do with the purpose, significance, fulfilmerit and satisfaction of life… This ieda is reflected in the Indian tradition in a beautiful word ‘Krtakrtya’ means ‘What was to be done. Here ‘Krta’ means done and ‘Krtya’ means what was to be done. Therefore the man who has accomplished the ‘Goal, purpose’ of his life and contented satisfied is called the

‘Kratkrtya’. आपल्या जीवनात ही कृतकृत्यता सहजपणे निर्माण होऊ शकते. जर आपण सावधपणे संतांनी सांगितलेली मार्गदर्शनाची सूत्रे आपल्या जीवनात कटाक्षाने अंमलात आणलीत तर! ती कृतकृत्यता परमेश्वराच्या कृपेने जर आपल्या जीवनात आली तर मग –

तत्र को मोह: क: शोक:।

–प्राचार्य प्र. श्री. डोरले

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..