मध्य भारतातील हा सर्वात मोठा जिल्हा (३९११४ चौ.कि.मी.) म्हणून ओळखला जात असे.येथे बस्तर राजाचे साम्राज्य होते.हा संपूर्ण प्रदेश छत्तीसगड राज्यामध्ये सामील झाल्यावर २०१२ मध्ये त्याचे कंकर, नारायणपूर, कोंडेगाव, बिजापूर, दंतेवाडा, सुकमा आणि बस्तर असे उपजिल्हे तयार करण्यात आले. संपूर्ण छत्तीसगड मध्ये ४४% जंगल असून त्यातील अर्ध्याहून ज्यास्त जंगल बस्तर जिल्ह्यात आहे आणि जिल्ह्यातील ७०%जनता आदिवासी असून ती जनता घनदाट जंगलात राहते. रामायणातील दंडकारण्य भाग हाच बस्तर जिल्हा.शबरी गोंड जमातीची होती. पांडव गुप्तवासात याच जंगलात वास्तव्याला होते.पुढे हा प्रदेश गोंडवन म्हणून प्रसिद्ध झाला.या भागातील नवीन उदयास आलेले शहर म्हणजे जगदलपुर. रायपुर ते जगदलपुर २९० किमी चा ७ तासाचा प्रवास एक अनोखा अनुभव आहे. काही भागात चार पदरी अती उत्तम रस्ताआहेत.वाटेत केशताल घाटात मोठाले तोडलेले पहाड,काळपट पांढरे अजस्त्र दगड तोडून काढलेला वळणाचा मार्ग आहे.ह्या रस्त्यावरून २०/ २० चाकांच्या अजस्त्र ट्रकची ये जा होत असते. जागोजागी चाललेले रुंदी करणाचे काम पण संपूर्ण वाहतुकीला अफलातून शिस्त आहे . रस्त्याच्या कामाचा आवाका आणि बनलेले अती उत्तम रस्ते ह्या मुळे राज्याची रस्ते तयार करण्याची संपूर्ण यंत्रणा वाखाण्यासारखी आहे.
बस्तर म्हणजे रंगीबेरंगी कपड्यात,अंगभर दागिने घातलेली आदिवासींची जमात. ज्यांच्या संस्कृतीवर गुढतेचा पडदा असल्याने एक प्रकारची संदीग्ध्ता कायमच आहे. तसे पाहता केरळ पेक्षा मोठा प्रदेशपण आधुनिक जगाशी शेकडो वर्षे संबंध नसल्याने दुर्लक्षित मागासलेला विभाग म्हणून तसाच राहिला आहे. घनदाट जंगले, अबुजमाड पर्वत रांगा, खळाळणारे धबधबे व नद्या अशा परिसरात १२ ते १४ पोट जमातीचे लोक राहतात. प्रत्येक जमातीची बोली भाषा, आराध्य देवता वेगवेगळ्या आहेत. अतिशय साधी जीवन शैली, कायमच संपर्काच्या बाहेर असल्याने ह्या आदिवासी जमातींचा विकास कोणत्याच बाबतीत झालेला नाही. जवळ जवळ ६०० वर्षे ह्या आदिवासींवर नागा, गंगा, नाला काकतिया राजघराण्यांची सत्ता होती. खनिज संपत्तीचे वरदान, लोखंड, अॅल्युमिनियम, बॉक्साइट (Aluminum, Bauxite) हिरे, माणके यांचे प्रचंड साठे त्यामुळे मोठाले व्यावसायिक धंद्यात उतरले. जबरदस्तीने आणि सरकारी यंत्रणेच्या मदतीने या भूमीतील आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यातून एका जीव घेणाऱ्या चळवळीचा जन्म झाला ती म्हणजे “नक्षलवाद”. ज्यामध्ये सरकारी कर्मचारी,पोलीस, आदिवासी, आणी कट्टर नक्षलवादी अशा समाजातील विविध घटकांच्या आहुती पडत आहेत आणि हे न संपणारे अघोषित युद्ध आहे.
जंगलाचे वरदान असलेला ह्या बस्तर प्रदेशात अनेक औषधी वृक्षांच्या जाती, विविध प्राणी व पक्षी आढळतात. ह्या सर्वांचा आदिवासीच्या जीवनाशी निगडीत संबंध आहे. बस्तर प्रदेशातील अदिवासींचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. बस्तर भागातील आदिवासींच्या मुख्य जमातीची नावे आहेत अबूज मारिया, बायसन हॉर्न मारिया, भात्र, हलबा, गद्वा, आणि गोंडा. त्यांच्यात अनेक पोटजाती सुद्धा आहेत. विलक्षण किरटया आवाजात गायले जाणारे लोकसंगीत, बायसनचे (गवा) शिंग डोक्यावर बांधून केलेले “काकसर नृत्य” हा आदिवासी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यांचे पोटापाण्याचे धंदे म्हणजे शिकार करणे, तंदू पत्ता व मोहाची फुले गोळा करणे, बांबूच्या पातळ पट्ट्या पासून विविध आकाराच्या टोपल्या लॅम्प शेड्स आणि शोभिवंत गोष्टी बनविणे हा आहे. हे आदिवासी जुजबी प्रमाणात शेती काम करतात. तसेच लोहार काम, बेल मेटलच्या शोभिवंत गोष्टी बनविणे ह्यावर आदिवासी आपली गुजराण करतात. आदिवासींना जंगलातील झाडांची उपयुक्तता माहिती आहे. ह्या उपयुक्त माहितीचा आणि तंत्रमंत्राचा उपयोग करून येथील आदिवासी बऱ्याच आजारांवर उपाय करतात.दुर्गम प्रदेशामुळे आजूबाजूच्या प्रदेशातील जनतेशी संपर्कही नसल्याने त्यांचे जीवन सुखाचे आहे. साल्पी झाडापासून बनलेली ताडी, महुआच्या फुलाची दारू या दोन पेयात आदिवासी मश्गुल होऊन पडलेला असतो. बस्तर मधील आदिवासी अनेक देव-देवता पूजतात. ह्या देवदेवतात दंतेश्वरीमातेचे देवी प्रमुख आहे.
डॉक्टर वेरीर एल्विन (Dr. Verier Elvin)हे भारत स्वतंत्र होण्याच्या ३० ते ४० वर्षा पूर्वीच्या काळात आदिवासी जमातीचा अभ्यास करण्यासाठी मध्य भारतातील बस्तर जिल्ह्यात स्थाईक झाले. याच भागात त्यांनी आपले उभे आयुष्य व्यतीत केले. स्वत:च अभ्यासक बनून (कुठलेही या विषयाचे शिक्षण न घेता) ते मानवंश शास्त्रज्ञ बनले. मानवाचा विकास व संस्कृती शास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून डॉक्टर वेरीर एल्विन जगप्रसिध्द होते.बस्तर मधील गोंड व बैगा जमातीच्या संस्कृतीवर सखोल माहिती देणारी १० एक पुस्तके डॉक्टर वेरीर एल्विन ह्यांनी प्रसिद्ध केली.त्या मधील Leaves from jungle life in a Gond village The Baiga हे सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यांच्या या अभ्यासामुळे बस्तर जिल्हा जगप्रसिद्ध झाला.
बस्तर हे पूर्वी छोटे खेडे होते. हळूहळू बस्तरचे महत्व कमी होत जगदलपुर हे छोटे शहर उदयास आले आहे. बस्तर राजवाडा या शहरात असून ९० वर्षापूर्वी बांधलेली ही वास्तू छत्तीसगड राज्याची शान आहे.मुख्य दरवाजातून प्रवेश करताच पिंगट पांढऱ्या रंगाची भव्य दगडी इमारत,समोर फुले व हिरवळ ठेवलेली डोळ्यात भरणारी बागदिसते. राजवाड्याच्या मध्यात दरबार हॉल असून त्यात उच्च प्रतीची काचेची झुंबरे आहेत. दरबार हॉल मधील बाजूच्या भिंतीवर उत्तम तैलचित्रे पहावयास मिळतात. दरबार हॉलच्या मध्यात राजाच्या भव्य आसनाची जागा आहे. ह्या दरबार हॉल मध्ये कमालीची शांतता,व स्वच्छता आहे. दशहरा सोहळ्याच्या वेळी रंगीत विजेच्या दिव्यात हा महाल उजळून निघतो. राजवाडा भव्य असून काही भागात सध्याचे राजे राहतात. तर काही भागात मेडीकल कॉलेजचा विभाग आहेत.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply