बस्तरच्या राजाचा हा सण अतिशय थाटामाटात होतो. हा दशहरा पाहण्यास भारत व जगभरातून हौशी प्रवासी येतात.बस्तर प्रदेशातील सर्व आदिवासी जमाती, राज्यातील इतर सर्व धर्माचे लोक यांचे नाच गाणे, त्यांचे रंगीत कपड्यांचे व आदिवासी दागिन्यांचे अनोखे दर्शन ह्या दशहरा सोहळ्यात घडते. बस्तारचाराजा स्वत: दागिन्याने मढलेला या सोहळ्यात सर्व कार्यक्रमांना जातीने हजर असतो. बस्तर मधील काही खेड्यात हा सण ७५ दिवस चालतो. इतके दिवस चालणारा हा सण हे जगातील एकमेव उदाहरण असेल. हा समारंभ १३ व्या शतका पासून चालू असून आणि ह्या सोहळ्याची ही परंपरा जगन्नाथपुरी मंदीरापासून राजाला मिळालेली आहे. काही ठिकाणी दंतेश्वरीमातेचे पूजन केले जाते. ह्या दशहरा सोहळ्यात पाटा जत्रासमारंभ लाकडाच्या पूजनाने होतो. यावेळी लाकूड समारंभपूर्वक कापले जाते. त्यानंतर ८ चाकाच्या फुलांनी सजवलेल्या रथातून देवीची रथयात्रा काढली जाते. या सोहळ्यात डोक्रा बेल मेटल कला, बांबूच्या विविध कलाकुसरीच्या गोष्टी व अनेक इतर कला पाहण्याची संधी असते. रात्री आदिवासी प्रदेशात महुआ दारू व साल्पी ताडी नदीच्या प्रवाहाप्रमाणे मुक्तपणे वाहत असते.
जगदलपुर मधील धरमपुर भागात उभारलेले विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय (zonal anthropological museum Z.A.M.) म्हणजे छत्तीसगडराज्याच्या मुकुटातील मानाचा तुरा आहे. मानव वंशशास्त्र, त्याचा विकास व संस्कृती शास्त्र या विषयावर आधारीत बस्तर मधील विविध आदिवासी जमातीचा जिवंत वाटणारा इतिहास म्हणजे विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालय. ह्या संग्रहालयात आदिवासींचे अनेक पुतळे आहेत. त्याच बरोबर आदिवासींची घरे, त्यांचे दाग दागिने, शेतीची अवजारे, प्राण्यांची शिकार करण्याची आयुधे, शिकार केलेल्या प्राण्यांची डोकी, शिंगे, नदीत चालणाऱ्या होड्या, मासे पकडण्याची अनेक तऱ्हेची आयुधे या सर्व गोष्टी भव्य दालनात काचेच्या कपाटात मांडलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी माहितीचे तक्ते आहेत. पाहता पाहता दोन तास आपण त्या काळात रममाण होतो. विभागीय मानववंशशास्त्र संग्रहालयाची स्थापना १९७२ साली झाली. आम जनतेकरता १९७६ मध्ये हे संग्रहालय खुले झाले. डॉक्टर वेरीर एल्विन यांचा सुरेख फोटो वत्यांच्या जीवन कार्याची माहिती लिहिलेला तक्ता ह्या संग्रालयात ठेवला आहे. डॉक्टर वेरीर एल्विन ह्यांच्या जीवापाड कामाला दिलेली ही सुरेख दाद आहे. एक संपूर्ण दालन आदिवासींचे रंगी बेरंगी कपडे, ते वापरत असलेले विविध प्रकारचे कंगवे, आदिवासींची अनेक वाद्ये, बेल, लोखंड, टेराकोटा पद्धतीच्या शोभिवंत कलाकृती, देवगुडी पद्धतीचे रंगवलेले खांब ह्या संग्रहालयात मांडले आहेत. बस्तर दशहरा सोहळ्याची भव्य रंगीत चित्रे, आदिवासी खेडी, त्यांची घरे ह्याची सर्व मांडणी करणाऱ्याचे कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ह्या संग्रहालयात फोटो घेण्यास बंदी असल्याने चुटपूट लागते. या वंशपरंपरेचा सखोल अभ्यास करायचा असेल तर येथे सर्व सुविधा आहेत. ह्या अभ्यासासाठी विविध ग्रंथ प्राप्त करून दिले जातात. संग्रहालयाच्या बाहेरच्या परिसरात सुरेख बाग, आदिवासींच्या झोपड्या, सजवलेले हत्तींचे पुतळे सगळ्याच गोष्टी डोळ्याचे पारणे फिटवतात.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply