सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल. छे असे कधीच घडले नाही. मी घरात गेले. खूप बैचेन होते. दहा वेळा तरी शेजारी डोकावून पाहिलं पण… शेवटी राहवलं नाही म्हणून तिच्या दाराची बेल वाजवली. तसा लहान तोंड करून माधव आला. मी पटकन घरात शिरून कानोसा घेतला असता त्याने सांगितले की माधुरी माहेरी गेली आहे तिचा मामा आला आहे आईकडे म्हणून. मी हसून म्हणाले की अस होय पण तू का तोंड पाडून बसला आहेस. तसा तो म्हणाला की काकू बायकांना माहेर आहे. त्यामुळे चार दिवस जातात. उत्साहाने परत येतात. मुले झाली तरी सुट्टीत मुलांना घेऊन जातात. पण आम्हाला पुरुषांना कुठे आहे माहेर.. प्रश्न बरोबर आहे ना मी त्याला समजावलं ते असे..
अगदी बरोबर आहे तुझं मुलगा ज्या घरी जन्म घेतो तिथेच लहानाचा मोठा होतो. प्रत्येक वेळी आईबाबा बरोबर असतात. सगळ्या गोष्टीत तू आईबाबांना सहभागी करून घेतले होतोस . पुढे नोकरी लग्न झाले की बायकोला सहभागी करुन घेतले तरी त्याला मर्यादा असतात. मनावर दडपण येत. काही वेळा सांगता येत नाहीत. आणि बायकोच्या माहेरी गेलास तरी तिथेही नात वेगळ असतं. पण तुला एक सुचवू का. तुला माहेर असावं वाटतं ना मग तू तुझ्या बहिणीकडे जा. आईच्या माघारी ताईच आई असते. आई ताई नाव व नातं वेगळ आहे पण माया प्रेम मात्र एकच आहे. तू जा आणि बघ तुझ्या आवडीचे सगळे करुन वाढेलच. आणि तुझ्या लहानपणीच्या खोड्या. आठवणी. तुझ्या साठी आईचा ओरडा खाणारी. अभ्यासात मदत करणारी. तुझ्या सुखासाठी त्याग करणारी. अडचणीच्या काळात धीर देणारी. मायेने हात फिरवणारी. आशीर्वाद देणारी. भाऊ आला की सगळी कामे बाजूला सारून रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणारी.परत निघालास की काहीतरी डबे भरुन देणारी. दारात उभी राहून डोळे भरून निरोप देणारी. पोहंचलास की फोन कर. सुखरूप जा असे सांगणारी निरपेक्ष भावनेने परत लवकरच या म्हणणारी अरे अशा अनेक गोष्टी आहेत की तुला आईची आठवण होऊ देणार नाही म्हणून तू तुझ्या बहिणीकडे जा आणि बघ तुला माहेर मिळते की नाही ते.
पुरुष मंडळी तुम्ही पण असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. त्यामुळे तुमचाही प्रश्न सुटेल असे वाटते.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply